Thursday, February 7, 2019


प्रधानमंत्री किसान सन्‍मान
निधी योजनेची अंमलबजावणी सुरु
नांदेड, दि. 7 :- शेतकऱ्यांना निश्चित उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी केंद्र सरकार पुरस्‍कृत प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेची लोहा तालुक्यात अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली असून अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुंटूबाला प्रती वर्षी 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्‍यात उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.
या योजनेची तात्‍काळ अंमलबजावणी करण्‍यासाठी तहसिलदार यांनी एक विशेष बैठक घेतली. त्‍यात तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी / तलाठी यांना योजनेची माहिती दिली व या योजनेची गाव पातळीवर माहिती देवून तात्‍काळ अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्‍याचे निर्देश दिले.
       प्रत्‍येक गाव निहाय खातेदार शेतकऱ्यांची संगणीकृत यादी करण्‍यात येणार आहे. तसेच वनहक्‍क कायद्याअंतर्गत जिल्‍हा समितीने पात्र केलेल्‍या शेतकरी कुटूंबाचा सुध्‍दा या योजने करीता समावेश करण्‍यात यावा अशा सुचना देण्‍यात आल्‍या.
       ज्‍या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्‍टर पर्यंत असेल त्‍यांना या योजना अनुज्ञेय आहे. खातेदारांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्‍यानंतर ज्‍या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण धारण क्षेत्र दोन हेक्‍टर किंवा त्‍यापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबाची यादी तयार करण्‍यात येणार असून 1 फेब्रूवारी 2019 रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. या यादीत पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक आदि माहिती संकलीत करण्‍यात येणार आहे.
या योजनेत संवैधानिक पद धारण करणारे, केलेले आजी माजी व्‍यक्‍ती, आजी माजी राज्‍यसभा सदस्‍य, माजी खासदार, आजी राज्‍यमंत्री, माजीमंत्री विधानसभा, आजी-माजी महानगरपालीकेचे महापौर, विधान परीषद सदस्‍य, जिल्‍हा परीषदेचे अध्‍यक्ष, केन्‍द्र व राज्‍य शासनाचे अधिकारी, कर्मचारी स्‍वायत्‍त संस्‍थाचे अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्‍यक्‍ती, 10 हजार रुपये किंवा त्‍यापेक्षा जास्‍त निवृत्‍तवेतनधारक व्‍यक्‍ती, नोंदणीकृत व्‍यवसायीक डॉक्‍टर, वकील, चार्टर्ड आकाऊटंट सनदी लेखापाल, आर्किटेक्‍ट  इत्‍यादी क्षेत्रातील व्‍यक्‍तींना या योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी पात्र असणार नाहीत, असेही म्हटले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...