Saturday, July 9, 2022

 सोयाबीन आणि कापूस उत्पादकतेत

वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत 

- कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यावर्षी राज्य शासनामार्फत नांदेड जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून विविध पातळीवर शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळाच्या माध्यमातून उत्पादकता वाढ करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले. येथील  जिल्हाधिकारी कार्यालयात 8 जुलै रोजी आयोजित कृषी विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   

नांदेड जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन बियाणे मध्ये शेतकऱ्यांनी चांगले कार्य केले असून ते राज्यासाठी आदर्शवत आहे. नांदेड जिल्ह्यात या खरीप हंगामात एकुण 7.66 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले असुन जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आतापर्यंत सुमारे 87 टक्के क्षेत्रावर खरीप हंगामात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. खतांचा देखील मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. विविध योजनांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात यावा. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी ग्राम परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट योजना जिल्ह्यात राबविली जात असून या योजनेस गती द्यावी तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा. 

नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अवजारे बँक व इतर योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ दिल्याने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन  इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कापूस संशोधन केंद्र प्रमुख खिजर  बेग, अरविंद पांडागळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महाबीजचे अधिकारी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे अधिकारी व जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

00000






No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...