Saturday, July 9, 2022

 नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा

सोयाबीन पेरणीचा प्रयोग अनुकरणीय

- कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्यात दिनांक 8 जून रोजी विविध ठिकाणी भेटी देऊन पीक पेरणीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. कासारखेडा तालुका नांदेड येथे शेतकऱ्यांनी बेडवर टोकन पद्धतीने व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक व अभिनंदन त्यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे तयार करून स्वतः यावर्षी वापरले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बीबीएफ आणि टोकन पद्धतीने पेरणी झाली असून उगवण चांगली झाली आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असून या पद्धतीचा इतर शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी केले. 

कासारखेडा हे गाव राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत निवडले असून या गावात 100 हेक्टर वर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी बाबाराव गोविंदराव आढाव,  मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील , सतिश सावंत, कृषी पर्यवेक्षिका शिंदे सुप्रिया, कृषी सहायक वसंत जारीकोटे, चंद्रकांत भंडारे, देवजी बारसे, रमेश धुतराज, कृषी मित्र उमेश आढाव, राजाराम शिंदे, सोनाजी आढाव, शिवदास कडेकार, राष्ट्रपाल झिंझाडे, आत्मा यंत्रणेचे बिटीएम चंद्रशेखर कदम, भालकी गावचे उपसरपंच राजू धाडवे, दशरथ आढाव आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 

धामदरी तालुका अर्धापूर येथील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेस भेट देऊन सौ. गंगाबाई शामराव कदम या महिला शेतकऱ्याचे कौतुक केले. या ठिकाणी मागील वर्षभरात सुमारे 25 लाख भाजीपाला  रोपे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली आहेत. यामधून सदरील महिलेस सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा नफा झाला आहे अशा पद्धतीच्या रोपवाटिका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उभाराव्यात असे आवाहन एकनाथ डवले यांनी यावेळी केले. 

यावेळी धामधरी येथील महिला शेतकऱ्यांना श्री डवले यांचे हस्ते महाबीजचे भाजीपाला मिनीट बियाणे वाटप करण्यात आले. भाजीपाल्याचा महिला शेतकऱ्यांनी आपल्या आहारात व कुटुंबाच्या आहारात समावेश करावा, असेही एकनाथ डवले यांनी सांगितले. या ठिकाणी दिगांबर रामराव कदम यांचे शेतावरील बीबीएफ वरील पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, तालुका कृषि अर्धापूर संजय चातरमल, अर्धापुर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी , शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय कदम,  गावचे सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000



 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  176 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणी द्वारे नांदेड मनपा 2, मुदखेड 1, मुखेड 1 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 953 एवढी झाली असून यातील 1 लाख 228 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 33 रुग्ण उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 1 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 1 असे एकूण 2 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 10, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 22, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 असे एकुण 33 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 9 हजार 779

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 89 हजार 486

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 953

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 228

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-33

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 0000

 सोयाबीन आणि कापूस उत्पादकतेत

वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत 

- कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यावर्षी राज्य शासनामार्फत नांदेड जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून विविध पातळीवर शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळाच्या माध्यमातून उत्पादकता वाढ करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले. येथील  जिल्हाधिकारी कार्यालयात 8 जुलै रोजी आयोजित कृषी विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   

नांदेड जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन बियाणे मध्ये शेतकऱ्यांनी चांगले कार्य केले असून ते राज्यासाठी आदर्शवत आहे. नांदेड जिल्ह्यात या खरीप हंगामात एकुण 7.66 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले असुन जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आतापर्यंत सुमारे 87 टक्के क्षेत्रावर खरीप हंगामात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. खतांचा देखील मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. विविध योजनांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात यावा. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी ग्राम परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट योजना जिल्ह्यात राबविली जात असून या योजनेस गती द्यावी तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा. 

नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अवजारे बँक व इतर योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ दिल्याने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन  इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कापूस संशोधन केंद्र प्रमुख खिजर  बेग, अरविंद पांडागळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महाबीजचे अधिकारी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे अधिकारी व जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

00000






 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 58.80 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात जुलै शनिवार 9 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 58.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 313.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शनिवार 9 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 95.70 (364.80), बिलोली-60.20 (253.70), मुखेड- 30.60 (337.10), कंधार-52.90 (384.90), लोहा-69.90 (331.50), हदगाव-49.30 (247.90), भोकर- 78.30 (273.30), देगलूर-29.90 (330.90), किनवट-30.80 (300.10), मुदखेड- 110.20 (430.10), हिमायतनगर-60.80 (389.70), माहूर- 27.70 (219.20), धर्माबाद-65.70 (270.90), उमरी- 76.10 (335.50), अर्धापूर- 110.80 (312.30), नायगाव- 61.10 (246.40) मिलीमीटर आहे.

0000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...