भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक
समता सप्ताहाचे आयोजन ;
8 एप्रिल पासून जयंती दिनापर्यंत विविध उपक्रम
नांदेड दि. 7 :- राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
सप्ताह" हा शनिवार 8 एप्रिल 2017 ते शुक्रवार 14 एप्रिल 2017 या कालावधीत
साजरा करण्यात येणार आहेत. त्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन
निर्णय निर्गमीत केला आहे. त्यानुसार या सप्ताहात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित
करण्यात येणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय
राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये
एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने
समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व
गांभीर्याने नमूद केलेली आहे. कलम 46 मध्ये राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत:
अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक
हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण
करील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्देशाचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व
प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय , आर्थिक व सामाजिक संरक्षण
उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने
अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध
कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती
सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत. याकरीता राज्यात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या समता सप्ताहाचे शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी
राज्यभर एकाचवेळी उद्घाटन होणार आहे. त्यापुढे रविवार 9 एप्रिल ते 13 एप्रिल 2017
यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. ज्यामध्ये सामाजिक न्याय
विभागाअंतर्गत सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व त्याअंतर्गत
कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पद्धतीने करण्यात येते याबाबतची माहिती व्हावी
यासाठीचे उपक्रम. शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय व
अनुदानीत वसतीगृहामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील लघूनाट्य, प्रश्नमंजुषा,
वादविवाद स्पर्धांचे आयोजन. रक्तदान शिबीर, जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी तसेच
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान. सामाजिक
क्षेत्रातील विचारवंत, पत्रकार आदींचे समाज प्रबोधनवर विविध विषयांवर व्याख्यान,
नामवंत लोककलावंताचे प्रबोधनपर कार्यक्रम अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश
आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शुक्रवार 14 एप्रिल 2017
रोजी जिल्हा स्तरावर अभिवादनाचे कार्यक्रम होतील व त्यानंतर या सप्ताहाची सांगता
होईल.
000000
No comments:
Post a Comment