Tuesday, August 20, 2024

 वृत्त क्र. 748

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड

नांदेड दि. २० ऑगस्ट : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 5016 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 98 आस्थापनाने 1024 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले आहेत.त्यापैकी 134 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले असून इतर उमेदवार रुजू होणे बाबतची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून  उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय तथा निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे.

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के किंवा किमान एक उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विभागामार्फत विद्यावेतन दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वरील वेबपोर्टलला भेट देवून योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्राच्या सहाय्यक संचालक रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
0000

 वृत्त क्र. 747

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दौरा

नांदेडवरून कृषी महोत्सवासाठी बीडला जाणार

नांदेड दि. 20 ऑगस्ट : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान  21 ऑगस्टला परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी उद्या गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर येणार आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीवरून दुपारी 12 वा. श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळावर पोहचणार आहेत. दुपारी 12.10 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथकडे प्रयाण करतील. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून वाहनाने नांदेड विमानतळ येथे रात्री 7.30 वा. आगमन. रात्री 7.40 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्र. 746

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये


महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करावी


नांदेडदि. 20 ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्याच्या एकत्रित लाभ त्यांच्या बँक खात्यात नुकताच जमा करण्यात आला आहे. परंतु काही बँकांनी या योजनेतर्गंत आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी बँकानी या योजनेतील लाभाची रक्कम इतर कर्जाच्या बदल्यात समायोजित न करता थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करावीअसे निर्देश शासनाच्यावतीने दिले आहेत.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरीत केलेले आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. या योजनेतील रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतर्गंत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावी. अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिल्या आहेत.

00000

वृत्त क्र. 745

शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय वर्कशाॅप

नांदेड, 20 ऑगस्ट :-शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस आयटी नांदेड, आयडिया लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आरडिनो वर्कशॉप नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राम मंठाळकर, डॉ. सौ. राजश्री सर्वज्ञ, आयडिया लॅब प्रभारी एसजीजीएस आयटी नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


आयडिया लॅब हा एआयसीटीई अर्थसहाय्य प्रोजेक्ट असल्याचे सांगितले. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना आभासी रुपाने प्रोजेक्ट विना खर्च तयार करण्यात येतो. आदर्श भोसले, शशांक गीते यांनी ड्रोन डेमो, तापमान मोजणी असे विविध प्रात्यक्षिके सादर केली.


मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत विभागाचे एकूण 96 विद्यार्थ्यानी या वर्कशॉपचा वापर करुन घेतला. या वर्कशॉप साठी संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी अनुदान उपलब्ध करुन दिले. विद्युत विभागाचे विभागप्रमुख वि.वि. सर्वज्ञ, अधिव्याख्याता प्रा. अब्दुल हैदी, पी.बी.खेडकर, प्रा. एस.गी. कदम, प्रा. पी.एस.लिंगे, प्रा. ओ.एस. चौहान, प्रा. एस.वि. बोदडे, प्रा. वाय.एस. कटके यांनी आयोजन केले. तसेच श्री. फुलवळकर, श्री. बैलवाड, श्री. झडते यांनी परिश्रम घेतले.  

00000




वृत्त क्र. 744

जर्मन शिकण्यास व जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक युवकांनी नावनोंदणी करा

नांदेड, 20 ऑगस्ट :- जर्मनीला नोकरी व रोजगारासाठी जाणाऱ्या कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गास जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळातील इच्छुक शिक्षकांनी तसेच जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या पात्र व कुशल युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्यामध्ये मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशामध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर राज्यातील युवकांना युरोपियन देशामध्ये नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेवून महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करुन उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार 25 फेब्रुवारी 2024 रोजी झाला आहे. तसेच 11 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये जर्मन भाषा शिकण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्युटमॅक्सम्युलर भवनपुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र पुणे यांच्यामध्ये ऑगस्ट 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर 25 विद्यार्थ्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10 हजार विद्यार्थ्यासाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. या प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने सकाळ व संध्याकाळ असे 200 प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता जर्मनमध्ये बीएएमए व ग्योथे इन्स्टिट्युट यांचेद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1,A2,B1,B2,C1,C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत सुरु करणे प्रस्तावित आहे.


शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी https://maa.ac.in/GarmanyEmployment/teacher-germany-employement.php ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. या लिंकवर शिक्षकांनी नावनोंदणी करावी. नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छूक शिक्षकांनी या लिंकवर आपली नाव नोंदणी करावीअसे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 11 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या राज्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/student-germany-employment.php या संकेतस्थळावर आपले नाव नोंदणी करावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र पुणे यांच्या सूचनेनुसार प्राचार्यजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे.

000000





वृत्त क्र. 743

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड20 ऑगस्ट :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2024 ही परीक्षा रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 आणि   दुपारी 3 ते सांयकाळी 5 या कालावधीत दोन सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे. 

या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडीओ, लॅपटॉप, तत्सम वस्तू वापरण्यास व बाळगण्यास, तसेच सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्र. 742

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम 


नांदेड, दि. 20 ऑगस्ट :- खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. 


राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 


वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञान वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी मूग,उडीद,ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन या  पिकासाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 


मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर व सोयाबीन ही पिक स्पर्धेतील पिके आहे.  या स्पर्धेसाठी पात्रतेच निकष पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक / पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे आहेत.  


अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. ज्वारी, बाजरी, तूर, व सोयाबिन, भुईमुग, सुर्यफुल - 31 ऑगस्ट. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.


स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील.

 

बक्षिस स्वरूप

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाठी रुपये पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा पातळी तालुका पातळीवर पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये, तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये राहिल, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

वृत्त क्र. 741

जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी

मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेडदि. 20 ऑगस्ट : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत सन्मान मानधन योजना ही सन 1954-55 पासून सुरु आहे. संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्यसंचालनालय विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. जेष्ठ साहित्यीक व कलावंतांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या https://mahakalasanman.org या वेबसाईटवर 30 सप्टेंबरपर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. यांनी केले आहे.

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेतील अर्जदारांनी सन 2023-24 चे प्रस्ताव शासन निर्णय क्र. वृकमा 2012/प्र.क्र.117/सां.का.04 दि. 7 फेब्रुवारी 2014 नुसार सादर करण्यात यावेत. तसेच शासन निर्णय 16 मार्च 2024 नुसार वर्ष 2024-25 चे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. कलावंतांना सरसकट एकच श्रेणी केली असून दरमहा 5 हजार इतके मानधन देण्यात येते. ज्या कलावंतानी कला व साहित्य क्षेत्रातील दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. ज्या कलावंताचे साहित्य क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षे योगदान दिले आहे व ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच आहे अशा 100 कलावंताची निवड दरवर्षी जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येते.

निवड झालेल्या कलावंतास तह्यात मानधन मिळेल त्यासाठी नव्याने प्रत्येक वर्षी अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. सन 2023-24 व सन 2024-25 साठी निवड करण्यासाठी टक्केवारी गट असंघटीत, संघटीत कला प्रकारातील लोककलावंत या गटासाठी 60 टक्के , भक्ती संप्रदायाशी संबंधीत कलाकार या गटासाठी 10 टक्के, चित्रपट व नाटय क्षेत्रातील कलाकार व साहित्यिक या गटासाठी 30 टक्के कलांवताची निवड केली जाईल.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला 50 वर्षापेक्षा जास्त  (दिव्यांगाना वयोमर्यादा 40 वर्षे), आधारकार्ड, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला 60 हजार रुपयांपर्यतचा, रहिवासी दाखला (तहसीलदार), प्रतिज्ञापत्र इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नसलेबाबत. पति-पत्नीचा एकत्रीत फोटो, बँक तपशील बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्रमांकासह, अपंगत्वाचा दाखला लागू असल्यास, राज्य , केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र, विविध पुरावे, मोबाईल क्रमांक, शासन निर्णय तरतुदीनुसार सर्व अटी व शर्ती लागू राहतील. या संबंधी माहिती जिल्हा परिषद नांदेड योच संकेतस्थळ zpnanded.in वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचे इतर वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...