Tuesday, November 27, 2018

लेख


गोवर-रुबेला लसीकरण मोहिम : धार्मिक नेत्यांची भूमिका
                                      
              अनिल आलुरकर
                                                                        जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                         नांदेड

गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम 27 नोव्हेंबर पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. आपल्या देशाने गोवरचे दूरीकरण करण्याचा आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय केला आहे. आपण एका लसीद्वारे दोन आजारांवर मात करु शकतो. गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत धार्मिक नेते या नात्याने त्यांची भूमिका याविषयी माहिती या लेखात देण्यात येत आहे.
      
गोवर आणि रुबेला या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्या देशाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला प्रतिबंधासाठी राज्यव्यापी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेविषयी सर्वस्तरातील नागरिक व पालकांकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षा ठेवली जात असतांना राष्ट्रीय बंधुभाव जपणाऱ्या व प्रचंड धार्मिकतेच्या आपल्या देशात धार्मिक नेत्यांच्या प्रबोधनाला अत्यंत महत्व आहे. त्यादृष्टीने लसीकरणाविषयी समाजात शुभसंदेश गेला पाहिजे आणि त्यासाठी धार्मिक नेत्यांची भूमिका सकारात्मक आणि अत्यंत महत्वाची ठरते.
           लसीकरणाच्या आधी एमआर लसीकरणासंबंधी समुदायामध्ये स्वयंप्रेरित आणि उत्साहवर्धक वातावरण असणे महत्वाचे आहे. धार्मिक नेत्यांनी लसीकरणाच्या होणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात कृपया सहभागी व्हा अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना एमआर लसीकरणाबद्दल थोडक्यात माहिती देण्याची विनंती करण्यात आली पाहिजे. स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तुमच्या गरजेनुसार अधिकाधिक माहिती प्राप्त करा अथवा आरोग्य केंद्रातील कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्यांशी बोला / भेटा. वॉट्स-ॲप, ई-मेल आणि एसएमएस तसेच आपापसांतील गप्पांच्या माध्यमातून लसीकरणासंबंधीच्या माहितीचा नियमितपणे प्रचार करावा. तुमच्या विभागात सामुदायिक बैठकांचे आयोजन करावे आणि उपस्थितांना एमआर लसीकरणासंबंधी थोडक्यात माहिती द्यावी. आरोग्य कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या आरोग्य शिक्षण साहित्याचा वापर करा अथवा एमआर लसीकरणासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी त्या बैठकीत / सभेत एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याला बोलवा. ज्या पालकांना 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालके आहेत त्यांच्यापर्यंत संदेश अवश्य पोचेल याची खात्री करुन घ्या. मशीद, मंदिर, चर्च तसेच इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या धार्मिक बैठकीत यासंबंधी आपल्यामार्फत घोषणा केली जाईल याची खात्री करुन घ्या. शुक्रवारचा नमाज तसेच मंगळवार किंवा रविवारच्या प्रार्थनासभांच्यावेळी तुमच्या विभागातील समुदायातील सदस्यांच्या उपस्थितीत एमआर लसीकरणासंबंधी घोषणा करा आणि चर्चा घडवून आणा. लसीकरण सत्र आयोजित करण्यासाठी आरोग्य सेविकेला योग्य जागा उपलब्ध करुन द्या. त्यामुळे तुमच्या समुदायातील सदस्यांची विश्वासाची भावना वाढेल.
लसीकरणादरम्यान पालकांना लसीकरणासाठी त्यांच्या बालकांना घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुम्ही स्वत: लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या विभागातील यादीत असलेल्या कुटुंबांची जमवाजमव करण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तुमच्या एखाद्या प्रतिनिधीला पाठवा. एमआर लसीकरणाची माहिती लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुमच्या धार्मिक स्थळावरुन सकाळी घोषणा होईल याची खातरजमा करा आणि ही घोषणा दिवसाउजेडी होईल यासाठी प्रयत्न करा. जर समुदायातील सदस्यांनी काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करा आणि सदस्यांना योग्य उत्तरे मिळतील याची खात्री करुन घ्या.
लसीकरणानंतर लक्ष देण्यात आलेल्या एखाद्या बालकाला तापाची लक्षणे अथवा डोळे लालसर झाल्याचे दिसून आले तर पर्यवेक्षकाला किंवा आरोग्य सेविकेला त्वरित खबर द्या आणि समुदायातील सदस्य घाबरुन जाऊ नये यासाठी त्यांना दिलासा द्या. जर बालकाला अशक्तपणा अथवा थकल्यासारखे वाटत असले तर वैद्यकीय अधिकारी / आरोग्य सेविका यांना कळवून गैरसमज पसरणार नाहीत याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.  
एका राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्यसंपर्क लसीकरण सत्रांच्या माध्यमातून गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला (एमआर) लसीकरण मोहीमेची सुरुवात झाली आहे. त्यानंतर नियमित लसीकरणामध्ये एमआर लसीचा समावेश करण्यात येणार आहे. बालकांना एमआर एमएमआरची लस यापूर्वी टोचण्यात आली असली अथवा नसली तरी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांनी एमआरची लस टोचून घेणे महत्वाचे आहे.
विषाणुद्वारे पसरणारा गोवर हा प्राणघातक रोग आहे. गोवरमुळे बालकांना शारीरिक दुर्बलता येऊ शकते आणि त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. रुबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणूमुळे होतो. त्याची लक्षणे गोवरसारखीच असतात. त्याचा संसर्ग मुलगा आणि मुली दोघांनाही होतो. परंतू गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएसमध्ये (कॉनजेनिटल रुबेला सिंड्रोम) होऊ शकतो. ज्याचे परिणाम गर्भासाठी आणि नवजात शिशूसाठी घातक ठरु शकतात.
एमआर मोहिमेदरम्यान 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही लस अवश्य टोचून घ्यावी. वरील वयोगटातील सर्व बालकांना, त्यांचे लिंग, जात, पंथ व धर्म असा भेदभाव न करता ही लस देण्यात येईल. ही लस शाळा, सामुदायिक सत्र, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रांवर टोचण्यात येईल. जरी बालकाला एमआर एमएमआरची लस यापूर्वीच देण्यात आली असली तरी त्याचा एमआरची लस जरुर टोचून घ्या. मोहिमेदरम्यान देण्यात येणारा हा अतिरिक डोस म्हणजे बालकाला मिळाणारे अतिरिक संरक्षण. एमआर लस अतिशय सुरक्षित आहे आणि तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे गोवर तसेच रुबेला रोगांपासून दीर्घकाळ रक्षण होते. एमआर लस आणि वंध्यत्व या दोहोंचा परस्परांशी काहीही संबंध नाही. बालकांना ही लस प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत टोचली जाईल या मोहिमेत तुमचा सहभाग असेल हे सुनिश्चित करा.
धार्मिक नेत्यांची या लसीकरणामध्ये आपल्या समुदायाच्या मुला-मुलींचे गोवर व रुबेला या आजारापासून संरक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका असून शासनाला धार्मिक नेत्यांकडून यासंबंधीची जागरुकता वाढविण्याची व लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. ती पूर्ण होईल यात शंकाच नाही.
000000

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
            नांदेड, दि. 27 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            गुरुवार 29 नोव्हेंबर 2018 रोजी बीड येथून शासकीय वाहनाने लोहा तालुक्यातील सुनेगाव येथे सकाळी 11 वा. आगमन व बंजारा समाजाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- चिखलीकर विद्यालय गंगाखेड रोड सुनेगाव. सकाळी 11.10 वा. शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह लोहाकडे प्रयाण. सकाळी 11.20 वा. शासकीय विश्रामगृह लोहा येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. शासकीय वाहनाने भोकरकडे प्रयाण. दुपारी 1.40 वा. शासकीय विश्रामगृह भोकर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.50 वा. शासकीय वाहनाने संगम हॉल सेवालाल चौक जवळ शिवाजी चौक भोकरकडे प्रयाण. दुपारी 2 वा. बंजारा समाजाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- संगम हॉल सेवालाल चौक जवळ, शिवाजी चौक भोकर. दुपारी 3 वा. शासकीय वाहनाने धावरी, तामसा, हदगाव मार्गे यवतमाळकडे प्रयाण करतील.
00000

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा
-         जिल्हाधिकारी डोंगरे  
           
नांदेड, दि. 27 :- गोवर-रुबेला या आजारापासून मुक्त होण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवून पालकांनी बालकाचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय येथे करण्यात आला.
यावेळी महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, मनपाचे महिला बाल कल्याण समितीचे सौ. संगिता तुप्पेकर, सतिश देशमुख, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले एमआर लसीकरण शंभर टक्के झाले पाहिजे. या लसीकरण सत्राच्या ठिकाणी स्वत: भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काकडे यांनी जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागीय कर्मचारी यांचे कौतुकही केले. सर्व पालकांना त्यांच्या 9 महिने 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलीचे एमआर लसीकरण करुन घेण्यासाठी सहभाग घ्यावा. मनपा आयुक्त श्री. माळी म्हणाले, समाजातील सर्वांनी एमआर लसीकरणात सहभाग घेऊन मोहिम यशस्वी करावी. मान्यवरांचे हस्ते लसीकरण केलेल्या मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पवार व महापौर श्रीमती भवरे यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन, डॉ. बद्दीओदिन, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. झिने, सुभाष खाकरे, शाळेचे सचिव अवधूत क्षिरसागर, मुख्याध्यापक, शिक्षक, लाभार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत

        नांदेड,दि. 27:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी भारतीय वायू दलाच्या विमानाने दिल्लीहून नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड , विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदि मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
नांदेड विमानतळावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने तेलंगणा राज्यातील निजामाबादकडे प्रयाण झाले.    
****








        

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...