Friday, September 6, 2019


कृपया मुख्यालयाच्या विशेष वृत्तास प्रसिद्धी दयावी, ही विनंती.
वृ.वि.2403
दि.6 सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त

पुस्तकांच्या गावात 30 हजार पुस्तक;
दीड लाख वाचक प्रेमींची भेट!

मुंबई, दि. 6: भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील  भिलार या पुस्तकांच्या गावात गेल्या दोन वर्षात दीड लाखांहून अधिक वाचक पर्यटकांनी भेट दिली आहे. या गावात वाचक पर्यटकांसाठी 30 हजारहून अधिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सुरु करण्यात आलेला'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होतील.
भिलार येथे 4 मे 2017 पासून 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या गावात 13 साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी वाचकांसाठी दर्जेदार इंग्रजी पुस्तकेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. गेल्या २ वर्षांत गावकऱ्यांच्या आग्रहामुळे एकूण १० पुस्तक घरांचा या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे.
शासनाचा पुढाकार आणि लोकसहभाग याचे ‘पुस्तकाचे गाव’ हेउत्कृष्ट उदाहरण आहे. पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन यांच्याकडून विनामोबदला देण्यात आली आहे. गावातील राहती घरे, निवारागृहे, शाळा व मंदिरे अशा 35 ठिकाणी विविध साहित्यप्रकारांची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
इंग्लडमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर भारतातील हे पहिले पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले आहे. या गावात येणारे पर्यटक कोणतेही पुस्तक विनामूल्य वाचू शकतात.
००००




ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक  
मतदारांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड दि. 6 :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक जनजागृती कार्यक्रमाला नांदेड तालुक्यात सुरुवात झाली असून याचे मंडळनिहाय नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन गावनिहाय याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी लतीफ पठाण व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.  
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रात्यक्षिक कार्यक्रम सर्व मंडळनिहाय गावात 4 ते 25 सप्टेंबर 2019 पर्यंत राबविण्यात येत आहे. यात एकुण चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सर्व पथक प्रमुख 86- नांदेड उत्तर साठी नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांच्या पथकात 57 ठिकाणे देण्यात आली आहेत. 87- नांदेड दक्षिणमध्ये नायब तहसिलदार विजय चव्हाण यांच्या पथकात 52 ठिकाणे देण्यात आली आहेत. नायब तहसिलदार उर्मिला कुलकर्णी यांच्या पथकात 36 ठिकाणे देण्यात आली आहेत.
बुधवार 4 सप्टेंबर रोजी मुथा चौक वजिराबाद नांदेड येथून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक करुन जनजागृतीस प्रारंभ करण्यात आला. याठिकाणी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन स्वत: मतदान करुन व्हीव्हीपॅटवर मतदानाची खात्री करुन प्रात्यक्षिक केले. या प्रात्याक्षिकाचे सादरीकरण मंडळ अधिकारी श्री कंगळे, शिल्पनिदेशक पी. आर. मांजरमकर, डी. एस. तोटावाड, एम. एन. शिंदे, कपिल जोंधळे, बळीराम कोल्हे यांनी केले अशी माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार नांदेड यांनी दिली आहे.
0000


सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी
जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत 12 सप्टेंबर रोजी मुलाखती
नांदेड दि. 6 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 18 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2019 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 50 आयोजित करण्यात येणार आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे गुरुवार 12 सप्टेंबर 2019 रोजी मुलाखतीस उपस्थित  रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध चेक लिस्टचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून (किंवा प्रिंट कार्यालयाकडून घ्यावी) ते पुर्ण भरुन आणावेत.
एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठी पुढील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे. 1) कंबाईन्ड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. 2) एनसीसी (सी) सर्टिफिकेट ए/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. 3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. 4) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिकरोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ;
बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 6 :- कृषि आयुक्तालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांना सन 2019-20 मध्ये लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 5 ते 19 सप्टेंबर 2019 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना   बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सन 2019-20 मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर 5 ऑगस्ट 2019 ते 4 सप्टेंबर 2019 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली होती. मंगळवार 3 सप्टेंबर 2019 पासून सदर संकेतस्थळ पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत होत नसल्यामुळे बरेच लाभार्थी ऑनलाईन नोंदणी करु शकले नाहीत. तसेच ग्रामसेवक यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु असल्यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून मिळत नाहीत. त्यामुळे या योजनेतर्गत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी कृषि आयुक्तालयास प्रस्ताव सादर केला होता.  
गरजू शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सदर संकेतस्थळावर आपले अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह ऑनलाईन करावेत. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क  साधावा, असे आवाहन कृषि पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी कृषि विकास अधिकारी संतोष नादरे जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
0000


जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा संपन्न
जिल्ह्यात नवीन उद्योगासाठी  
औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा
-         खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड दि. 6 :- जिल्हयात नवीन मोठे उद्योग स्थापित करण्यासाठी औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज संपन्न झाली. यावेळी खासदार श्री. चिखलीकर बोलत होते.
बैठकीस औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी, विविध कार्यालयाचे शासकीय अधिकारी तसेच अग्रणी बँक अधिकारी उपस्थित होते.
उद्योगाच्या असलेल्या अडचणी त्वरीत सोडविण्याबाबत खासदार श्री चिखलीकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचित केले. उद्योग घटकांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यात येतील, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नुकतीच कार्यान्वित करण्यात आलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेसाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी बँक तारण घेणार नाही, असे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव यांनी केले. मान्यवरांचे स्वागत औद्योगिक संघटना जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्यावतीने करण्यात आले. या सभेस जिल्हयातील उद्योजक श्री. बंगाली, शिवप्रसाद राठी, महेश देशपांडे, शैलेष ऱ्हाळे, आनंद बिडवई, निलेश मुंदडा आदी उपस्थित होते.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...