Friday, February 3, 2023

वृत्त क्रमांक 56

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 6 फेब्रुवारी 2023 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

 

या दिवशी महसूल, जिल्हा पोलिस अधीक्षक , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे विभाग, सार्वजनिक  बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतीमध्ये असावा (नमुना प्रपत्र 1 ते 1 ड)  तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतीलअशी मााहिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 55

 जिल्ह्यातील 18 वय वर्षे पर्यंतच्या दहा लाख

मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी

 

·  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत नियोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- शुन्य ते 18 वय वर्षे वयापर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सुमारे 10 लाख मुला-मुलींची तपासणी होणार असून आरोग्य विभागासह, शिक्षण, वैद्यकिय महाविद्यालय, महिला व बालकल्याण, आयुर्वेदिक महाविद्यालय, मनपा, इंडियन मेडिकल असोसिएशन, पेडियाट्रिक्स असोसिएशन व इतर संबंधित विभागांची आज आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. निना बोराडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सलीम तांबे, डॉ. शिवशक्ती पवार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डॉ. मनिष देशपांडे, डॉ. राजेश बुदे, डॉ. लोमटे, डॉ. दिपेश शर्मा आदी उपस्थित होते.   

 

या मोहिमेसाठी सुमारे 300 वैद्यकीय तपासणी पथक तयार करण्यात आले असून उपलब्ध मनुष्यबळ व जिल्ह्यातील आरोग्य सेवा-सुविधा यांचा यात अंर्तभाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 317 उपकेंद्रे, 68 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 ग्रामीण रुग्णालय, 6 उपजिल्हा रुग्णालय, 3 जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, 15 प्राथमिक आरोग्य केंद्र याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन, पेडियाट्रिक्स असोसिएशन व इतर संस्थांचाही यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे.

 

शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी शाळा, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या आदी ठिकाणावर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. यात वजन, उंची, गरजेनुसार विद्यार्थ्यांचा रक्तदाब, नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, हृदयरोग, कुष्ठरोग, दंत विकार, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी, जन्मजात मोतिबिंदू, बहरेपणा, दुभंगलेले ओठ, डाऊन सिंड्रोम डिफेक्ट, न्युरल ट्युब डिफेक्ट अशा आजाराच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित उपचारासाठी संदर्भीत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

 

तीनस्तरावर ही आरोग्य तपासणी केली जाणार असून यात ज्या मुलांना बाहेरच्या उपचारांची गरज अत्त्यावश्यक असेल अशा मुला-मुलींवर मेडिकल असोसिएशनचे तज्ज्ञ आपली सेवा उपलब्ध करून देणार आहेत. सर्व तपासणीमध्ये कुणाला उच्च स्तरीय उपचार शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर अशा पालकांना करारबद्ध करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये संदर्भीत केले जाणार आहे.

 

भविष्यात उग्र स्वरूप अथवा घातक ठरणाऱ्या आजारांवर वेळीच निदान करून उपचार करणे आवश्यक असते. असंख्यवेळा लहान मुले आपल्याला नेमके काय होते याबाबत कोणाशी बोलत नाहीत. त्यांच्या पालकांचेही बालकांच्या ज्या काही आरोग्य समस्या असतील त्याकडे वेळेवर लक्ष वेधले जाईल असे होत नाही. हे लक्षात घेता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्ह्यातील 18 वय वर्षे गटापर्यंतच्या सर्व मुलांची आरोग्य तपासणी जिल्ह्यात पूर्ण केली जाईल. ही प्राथमिक तपासणी जिल्ह्यात 7 हजार 727 शाळा व इतर ठिकाणी करून यातील तात्काळ उपचाराची गरज असलेल्या मुलांवर पुढील तपासण्या करून त्वरीत उपचार करून देऊ. 

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

 अत्यंत महत्त्वपूर्ण व आवश्यक अशा या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशनला सहभाग घेण्याची मिळालेली संधी म्हणजे आम्ही आमचा सन्मान समजतो. शासकीय रुग्णालयांमध्ये या तपासणी मोहिमेतील बालकांना पुढील अत्यावश्यक तातडीने जे काही उपचार करावे लागले तर त्यासाठी आम्ही आमचा वेळ या कामांसाठी निश्चित देऊ. 

- डॉ. मनिष देशपांडे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन.

******* 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...