Friday, April 7, 2017

समता सप्ताहातून सामाजिक न्यायाच्या
योजना राबविण्याची प्रेरणा घेऊ या - संतोष पाटील
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

नांदेड, दि. 8  :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक न्यायाच्या योजना परिणामकारकरित्या राबविण्याची प्रेरणा घेऊ या, त्यासाठी प्रयत्नशील राहू या, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले. राज्यभरात आज पासून भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय कार्यक्रमात सप्ताहाचा प्रारंभ प्रभारी जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते सामाजिक न्याय्य भवन येथे करण्यात आला.  या कार्यक्रमात ते बोलत होते.
सामाजिक न्याय भवनच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमास समाजकल्याणचे सहायक आयुक्त भगवान वीर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यु. डी. तोटावार, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, बार्टीच्या समतादूत प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापू दासरी आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात श्री. पाटील पुढे म्हणाले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवीत कार्य समजून घेण्यासाठी, अनेकदा उजळणी करावी लागेल. राज्यघटनेत अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य-समता-बंधुता ही महान तत्व प्रणालीही समजून घ्यावी लागेल. तथागत बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून डॉ. आंबेडकर यांनी समता या तत्त्वाचा अंगिकार केला. पुढे त्यासाठी बौद्ध धर्माचा मार्गही अनुसरला. आज या समता सप्ताहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न, योजना, उपक्रमानांही जाणून घेतले पाहिजे. असे प्रयत्न, या योजना ज्या घटकांसाठी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक न्याय्य आणि विशेष सहाय्याच्या योजना परिणामकाररित्या राबविण्यासाठीची प्रेरणाही या समता सप्ताहातून घेतली पाहीजे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्री. वीर यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत चालणाऱ्या या सामाजिक समता सप्ताहाची रुपरेषा व त्याअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले. तसेच भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. शिवानी इंगोले यांनी सुत्रसंचालन केले. समाज कल्याण अधिकारी श्री. आऊलवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध महामंडळांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच तालुका समन्वयक, समता दूत, समाज कल्याण तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

000000
अनोळखी महिला वय अंदाजे 65 वर्षे रंग काळा, शरीर बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, पोशाख ब्लाऊज हिरव्या रंगाचे, डाव्या हातावर गोंधलेले आहे. पण काय आहे ते समजून येत नाही. केस काळे पांढरे लांब असा वर्णनाची अनोळखी महिला मरण पावली आहे. 




जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 11 एप्रिल 2017 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

0000000
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात
अंतरंग वेलनेस क्लिनीकची स्थापना
नांदेड दि. 7 :- जागतिक आरोग्य दिनानिमित्त  गुरु गोबिंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आरोग्य दिनाचे "चला बोलुया नैराश्य टाळू या" या घोषवाक्यानुसार नैराश्यग्रस्त नागरिकांच्या समुपदेशनासाठी "अंतरंग वेलनेस क्लिनिक"ची स्थापना करण्यात आली. 
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने अंतरंग वेलनेस क्लिनीकच्या माध्यमातून मानसिक आजाराबाबत जनजागृती, बाह्य रुग्ण सेवा पुरवणे, ताणतणाव मुक्तीवर समुपदेशन करणे, वृद्धांना होणाऱ्या मानसिक आजारावर औषधोपचार उपलब्ध करुन देणे, गंभीर स्वरुपातील आजारावर सेवा उपलब्ध करुन देणे, सकारात्मक जीवनपद्धतीवर समुपदेशन करणे आदी बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी "अंतरग वेलनेस क्लिनीक" मधील सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. दिपक हाजारी, डॉ. साखरे, डॉ. वाघमारे तसेच बाह्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

0000000
अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांबाबत
तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु
नांदेड दि. 7 :-  जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांवर रस्ता किंवा पदपथ यांच्या उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांबाबत तक्रार व हरकत दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. या कक्षाकडे लेखी किंवा दूरध्वनीवरुन तक्रार करता येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या प्रगटनात म्हटले आहे की , अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे सुनावणीनंतर सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, पदपथ यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात येत आहे. या प्रगटनाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सार्वजनिक मालमत्तेवर अथवा रस्ता किंवा पदपाथ यावर अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात येत असल्यास, त्याच्या बांधकामाबाबत तक्रार अगर हरकत असल्यास या तक्रार निवारण कक्षाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचा ईमेल पत्ता nandedrdc@gmail.com यावर लेखी स्वरुपात किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 235077‍ वर किंवा नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक 1077 वर संपर्क साधून तक्रार दाखल करावी.

0000000
जिल्हयातील सर्व न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत
भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा..!
नांदेड दि. 7 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, नांदेडच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा न्यायालयात लोकअदालतीसाठी एकूण आठ पॅनल तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रलंबित प्रकरणे दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय यांचे पॅनलसुध्दा त्या-त्या न्यायालयात कार्यरत आहेत. दिवाणी फौजदारी प्रकरणे, एन.आय.अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भूसंपादन, महसूल विद्युत प्रकरणे, कामगारांचे वाद, कौटुंबिक वाद इतर तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आली असून ती सामंजस्याने मिटविण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा सरकारी की, सहाय्यक सरकारी की, सर्व विधिज्ञ, भूसंपादन अधिकारी, विद्युत वितरण कंपनी अधिकारी, विविध विमा कंपन्यांचे अधिकारी, मनपा अधिकारी, हे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, जिल्हा सरकारी की अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, जिल्हा अभियोक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, सचिव अॅड. एन.एल.कागणे सर्व सदस्य तसेच विविध विमा कंपनी, विद्युत ंपनी, मनपा, महसुल विभाग यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली निघतील असा विश्वास  सविता बारणे यांनी व्यक्त केला आहे. या दिवशी होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेवून जास्तीतजास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे प्रभारी सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी केले आहे.

000000
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 7 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत हे रविवार 9 एप्रिल 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 9 एप्रिल 2017 रोजी शासकीय विश्रामगृह लातूर येथून मोटारीने सकाळी 8.30 वा. नायगाव (बा) ता. नायगाव येथे आगमन व पांडुरंग शिंदे प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- जयराज पॅलेस नांदेड रोड नायगाव (बा.). दुपारी 1 वा. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- गडगा ता. नायगाव येथील अर्जुन कानोले यांचे शेत. दुपारी 2 वा. मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील व दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत आणि स्वच्छता विभाग, कृषी विभागातील विविध योजनांचा आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायंकाळी 5.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. नांदेड रेल्वे स्टेशन येथून सायंकाळी 6.05 वा. देवगिरी एक्सप्रेसने मनमाडकडे प्रयाण करतील.

000000
आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांचा दौरा
नांदेड दि. 7 :-  राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा मंगळवार 11 एप्रिल 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 11 एप्रिल 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण  व राखीव. सकाळी 10.30 वा. नांदेड येथून कोरटा ता. उमरखेड जि. यवतमाळकडे मोटारीने प्रयाण करतील. कोरटा ता. उमरखेड येथून मोटारीने सायंकाळी 5 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व सायं. 6.10 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन ;
8 एप्रिल पासून जयंती दिनापर्यंत विविध उपक्रम
नांदेड दि. 7 :-  राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा शनिवार 8 एप्रिल 2017 ते शुक्रवार 14 एप्रिल 2017 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहेत. त्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमीत केला आहे. त्यानुसार या सप्ताहात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. कलम 46 मध्ये राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्देशाचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय , आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत. याकरीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या समता सप्ताहाचे शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी राज्यभर एकाचवेळी उद्घाटन होणार आहे. त्यापुढे रविवार 9 एप्रिल ते 13 एप्रिल 2017 यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. ज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व त्याअंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पद्धतीने करण्यात येते याबाबतची माहिती व्हावी यासाठीचे उपक्रम. शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय व अनुदानीत वसतीगृहामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील लघूनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धांचे आयोजन. रक्तदान शिबीर, जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान. सामाजिक क्षेत्रातील विचारवंत, पत्रकार आदींचे समाज प्रबोधनवर विविध विषयांवर व्याख्यान, नामवंत लोककलावंताचे प्रबोधनपर कार्यक्रम अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शुक्रवार 14 एप्रिल 2017 रोजी जिल्हा स्तरावर अभिवादनाचे कार्यक्रम होतील व त्यानंतर या सप्ताहाची सांगता होईल.

000000
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
थावरचंद गेहलोत यांचा दौरा
नांदेड दि. 7 :-  केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत हे रविवार 9 एप्रिल 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 9 एप्रिल 2017 रोजी हैद्राबाद येथून रेल्वेने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 5.30 ते 10 वाजेपर्यंत नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10.30 ते दुपारी 2 यावेळेत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वा. नांदेडहून मोटारीने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...