अन्यथा नांदेड विमानतळ आम्ही पुढील तीन महिन्यात सुरू करु
- उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा
· विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री सामंत यांनी घेतला आढावा
नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड येथील विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत मागील अनेक महिन्यांपासून सर्व स्तरातून तक्रारी येत आहेत. लातूर, हिंगोली, परभणी, बिदर या अशा पाच जिल्ह्यातील अनेक प्रवाशांसाठी येथील विमानतळाची सुविधा ही अत्यंत गरजेची आहे. याच बरोबर नांदेड येथील शिख भाविकांची जगभरातून वर्दळ सुरु असते. एका बाजूला मोठ्या संख्येने विमान प्रवासी असूनही येथील विमानतळाच्या कुशल व्यवस्थापना अभावी येथील प्रवासी विमान सुविधा बंद पडली. सदर विमानतळ चालविणाऱ्या एजन्सीने यात तात्काळ सुधारणा केल्या नाहीत तर राज्याच्या उद्योग विभागामार्फत इतर विमानतळाच्या धर्तीवर नांदेड विमानतळ उद्योग विभागातर्फे येत्या तीन महिन्यात सुरु करू, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
नांदेड विमानतळाच्या सुविधांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक विमानतळ येथे संपन्न झाली. या बैठकीस खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, रिलायन्स एअरपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारीख बट्ट, प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीमार्फत राज्यातील अनेक ठिकाणी सक्षमपणे विमानतळाचे व्यवस्थापन केले आहे. नांदेड विमानतळाबाबत अनेकांच्या तक्रारी लक्षात घेता यात तात्काळ सुधारणा गरजेचे आहे. येथील कामे तात्काळ सुरु न झाल्यास या विमानतळाचे व्यवस्थापन आमच्याकडे घेवून आम्ही अधिक सक्षमतेने हे विमानतळ चालवून प्रवाशांना सुविधा देवू असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
विमानसेवा सक्षम सुरू झाल्यास पाच जिल्ह्यांसह उद्योग जगतालाही मिळेल चालना
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
नांदेडसह मराठवाडा विकासाच्यादृष्टिने हे विमानतळ खूप महत्वाचे आहे. येथील निर्यातीला मोठ्या प्रमाणात यातून चालना मिळू शकते. विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्यास सुमारे पाच जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. केवळ येथील व्यवस्थापनाच्या चुकीमुळे जर जनतेच्या सुविधेला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असेल तर यात बदल करणे आवश्यक असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. याबाबत नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमवेत मी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत नागरी विमान वाहतुक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत, असे खा. चिखलीकर यांनी सांगितले.
विमानतळ व्यवस्थापनाच्या कामकाजात सुधारणा आवश्यक
- खासदार हेमंत पाटील
विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत संबंधित व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बट्ट यांना वारंवार सूचना करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विमानतळाच्या सुविधा सक्षम नसल्याने इतर विमान वाहतूक कंपन्या पुढे यायला तयार नाहीत. येथील व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अडचणी वाढल्या आहेत. ज्या चांगल्या स्थितीत हे विमानतळ संबंधित एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले होते ती स्थिती आज राहिली नसून व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड यांनी यात लक्ष देण्याचा आग्रह केला.
नांदेड येथील उद्योजकांच्या बैठकीतही अनेक उद्योजकांनी विमानतळ सुविधेबाबत प्रश्न उपस्थित करुन उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. उद्योजक शैलेश कऱ्हाळे, आनंद बिडवई, बंगाली, महेश देशपांडे यांनी विमानतळाचा मुद्दा उपस्थित करुन नांदेड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील उद्योग जगताला चालना देण्यासाठी, एक्सपोर्टसाठी येथील सुविधा व विमानसेवा तात्काळ सुरु करण्याची आग्रही मागणी केली.
00000