Sunday, February 18, 2024

वृत्त क्र. 144 दि. 18 फेब्रुवारी 2024

 महासंस्कृती महोत्सवात तिसऱ्या दिवशी नृत्य -नाट्यांचा जल्लोष

 ·         शिवजयंतीच्या विविधांगी आयोजनाने आज होणार समारोप

 ·         'जल्लोष ' मध्ये लुप्त होत चाललेल्या कलांचा स्थानिक कलाकारांकडून आविष्कार

 नांदेड (जिमाका) दि. 18 : मागील दोन दिवसांपासून नांदेड येथे सुरू असलेल्या महासंस्कृती  महोत्सवात बहारदार व दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद नांदेडवासीय यांनी भरभरुन घेतला आहे. स्थानिक कलाकारांसमवेत सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंतानी जल्लोष या शेवटच्या कार्यक्रमाने तीन दिवसांच्या लक्षवेधी सांस्कृतिक महोत्सवाचा शेवट केला. उद्या पाच दिवसीय आयोजनाचा शेवटचा दिवस असून शिवजयंती निमित्त विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

 नांदेडकर कलारसिकांनी तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाला व त्यापूर्वी साहसी क्रीडा प्रकाराला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्वांचे आभार मानले आहे. उद्या शिवजयंतीनिमित्त या पाच दिवसीय महोत्सवातील शेवटचा कार्यक्रम रांगोळी प्रदर्शन असून त्यासोबतच छायाचित्र प्रदर्शन देखील सुरू आहे. नागरिकांनी उद्याच्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी होताना या आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ते १९ या पाच दिवसांच्या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण 16  ते 18 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा येथे झाले. या कार्यक्रमात अनेक लुप्त होत असलेल्या कलांचा आविष्कार स्थानिक कलाकाराच्या माध्यमातून पाहण्यास मिळाला. प्रत्येक भागाचे एक वेगळेपण असते. त्या-त्या भागात वेगवेगळ्या अशा अनोख्या कलेचे प्रदर्शन पाहण्यास व अनुभवण्यास मिळते. यात मागील दोन दिवसांत विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेले कार्यक्रम अविस्मरणीय आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील आदिवासींचे दंडार नृत्य,  धिरो धिरो नृत्य, लुप्त होत चाललेली  भूलाबाई, विविध प्रकारचे पारंपारिक खेळ, बासरी वादन, मंगळागौर, जागर, शास्त्रीय संगीत, नृत्य, पोवाडा, गोंधळ, संकिर्तन, भजन अशा अनेक अनोख्या व दुर्मिळ  कलागुणांचा आविष्कार स्थानिक कलाकारांकडून सादर करण्यात आला. 

 आजच्या कार्यक्रमात सुरूवातीला गौतम पानपट्टे यांनी वासुदेव, इंद्रधनु महिला ग्रुप अनघा जोशी यांनी जात्यावरील ओवी, कु. अथर्व चौधरी व कु. इशा जैन यांनी शास्त्रीय नृत्य भरतनाट्यचे सादरीकरण केले. मैत्रीग्रुप प्राजक्ता वाकोडकर व त्यांच्या चमुने  मंगळागौर-2 चे सादरीकरण केले. कु. दिप्ती उबाळे व संच शास्त्रीय नृत्य भरतनाट्यचे सादरीकरण केले. तर महसूल विभाग नांदेड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर  लोकजागर लोकनृत्य  आणि ललित कला अकॅडमी यांनी समूह लावणी नृत्याचे सादरीकरण केले. तर श्रध्दा गणेश शिंगे या दिव्यांग विद्यार्थीनींने उत्कृष्ट लावणी सादर केली.

 या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हास्तरीय सल्लागार निमंत्रित सदस्य, जिल्हास्तरीय कलाकार समन्वय निमंत्रित सदस्य समेवत नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी सहपरिवार उपस्थित होते.

  जल्लोष मध्ये स्थानिक कलाकारासोबतच  शुशांत शेलार यांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनात आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या निवेदनात नेहा खान, गौरी कुलकर्णी, जुई बेंडखळे, विदिशा म्हसकर यांनी बहारदार अशा नृत्याचे सादरीकरण  केले. तसेच सावनी रवींद्र, मयुर सुकाळे यांचे गायन तर अंशुमन विचारे आणि किशोरी अंबिये यांच्यासह 25 कलाकारांच्या संचाने धमाल सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सान्वी जेठवाणी, विजय निलंगेकर, ॲड. गजानन पिंपरखेडे आणि अनुराधा पत्की यांनी केले.   

 कार्यक्रमाच्या अगोदर संयोजक सुशांत शेलार आणि त्यांच्या टिमने नांदेड येथील माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. यावेळेस सुशांत शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत महाराष्ट्र शासनाचे, जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संयोजक सुशांत शेलार व त्यांच्या टिमचे जिल्हा प्रशासनातर्फे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संयोजक सुशांत शेलार यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले.

 आजचे कार्यक्रम

शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनासोबत छायाचित्र प्रदर्शनही आयटीआय येथे 19 व 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत राहणार आहे. यापूर्वी छायाचित्र प्रदर्शन नंदगिरी किल्ला येथे होते. शिवजयंती निमित्त हे प्रदर्शन रात्री दहा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 00000

 











 

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...