Thursday, August 24, 2017

दारु दुकाने आज बंद
नांदेड दि. 24 :-   गणेश चतुर्थी व बकरी ईद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. या सण उत्सव काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल/बीआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

000000
सण उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढवावा
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 24 :-  गणपती उत्सव तसेच बकरी ईद सण शांततेत, उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढीस लागेल यापद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज संपन्न झाली. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शैलजा स्वामी, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, गणेश मंडळांनी श्री मुर्तीची स्थापना सार्वजनिक रस्त्यावर अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी करु नये. श्री स्थापनेची जागा आणि परिसर स्वच्छ ठेवावा. त्याठिकाणी प्रकाशची सोय करावी. श्री मुर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. उत्सव काळात ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे रुग्णास, विद्यार्थ्यांस व परिसरातील सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनिक्षेपक, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम, देखावे याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनकडून परवानगी घ्यावी, असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केले.
जिल्ह्यातील यंत्रणांनी सीसीटिव्ही कॅमेरे तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने उत्सव काळातील गर्दी, मिरवणुका यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. उत्सव काळात विद्युत पुरवठा अखंडीत सुरु ठेवावा. रस्त्यावरील खचखळगे दुरुस्त करावीत. मिरवणुक मार्गावरील अडथळे व बांधकाम साहित्य हटवावीत. अग्नीशमन दल वाहन चालकासह सुसज्ज ठेवावीत. विसर्जन ठिकाणी घाटांची दुरुस्ती करावी. घटांच्या ठिकाणी विद्युत दिवे व फोकस बसवावीत. घटांवर जीवनरक्षक पथक तैनात करावीत. आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनाची तपासणी करुन परवानगी दयावी. जिल्ह्यात तालुका मुख्यालयी उत्सव कालावधीत नियंत्रण कक्ष स्थापन करावीत. इदगाहच्या ठिकाणी साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. प्राणी रक्षण कायदा व अवैध जनावरांची हत्या, गोवंश हत्या बंदी कायदाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. गणेशोत्सव, बकरी ईद सण कालावधीत शांतता अबाधीत रहावी म्हणून जिल्ह्यातील  यंत्रणांनी आवश्यक उपाय योजना कराव्यात. तालुका मुख्यालयी तसेच संवेदनशील ठिकाणी शांतता समितीच्या बैठका आयोजित कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्या.  
यावेळी सर्व गणेश मंडळांना "खड्डे बुजवा जीव वाचवा" हे अभियान राबविण्यासाठी तसेच संबंधीत न्यासाकडे जमा होणाऱ्या वर्गणीमधील 10 टक्के हिस्सा गरीब मुलांच्या सुश्रुषेसाठी खर्च करण्याबाबत धर्मादाय उपआयुक्त यांनी आवाहन केले. उपस्थित शांतता समितीतील सदस्यांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी आभार मानले.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...