वृत्त क्र. 722
डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे आज लोकार्पण
नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास यावे - खा.अशोक चव्हाण
नांदेड, दि.13 जुलै : नांदेड शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असुन भविष्यात नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन खा.अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळा आज दुपारी १२ वाजता माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी खा.डॉ.अजित गोपछडे, खा.प्रा.रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके बोंढारकर, मा.आ.अमर राजुरकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, महापालिकेचे माजी महापौर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मंचावर माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण व इतर मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराज यांना पुष्प अर्पण करून व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रेक्षागृहाच्या नूतनीकरण करण्यासंदर्भात माहिती विशद करून शहरामध्ये महापालिकेमार्फत होत असलेल्या विविध विकास कामांचा धावता आढावा यावेळी त्यांनी सादर केला.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रेक्षागृहाचे काम अतिशय दर्जेदार झाले असून नांदेडकरांसाठी आता अत्याधुनिक सुविधा असलेले प्रेक्षागृह उपलब्ध असणार असल्याने महानगरपालिकेच्या कामासंदर्भात समाधान व्यक्त करून शहरातील वाढती लोकसंख्या व व्याप्ती विचारात घेऊन महापालिकेने किमान दोन अधिकची प्रेक्षागृहे विकसित करावीत अशी सुचना यावेळी मान्यवरांनी केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या विकासाबाबत कायम कटिबद्ध असून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी नांदेडच्या विकासासाठी एकरुपी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या विविध निधीतुन व आम्हा राजकीय नेत्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रेक्षागृह तयार झाले आहे, असे खासदार चव्हाण म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
चौकट
या प्रेक्षागृहाचे नुतनीकरण करतांना अंतर्गत कामासाठी 5.14 कोटी तर बाह्य कामासाठी 8.12 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत.
अंतर्गत कामे :- प्रेक्षागृहातील आवाज नियंत्रित व अधिक आरामदायी आणि केंद्रित करण्यासाठी व प्रतिध्वनी व बाह्य आवाज कमी करणे या उपायोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ब्रिटिश अकॉस्टिक कंपनीची उच्च दर्जाची साऊंड सिस्टम बसविण्यात आली आहे. 800 आसन क्षमता त्यापैकी 180 चेअर या पुश बॅक प्रकारातील आहेत. 110 टन क्षमतेची डेक कंपनीची एअरकंडिशनिंग यंत्रणा. तसेच वुडन स्टेज फ्लोरिंग, अग्नि प्रतिबंधक उपाययोजना, स्टेजवरील प्रकाश योजना, व्हीआयपी रूम, कलाकारांची मेकअप रूम, पॅसेज, संपूर्ण फ्लोरिंग व टॉयलेट यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
बाह्य कामे:- फसार्ड क्लोडींग यामध्ये प्रेक्षागृहाचा दर्शनी भाग सौंदर्यपूर्ण दिसण्यासाठी झिंक कोटेड कंपोझिट पॅनल चा वापर करून कॅलीडिंग आली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षागृहासाठी लागणारी विद्युत निर्मिती करण्यासाठी 100kva क्षमतेचे सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच 500kva क्षमता असणारी डीडी सेट, मुख्य रस्ता ते प्रेक्षागृहाची कमान डेकोरेटिव्ह विद्युत पोल, संपूर्ण बाह्य परिसराचे नूतनीकरण त्यामध्ये संरक्षक भिंत, पेव्हर, लँड स्केपिंग, प्रवेश कमानी आणि अंडर ग्राउंड वॉटर टँकचा समावेश आहे. या नूतनीकरणाचे अंतर्गत बाबीचे काम सन्मान कन्स्ट्रक्शन, इंजिनिअर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नांदेड यांनी केले असुन तर बाह्य कामे मे.शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रा.लि. नांदेड यांनी केलेली आहेत.
याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधु,निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी रमेश चौरे, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा बेग, उपअभियंता सतीश ढवळे,प्रकाश कांबळे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, कनिष्ठ अभियंता ठाणेदार, राजकुमार बोडके, स्टेडियम विभागाचे कार्यालय अधिक्षक पुरुषोत्तम कामतगीकर, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे आदिंची उपस्थिती होती.
जनसंपर्क विभाग,
नां.वा.श.म.न.पा.नांदेड