Thursday, September 7, 2017

दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 7 :- दिपावली उत्सव बुधवार 18 ऑक्टोंबर ते शनिवार 21 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत साजरा होणार आहे. या कालावधीतील तात्पुरती फटाका विक्रीची दुकाने सुरु करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी तर जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्‍यांच्या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज सोमवार 25 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने केले आहे.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार शनिवार 16 सप्टेंबर ते सोमवार 25 सप्टेंबर 2017 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.   नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 86(3) अन्‍वये सदर व इतर दुकान यात किमान 15 मीटरचे अंतर असणे आवश्‍यक  आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा. नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. परवाना शुल्कासाठी 500 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड किंवा संबंधीत नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांचे  नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत, मान्यता प्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद ज्या अटी व शर्तीनुसार संबंधीत दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. तसेच कोणत्याही विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत असोसिएशनची असले याबाबत संबंधीत असोसिएशनकडील शपथपत्र. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इ.. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने मंगळवार 3 ऑक्टोंबर व बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍यामार्फत तसेच उ‍पविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍यामार्फत दिले जातील.
       या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करुन ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरुपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

000000
मदरसांना पायाभुत सुविधा ,
शिक्षक वेतनासाठी अनुदान योजना
अर्ज करण्यास 18 सप्टेंबरची मुदत   
नांदेड, दि. 7 :-  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान 2017-18 साठी ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणासाठी  शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍याक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्‍छुक मदरशांनी विहित नमुन्‍यातील परिपुर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
मदरसाची धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणी आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. शासन निर्णयाच्‍या तरतुदीनुसार पुढील बाबींसाठी विहित नमुन्‍यात अर्ज करता येतील. विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍यासाठी शिक्षकांना मानधन देणे. पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान आणि मदरशांमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांसाठी शिष्‍यवृत्ती. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतुदीनुसार जास्‍तीतजास्‍त तीन डी. एड / बी. एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इत्यादी व प्रयोगशाळेचे साहित्‍य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

00000
अल्‍पसंख्‍याक शाळेच्या पायाभुत
सोयी सुविधांसाठी अनुदान योजना
अर्ज करण्यास 18 सप्टेंबरची मुदत  
नांदेड दि. 7 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा  यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा योजनेकरीता परिपुर्ण अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्‍याकडून शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व नगरपालिका, नगरपरिषद शाळामध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहे.
शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडूजी. ग्रंथालय अद्ययावत करणे. संगणक कक्ष उभारणे/अद्यावत करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्‍यक फिर्निचर. इन्‍व्‍हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर, इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे / डागडूजी करणे. झेरॉक्‍स मशीन. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर. या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत.

0000000
ग्रंथालय पुरस्कारांसाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 7 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता सेवक ग्रंथमित्र पुरस्कार सन 2017-18 च्या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज बुधवार 20 सप्टेंबर 2017 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड या कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे सहाय्यक ग्रंथालय संचालक (औरंगाबाद) अशोक गाडेकर,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे  यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा. त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या द्देशाने दरवर्षी  "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता सेवक ग्रंथमित्र पुरस्कार " देण्यात येतो.
राज्यातील शहरी ग्रामीण विभागातील "" "" "" "" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये, 20 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र स्मृतिचिन्ह सन्मानपूर्वक देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता सेवक यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख पारितोषिक,सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.

000000
क्रीडा स्पर्धांच्या तारखेत बदल
नांदेड दि. 7 :-  जिल्हास्तर शालेय (ग्रामीण क्षेत्र) क्रीडा स्पर्धांच्या तारखेत पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. सर्व गट मुले व मुलींचे  बुधवार 13 सप्टेंबर रोजी  जिम्नॅस्टीक्स, गुरुवार 14 सप्टेंबर रोजी योगा, किकबॉक्सिंग सोमवार 18 सप्टेंबर 2017 रोजी. या बदलाची संबंधीतांनी नोंद घेऊन संघ उपस्थित ठेवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...