Wednesday, March 16, 2022

 प्रशासकीय कामासमवेत आपल्या भागातील

ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा जतनासाठीही पुढे या

-  आयुक्त सुनील केंद्रेकर

 

·  प्रशासकीय अधिकाऱ्यांना आयुक्तांचे भावनिक आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- प्रशासनाचा भाग म्हणून सेवा बजावण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. शासनाचा एक घटक म्हणून आपली जबाबदारी ही अधिकाधिक चांगले कर्तव्याचे पालन करण्याशी आहे. तुम्ही ज्या भागाची सेवा बजावता तेंव्हा आपल्या प्रशासकिय कर्तव्यासमवेत त्या-त्या भागातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा स्थळांचे जतन कसे करता येईल, ही शक्तीस्थळे व यातील वैभव नव्या पिढीपर्यंत कसे प्रवाहित करता येईल याचा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे भावनिक आवाहन औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले.

 

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाचा सभागृहात महसूल, नगरपालिका प्रशासन व जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, कार्तिकेयन, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी व जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदी उपस्थित होते.

 

मराठवाड्यातील प्रत्येक भागाला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या काठावर असलेल्या विविध गावांमध्ये हजारो वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. आपण ज्या ठिकाणी उभे राहूत त्या ठिकाणी इतिहासाच्या पाऊल खुणा दडलेल्या आढळतील. जिल्ह्यातील किल्ले, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत ऐतिहासिक स्थळे याची सर्व माहिती ही जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये उपलब्ध आहे. प्रशासनाचा भाग म्हणून ज्या तालुक्याचे तुम्ही प्रतिनिधीत्व करता त्या तालुक्यातील केवळ भौतिक विकासाच्या सुविधा निर्माण करणाऱ्या कामापुरतीच आपली जबाबदारी आहे, असे नाही. काही विभागांकडे याबाबत असलेले छायाचित्रे, ऐतिहासिक दस्त जतन करून ठेवले पाहिजेत. कार्यालयीन कामांसमवेत त्या-त्या तालुक्यातील या वैभवाच्या केंद्रांना अधिक चांगले जतन कसे करता येईल, यात लोकसहभाग घेऊन हे वैभव पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहचवता येईल यादृष्टिने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन सुनिल केंद्रेकर यांनी केले. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी यादृष्टिने अधिक रचनात्मक काम करू शकतात. यात महसूल, जिल्हा  परिषद व इतर विभागाचे अधिकारी चांगले स्वरुप देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

सामान्य माणूस हा अनेक आव्हानांना घेऊन उभे राहण्याच्या प्रयत्नात असतो. अशा सामान्यांची कामे महसूल विभागाशी जर असतील तर त्याला अधिक त्रास सहन करावा लागतो, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यांचे प्रश्न हे साधे-साधे असतात. आपल्या व्यवस्थेकडून ते अधिक जटिल होणार नाहीत याची काळजी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी मानवी संवेदना जपत घेतली पाहिजे. अन्यथा महसूली प्रकरणात अडकलेली भांडणे पिढ्यानापिढ्या चाललेली आपण पाहतो. यात त्या कुटूंबाला जे काही सहन करावे लागते त्याचा विचारा आगोदर महसूल अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, असे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी स्पष्ट करून ई-फेरफार, हद्दपाार सारखी कारवाई खूप अभ्यासून केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

 

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुंदर माझे गाव, सुंदर कार्यालय, गाव तेथे स्मशानभूमी, प्रशासन आपल्या गावी, मिशन 500 अंतर्गत पांदण रस्ते, ई-फेरफार आदी बाबत झालेल्या कामांचा आढावा सादर केला.  

000000 

 अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज. मो. अभ्यंकर, तसेच सदस्य आर. डी. शिंदे (सेवा), सदस्य के. आर. मेढे (सामाजिक व आर्थिक), जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

गुरुवार 24 मार्च 2022 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा. भरतीअनुशेषप्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे तक्रार निवारण कक्ष आदी विषयावर बैठक. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद नांदेड सभागृह येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किनवट यांच्यासोबत आदिवासी विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक. सायं 4 ते 5 वाजेपर्यंत मा. अध्यक्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेडकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. सायं. 5 ते 6 वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या संघटना व व्यक्तीची निवेदने स्विकारतील, चर्चा व मुक्काम. शुक्रवार 25 मार्च 2022 सकाळी 9 वा. नांदेड येथून वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.

0000

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 774 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 794 एवढी झाली असून यातील 1 लाख 87 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये अँटिजेन तपासणीद्वारे किनवट 1 असे एकुण 1 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7 असे एकुण 15 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 88 हजार 613

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 68 हजार 741

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 794

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 87

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000


इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी विलंबाने उपस्थित राहणाऱ्या परीक्षार्थीना प्रवेश नाही 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत होत आहेत. या परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थीना प्रवेश नाकारण्यात येईल यांची पालक, शिक्षक व इतर संबंधित घटकांनी यांची नोंद घ्यावी, अशा सूचना लातूर विभागीय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.  

या परीक्षेसाठी विहित वेळेपेक्षा सकाळ सत्रात 10.30 व दुपार सत्रात 3 वाजता उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यपध्दती होती. उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत या वेळेत 10 मिनीटे उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा  करुन केंद्रसंचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. 10 मिनीटानंतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास केंद्रावर आल्यास व त्यामागचे कारण केंद्रसंचालकांना रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष/विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरुन पूर्वमान्यता घेवून आणखी 10 मिनीटे एकूण 20 मिनीटांचा विलंब क्षमापित करुन परीक्षार्थ्यांला परीक्षेस प्रविष्ठ करुन घेता येईल, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. 

या सवलतीचा लाभ घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने अशा प्रकरणांमध्ये संबंधीताविरुध्द गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत. या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होवू देण्याची सवलत 16 मार्च 2022 पासून बंद करण्यात आली आहे. याबाबत संबंधिताना पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्यापुर्वी 10 मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यत म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये 10.20 पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये दु. 2.50 पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होते वेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.30 वा व दुपारच्या सत्रामध्ये दु. 3 वाजेपर्यत आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांची तपासणी करुन विद्यार्थ्यांस विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी. परीक्षा सुरु झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.30 नंतर व दुपार सत्रामध्ये दु. 3 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवू नये. 

दक्षता पथकामार्फत परीक्षा केंद्र, उपपकेंद्राना  वारंवार भेटी देवून परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यांची परीक्षार्थी व सर्व संबंधित घाटकांनी नोंद घ्यावी, असेही लातूर विभागीय मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

00000


 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी साखर  नियतन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जानेवारी, फेब्रुवारी व मार्च 2022 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन मंजूर केले आहे. 

या तीन महिन्यासाठी शासनाकडून 2 हजार 151 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 151 , अर्धापूर 21.50, मुदखेड 34, कंधार 95, लोहा 139, भोकर 97.50, उमरी 57.50, देगलूर 134, बिलोली 121, नायगाव 120.50, धर्माबाद 68.50, मुखेड 151.50, किनवट 452, माहुर 205, हदगाव 204, हिमायतनगर 99  एकूण 2 हजार 151  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. 

सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी. जर कोणत्याही रास्तभाव दुकानदारांनी अंत्योदय लाभार्थ्यांस एखादा महिण्याची साखर कमी दिल्यास ती लाभार्थ्यांनी  घेवू नये व त्या रास्तभाव दुकानदाराची रितसर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...