Monday, August 9, 2021

 

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात या कालावधीत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन  भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने भारतीय स्वांतत्र्य चळवळीला उजाळा देण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीवर आधारीत ग्रंथाचे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन रिटार्यड ऑनररी कॅप्टन तथा उपाध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना प्रकाश कस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीतील विविध वैशिष्ट्यपुर्ण आठवणींना उजाळा दिला तसेच उपस्थित सर्वांना भारतीय सेना सेवा यासंदर्भांत मार्गदर्शंन केले. यावेळी रिटार्यड सार्जंट तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटना संजय पोतदार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रताप सुर्यवंशी, के. एम. गाडेवाड, उध्दव रामतीर्थकर, संजय पाटील, गजानन कळके  व इतर ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हे ग्रंथ प्रदर्शन 9 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधी सर्वांसाठी खुले असुन या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ, घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. तसेच अमृत महोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रमादरम्यान संविधान दिनानिमीत्त 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व प्रजासत्ताक दिनानिमीत्त 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत देखील ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

0000




 

जिल्ह्यातील 68 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 68 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 10 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी जंगमवाडी येथे कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 16 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.  

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय उमरी, लोहा या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 21 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 14 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 8 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 64 हजार 895 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 9 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 70 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 29 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 99 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 305 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 226 एवढी झाली असून यातील 87 हजार 521 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 48 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तींला सुट्टी देण्यात आली. 

आज 48 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 131, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 77 हजार 137

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 74 हजार 796

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 226

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 521

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-25

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-48

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.

00000

 मान्यवराच्या उपस्थितीत रानभाज्या महोत्‍सवाचे उद्घाटन

वाघाटे पासून कुर्डू पर्यंतच्या रानभाज्यांनी वेधले लक्ष   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात आज आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्‍सवाचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे व बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्‍हा परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पदिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची उपस्थिती होती. 

एरवी दुर्मीळ असलेल्या रानभाज्यातील कुरडूपासून वाघाटेपर्यंतच्या रानभाज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, जंगल, जमीन यातील जैवविविधतेला जपत आदिवासी बांधवांनी रानभाज्याचे महत्व आणि त्यातील आयुर्वेदिक तत्व जपून ठेवले आहे. आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी महोत्सवात श्रावणात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश रानभाज्या येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे करडीचे तेल, गहू, सर्व डाळी व भुईमुगाच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्सचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. 

मानवी आरोग्‍यामध्‍ये सकस अन्‍नाचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. सकस अन्‍नामध्‍ये विविध भाज्‍यांचा समावेश होतो. सध्‍याच्या परिस्थितीमध्‍ये रानातील म्‍हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्‍या उगवल्‍या जाणाऱ्या रानभाज्‍या, रानफळांचे महत्‍व व आरोग्‍यविषयक माहिती सर्वसामान्‍य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. रानभाज्‍यांचा समावेश हा त्‍या-त्‍या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो. रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असतात. यात शेतकरीगट व महिलागटांचा सक्रिया सहभाग आहे. हा महोत्सव सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरु राहणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. 

0000





 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...