Thursday, February 7, 2019

हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 7 :-जिल्हयात हरभरा पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस.जी 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. मररोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी  झाडे उपटुन नष्ट करावीत हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी.  सुखदेव यांनी केले आहे.
000000

डाक तिकिट प्रदर्शनास
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
नांदेड, दि. 7 :- शालेय विद्यार्थांसाठी डाक तिकिटांचे प्रदर्शन नुकतेच येथील भारतीय डाक विभागात भरविण्यात आले होत. त्यास विद्यार्थांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. डाक तिकीटा विषयी रुची वाढावी यादृष्टीने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनासाठी  निवृत्त शिक्षक श्री सोनावणे यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या संग्रहित तिकिटांचा यावेळी लाभ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना तिकीटाविषयी माहिती सांगण्यात आली. या तिकीट प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी डाक अधिक्षक कार्यालय तसेच मुख्य डाकघर नांदेड येथील कर्मच्याऱ्यांनी प्रयत्न केले.
00000


रस्ता सुरक्षा नियमांची जनजागृती
नांदेड, दि. 7 :- रस्ता सुरक्षा अभियानात रस्ता सुरक्षेबाबत नियमाचे पालन करण्याविषयी पथनाट्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. यातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने होणारी जिवित हानी याची माहिती देण्यात आली.
बारड, तरोडा नाका, आनंदनगर चौक येथे आयोजित पथनाट्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पथनाट्याच्या पथकासोबत वायुवेग पथक क्र. 1 चे मोटार वाहन निरीक्षक सुनिल पायघन, सहा. मोटार वाहन निरिक्षक संजय पल्लेवाड यांची उपस्थिती होती. यावेळी रस्ता सुरक्षेविषयी लिफलेट, माहिती पत्रके व माहिती पुस्तिका नागरिकांना देण्यात आली. तसेच राज्य परिवहन महामंडळ परिसरात वाहन चालक, वाहक यांचा प्रबोधनवर्ग घेण्यात आला. सुरक्षित वाहतुक, इंधन बचतीबाबत माहिती देवून पुस्तिका, माहिती पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी नागरिकांसह चालक, वाहक, तांत्रिक कामगार उपस्थित होते.
00000


प्रधानमंत्री किसान सन्‍मान
निधी योजनेची अंमलबजावणी सुरु
नांदेड, दि. 7 :- शेतकऱ्यांना निश्चित उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी केंद्र सरकार पुरस्‍कृत प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेची लोहा तालुक्यात अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली असून अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुंटूबाला प्रती वर्षी 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्‍यात उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.
या योजनेची तात्‍काळ अंमलबजावणी करण्‍यासाठी तहसिलदार यांनी एक विशेष बैठक घेतली. त्‍यात तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी / तलाठी यांना योजनेची माहिती दिली व या योजनेची गाव पातळीवर माहिती देवून तात्‍काळ अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्‍याचे निर्देश दिले.
       प्रत्‍येक गाव निहाय खातेदार शेतकऱ्यांची संगणीकृत यादी करण्‍यात येणार आहे. तसेच वनहक्‍क कायद्याअंतर्गत जिल्‍हा समितीने पात्र केलेल्‍या शेतकरी कुटूंबाचा सुध्‍दा या योजने करीता समावेश करण्‍यात यावा अशा सुचना देण्‍यात आल्‍या.
       ज्‍या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्‍टर पर्यंत असेल त्‍यांना या योजना अनुज्ञेय आहे. खातेदारांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्‍यानंतर ज्‍या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण धारण क्षेत्र दोन हेक्‍टर किंवा त्‍यापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबाची यादी तयार करण्‍यात येणार असून 1 फेब्रूवारी 2019 रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. या यादीत पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक आदि माहिती संकलीत करण्‍यात येणार आहे.
या योजनेत संवैधानिक पद धारण करणारे, केलेले आजी माजी व्‍यक्‍ती, आजी माजी राज्‍यसभा सदस्‍य, माजी खासदार, आजी राज्‍यमंत्री, माजीमंत्री विधानसभा, आजी-माजी महानगरपालीकेचे महापौर, विधान परीषद सदस्‍य, जिल्‍हा परीषदेचे अध्‍यक्ष, केन्‍द्र व राज्‍य शासनाचे अधिकारी, कर्मचारी स्‍वायत्‍त संस्‍थाचे अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्‍यक्‍ती, 10 हजार रुपये किंवा त्‍यापेक्षा जास्‍त निवृत्‍तवेतनधारक व्‍यक्‍ती, नोंदणीकृत व्‍यवसायीक डॉक्‍टर, वकील, चार्टर्ड आकाऊटंट सनदी लेखापाल, आर्किटेक्‍ट  इत्‍यादी क्षेत्रातील व्‍यक्‍तींना या योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी पात्र असणार नाहीत, असेही म्हटले आहे.
000000


कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 11 फेब्रुवारी 2019 रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. सगरोळी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आयोजित कृषि तंत्रज्ञान महोत्सव शेतकरी व महिला मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- सगरोळी ता. बिलोली. दुपारी 12 वा. सगरोळी येथून मोटारीने बिलोलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. कृषि, पणन व पाणीपुरवठा विभाग देगलूर व बिलोली उपविभाग आढावा बैठक. स्थळ- उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालय बिलोली. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे राखीव. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथून मोटारीने मांजरम ता. नायगावकडे प्रयाण. सायं 4 वा. रयतक्रांती संघटना शाखा उद्घाटन कार्यक्रम. स्थळ- मांजरम ता. नायगाव. सायं 5 वा. मांजरम गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा व भव्य शेतकरी मेळावा. स्थळ- मांजरम ता. नायगाव. रात्री 8 वा. मांजरम येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...