Saturday, April 30, 2022

अक्षय्य तृतीया व अशा काही विशीष्ट मुहुर्तावर होणारे

बालविवाह थांबण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात व राज्यात अक्षय तृतीया, तुळशी विवाह अशा काही मोजक्या मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात बालविवाह लावण्याची पद्धत असते. परंतु कायद्याने हा गुन्हा असल्याने असे बालविवाह जिल्ह्यात होऊ नये यासाठी नेमून दिलेल्या यंत्रणेकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवल्यास बालविवाह रोखता येतो. असे बालविवाह आढळून आल्यास त्या पालकांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम समजून सांगावे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेला तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला बाल कल्याण समिती आणि चाईल्ड लाईन सतर्क झाले आहेत. 

‌महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अन्वये करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 मधील कलम 10 (1) (जे) नुसार स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे हा आयोगाच्या स्थापने मागचा उद्देश आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना असे निदर्शनास आले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात आजही अक्षय्य तृतीया व तुळशी विवाह अशा विशेष दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात विवाह व बालविवाह होत असतात. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असू नये, अशी तरतूद आहे. मुलींना लहान वयात विवाह झाल्यास तिची मानसिक व शारीरिक परिपक्वता न झाल्याने तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच मुलीच्या शरीराची पूर्ण वाढ न झाल्याने तिला मातृत्व आल्यास होणारे अपत्य ही कुपोषित होण्याची शक्यता अधिक असते. यास्तव बालविवाह सारख्या अनिष्ठ प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. बालहक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील बालविवाहांची जिल्हानिहाय प्रसिध्द केलेली आकडेवारी पाहता राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी महाराष्ट्रातील बालविवाहांची सद्य:स्थिती पाहता सदरचे बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. दिनांक तीन मे रोजी अक्षय्य तृतीया असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह व बालविवाह होण्याची शक्यता असते. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. यातील कलम 9,10,11 नुसार बाल विवाह करणाऱ्या आई - वडील, नातेवाईक, लग्न विधी लावणारे, मंडप, बँड वाले या सकट सर्व वऱ्हाडी यांवर 1 लाख रुपये दंड व 2 वर्षांपर्यंतचा करावासाची शिक्षा आहे. ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी व बालविवाह प्रतिबंधक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या यांचेमार्फत बालविवाह रोखण्यासंबंधी कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ़ आणि एस बी सी 3 यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 588 अग्रभागी कर्मचारी- ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका यांना बाल विवाहाची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी ग्रामपातळीवर यंत्रणांना हे प्रशिक्षण द्यावे तसेच जनजागृतीचे कार्यक्रम रबवावे व बाल विवाह रोखल्याचा अहवाल जिल्हा महिला ब बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेश कृपा शास्त्रीनगर- भाग्यनगर कार्यालय फोन 02462-261242 ह्या वर सादर करावा अशा सूचना देखील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक यंत्रणा यांना दिल्या आहेत.

0000

 जिल्हा परिषद स्थापनेला साठ वर्षे पूर्ण

आज हिरक महोत्सव कार्यक्रम ;

 

·       पालकमंत्री अशोक चव्हाण करणार मार्गदर्शन 

·       विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्यात  1 मे 1962 रोजी त्रिसदस्यीय कार्यपद्धती अस्तित्वात येऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्थापनेस 1 मे  रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्यातील जिल्हा परिषदअंतर्गत हिरक महोत्सव समारंभ साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार उद्या रविवार दिनांक 1 मे रोजी नांदेड जिल्हा परिषदेत  सकाळी 8.30 वाजता हिरक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. 

 

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले असून उपस्थितींना ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. 

 

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच उद्या 1 मे रोजी सकाळी 11.30 वाजता पुणे जिल्हा परिषदअंतर्गत हीरक महोत्सवानिमित्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा मागील 60 वर्षाचा मागोवा आणि भविष्यातील आव्हाने याविषयी राज्यसभेचे सदस्य शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री पुणे तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब व फेसबुकद्वारे करण्यात येणार आहे. हे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था नांदेड जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरक महोत्सव कार्यक्रमात उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...