प्रशासकीय कामासमवेत आपल्या भागातील
ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा जतनासाठीही पुढे या
- आयुक्त सुनील केंद्रेकर
· प्रशासकीय अधिकाऱ्यांना आयुक्तांचे भावनिक आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 16 :- प्रशासनाचा भाग म्हणून सेवा बजावण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. शासनाचा एक घटक म्हणून आपली जबाबदारी ही अधिकाधिक चांगले कर्तव्याचे पालन करण्याशी आहे. तुम्ही ज्या भागाची सेवा बजावता तेंव्हा आपल्या प्रशासकिय कर्तव्यासमवेत त्या-त्या भागातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा स्थळांचे जतन कसे करता येईल, ही शक्तीस्थळे व यातील वैभव नव्या पिढीपर्यंत कसे प्रवाहित करता येईल याचा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे भावनिक आवाहन औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाचा सभागृहात महसूल, नगरपालिका प्रशासन व जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, कार्तिकेयन, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी व जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदी उपस्थित होते.
मराठवाड्यातील प्रत्येक भागाला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या काठावर असलेल्या विविध गावांमध्ये हजारो वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. आपण ज्या ठिकाणी उभे राहूत त्या ठिकाणी इतिहासाच्या पाऊल खुणा दडलेल्या आढळतील. जिल्ह्यातील किल्ले, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत ऐतिहासिक स्थळे याची सर्व माहिती ही जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये उपलब्ध आहे. प्रशासनाचा भाग म्हणून ज्या तालुक्याचे तुम्ही प्रतिनिधीत्व करता त्या तालुक्यातील केवळ भौतिक विकासाच्या सुविधा निर्माण करणाऱ्या कामापुरतीच आपली जबाबदारी आहे, असे नाही. काही विभागांकडे याबाबत असलेले छायाचित्रे, ऐतिहासिक दस्त जतन करून ठेवले पाहिजेत. कार्यालयीन कामांसमवेत त्या-त्या तालुक्यातील या वैभवाच्या केंद्रांना अधिक चांगले जतन कसे करता येईल, यात लोकसहभाग घेऊन हे वैभव पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहचवता येईल यादृष्टिने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन सुनिल केंद्रेकर यांनी केले. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी यादृष्टिने अधिक रचनात्मक काम करू शकतात. यात महसूल, जिल्हा परिषद व इतर विभागाचे अधिकारी चांगले स्वरुप देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामान्य माणूस हा अनेक आव्हानांना घेऊन उभे राहण्याच्या प्रयत्नात असतो. अशा सामान्यांची कामे महसूल विभागाशी जर असतील तर त्याला अधिक त्रास सहन करावा लागतो, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यांचे प्रश्न हे साधे-साधे असतात. आपल्या व्यवस्थेकडून ते अधिक जटिल होणार नाहीत याची काळजी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी मानवी संवेदना जपत घेतली पाहिजे. अन्यथा महसूली प्रकरणात अडकलेली भांडणे पिढ्यानापिढ्या चाललेली आपण पाहतो. यात त्या कुटूंबाला जे काही सहन करावे लागते त्याचा विचारा आगोदर महसूल अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, असे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी स्पष्ट करून ई-फेरफार, हद्दपाार सारखी कारवाई खूप अभ्यासून केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुंदर माझे गाव, सुंदर कार्यालय, गाव तेथे स्मशानभूमी, प्रशासन आपल्या गावी, मिशन 500 अंतर्गत पांदण रस्ते, ई-फेरफार आदी बाबत झालेल्या कामांचा आढावा सादर केला.
000000
No comments:
Post a Comment