Wednesday, March 16, 2022

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी विलंबाने उपस्थित राहणाऱ्या परीक्षार्थीना प्रवेश नाही 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत होत आहेत. या परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थीना प्रवेश नाकारण्यात येईल यांची पालक, शिक्षक व इतर संबंधित घटकांनी यांची नोंद घ्यावी, अशा सूचना लातूर विभागीय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.  

या परीक्षेसाठी विहित वेळेपेक्षा सकाळ सत्रात 10.30 व दुपार सत्रात 3 वाजता उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यपध्दती होती. उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत या वेळेत 10 मिनीटे उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा  करुन केंद्रसंचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. 10 मिनीटानंतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास केंद्रावर आल्यास व त्यामागचे कारण केंद्रसंचालकांना रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष/विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरुन पूर्वमान्यता घेवून आणखी 10 मिनीटे एकूण 20 मिनीटांचा विलंब क्षमापित करुन परीक्षार्थ्यांला परीक्षेस प्रविष्ठ करुन घेता येईल, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. 

या सवलतीचा लाभ घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने अशा प्रकरणांमध्ये संबंधीताविरुध्द गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत. या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होवू देण्याची सवलत 16 मार्च 2022 पासून बंद करण्यात आली आहे. याबाबत संबंधिताना पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्यापुर्वी 10 मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यत म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये 10.20 पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये दु. 2.50 पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होते वेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.30 वा व दुपारच्या सत्रामध्ये दु. 3 वाजेपर्यत आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांची तपासणी करुन विद्यार्थ्यांस विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी. परीक्षा सुरु झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.30 नंतर व दुपार सत्रामध्ये दु. 3 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवू नये. 

दक्षता पथकामार्फत परीक्षा केंद्र, उपपकेंद्राना  वारंवार भेटी देवून परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यांची परीक्षार्थी व सर्व संबंधित घाटकांनी नोंद घ्यावी, असेही लातूर विभागीय मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...