Sunday, February 23, 2025

वृत्त क्रमांक  218

आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे 

 डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार 

नांदेड दि. २३ फेब्रुवारी : या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प असून शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय यांना सुखावणारा अर्थसंकल्प केंद्रातील प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने सादर केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

 पालकमंत्री एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आले आहेत. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा समारोप आहे. समारोपीय सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपछेडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या अर्थसंकल्पाचे पालकमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यामुळे सर्वांसाठी उपयुक्त असा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या मनातला अर्थसंकल्प होता अनेक व्यापाऱ्यांनी मला स्वतः फोन करून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पासंदर्भात स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.

किसान क्रेडिट कार्ड ची व्याप्ती पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले असून नव्या जमान्याच्या आरटीफिसीएल इंटेलिजन्सचा वापर भारताच्या सर्व क्षेत्रातील विकासासाठी करण्याकडे केंद्र शासनाचा कल आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकारणारा हा अर्थसंकल्प असून या देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी अर्थसंकल्पावरील आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी 1 लक्ष 37 हजार 7 56 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकासासाठी एक कोटी 90 लक्ष 405 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी दोन लक्ष 55 हजार 445 कोटींची तरतूद केली आहे यामध्ये सर्वाधिक लाभ हा महाराष्ट्राचा होणार आहे महाराष्ट्रामधील रेल्वे प्रकल्पाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 तत्पूर्वी ,पत्रकारांशी बोलताना त्यांनी नांदेडच्या डीपीसीचा निधी निश्चित वाढून मागू. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे  सांगितले. नांदेड परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायात गुंतवणूक झाली पाहिजे. या संदर्भात प्रयत्नरत असून या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग समूह यावेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.

 नांदेड येथे आयुक्तालय आणण्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या अखत्यारितील असून त्याचे त्यांचे त्याबद्दलचे काय मत आहेत हे नक्की जाणून घेऊ असे त्यांनी सांगितले. नांदेडच्या पर्यटनाच्या विकासाबद्दल, गोदावरी नदीच्या स्वच्छता व पर्यटन वृद्धीसाठी पालकमंत्री म्हणून अतिशय जबाबदारीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 मन की बात कार्यक्रमात सहभाग 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमांमध्ये आज पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ.अजित गोपछडे व अन्य मान्यवरांनी सहभाग घेतला.

0000





 


वृत्त क्रमांक 217

मंत्रमुग्ध सादरीकरणाने महसूलच्या सांस्कृतिक सोहळ्याची सांगता 

राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 

नांदेड दि. २३ फेब्रुवारी : महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये काल शनिवारी दुसऱ्या व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी अमरावती छत्रपती संभाजी नगर व पुणे विभागाने अप्रतिम सादरीकरणाने शेकडो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभागाच्या या सादरीकरणाचे कौतुक करीत अत्युउत्कृष्ट शेरा दिला.

नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आलेले सादरीकरण लक्षवेधी होते. कार्यक्रम बघताना हा कार्यक्रम महसूल कर्मचाऱ्यांचाच आहे यावर विश्वासच बसू नये, इतके भव्य दिव्य सादरीकरण प्रत्येक विभागाने सादर केले.

अमरावती विभागाने वंदन गीत, समूहगीत, वादन, मूकनाटिका, नक्कल,युगल गायन, एकपात्री प्रयोग, नाटक या सर्व गटामध्ये अतिशय उत्तम असे सादरीकरण केले. संभाजीनगर विभागाने महाभारतातील कृष्ण अर्जुन संवादासाठी थेट रथच मंचावर आणला. तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभे राहून या सादरीकरणाला सलामी दिली. ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या या संवादात सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी अतिशय व्यावसायिक पद्धतीने अभिनय केला. सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांचे कथ्थक नृत्य आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादर केलेले सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही हे गीत संपूर्ण प्रेक्षागृह डोक्यावर घेणारे ठरले. छत्रपती संभाजी नगर या चमूमध्ये स्थानिक अधिकारी कर्मचारी कलाकार मोठ्या संख्येने असल्यामुळे अधिकच माहौल झाला.

मात्र,या सर्वसादरीकरणावर कळस चढवला तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा स्वारीने. पुणे विभागाने हे अप्रतिम सादरीकरण केले. वंदन गीतापासून,वादन,गायन ,नृत्य, सर्व स्पर्धेचे प्रकार त्यांनी या नाट्यछटेमध्ये घेतले. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम नाट्य स्वरूपात सादर करताना निवडलेले प्रसंग अप्रतिम होते. छत्रपती शिवरायांना कठीण प्रसंगी मावळे का साथ देतात आणि छत्रपतींसाठी एक एक मावळा हा किती महत्त्वाचा होता याचे अप्रतिम सादरीकरण पुणे विभागाने केले. पुणे विभागाच्या या सादरीकरणाने उपस्थित सर्व मान्यवरांना रसिक श्रोतांना मंत्रमुग्ध केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या दोन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व विभागाच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांचे कौतुक केले. 24 तास सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी वेळ मिळेल तेव्हा आपल्या कलागुणांना जिवंत ठेवून त्याचे सादरीकरण करण्यास अशा संधीचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सर्व विभागाच्या सादरीकरणाला त्यांनी अत्युत्कृष्ट शेरा दिला. सर्वांचे कौतुक करून आभार मानले.

00000
































वृत्त क्रमांक   218 आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे   डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदे...