Monday, August 30, 2021

 बदलत्या काळानुरूप शासकीय कार्यालयाच्या रचनेचा मापदंड सर्वत्र लागू करु

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

हदगाव येथे विविध योजनांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- बदलत्या काळानुरूप कार्यालयातील कामकाजाच्या कार्यपद्धती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाशी निगडीत होत चालल्या आहेत. याच्याशी अधिक सुसंगत कार्यालयीन रचना साध्य करण्यासाठी कार्यालयातील रचना व वास्तू स्थापत्त्य त्याला पूरक असणे गरजेचे झाले आहे. जनतेची कामे वेळेत पूर्ण व्हावी, निर्णय प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिगचे माध्यम अत्यंत प्रभावी ठरले असून तशी व्यवस्था असलेल्या कार्यालयाची रचना हदगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने परीपूर्ण करुन दाखविल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

हदगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, हदगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षा ज्योती राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 

शासकीय इमारत म्हणजे ठरावीक साच्यातील बांधकाम आजवर प्रचलित होते. यात तेवढ्याच खर्चात चांगल्या आणि देखण्या इमारतीही उभ्या राहू शकतात यासाठी नव्याने आराखड्याचा मी आग्रह धरला. तेवढ्याच खर्चात जिल्ह्यातील विविध शासकीय इमारती आता नव्या आकर्षक स्वरुपात पूर्ण झाल्याने कार्यालय परिसरासह काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही नवा विश्वास मिळत असून जनतेलाही आता नवीन पद्धतीचे कार्यालय आपली वाटू लागली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जनतेची कामे वेळेवर पूर्ण व्हावी असा आग्रह मी सातत्याने धरला आहे. यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान शासनातर्फे जिल्ह्यातील कार्यालयांना उपलब्ध करुन दिले जात आहे. कार्यालयीन कामकाजात गती यामुळे शक्य झाली आहे. जी अपेक्षा शासकीय कार्यालयांकडून आहे तीच अपेक्षा शासनाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी पुढे सरसावले पाहिजे. जे कंत्राटदार चांगले काम करत आहेत अशा कंत्राटदारांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहनही देऊ, मात्र कामे घेऊनही जे कंत्राटदार कामे करीत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करु अशा इशाराही त्यांनी दिला.    

नांदेड जिल्ह्यात आपण जवळपास 5 हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत. या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. उपलब्ध असलेल्या निधीतून ही कामे प्राधान्यक्रमानुसारच पूर्ण करुन विकास कामात मागील काही वर्षात जे दूर्लक्ष झाले होते त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मी सार्वजनिक बांधकाम विभागाची सुत्रे स्विकारल्यानंतर 248 किमी लांबीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यामध्ये दर्जोन्नत करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये विविध योजनेच्या माध्यमातून हदगाव मतदारसंघासाठी एकुण 43 कामांना रुपये 146.35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती त्यांनी दिली. विविध रस्ते, पूल, इमारतीसाठी शासनाच्या विविध योजनेतून आजपर्यंत एकुण 96 कामांसाठी 182.73 कोटी रक्कम मंजूर केली असून ही कामेही तेवढीच दर्जदार होतील अशा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रास्ताविक केले.

0000




सुधारीत वृत्त

महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी बचतगटांना पाठबळ देऊ

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटांमार्फत व्यवसायाचे चांगले काम उभा राहू शकते. राज्यातील अनेक महिला बचतगटांनी यातून रोजगार निर्मितीसह दररोज किमान उत्पन्न घेऊ दाखविले आहे. यासाठी महिलांकडून प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळणे आवश्यक आहे. जे बचतगट प्रामाणिक प्रयत्नांना घेऊन पुढे येत आहेत अशा बचतगटांचे महासंघटन करुन त्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

दिनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हदगाव नगरपरिषद यांच्या माध्यमातून केसुला मसाला उत्पादन महिला उद्योजकाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, हदगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षा ज्योती राठोड, महिला बचतगट शहरस्तर संघाच्या अलकाताई राठोड, सौ. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रत्येक नगरपरिषदेअंतर्गत घरगुती लागणाऱ्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकते. त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले. तालुका आणि जिल्हास्तरावर दर्जेदार उत्पादनांसाठी आजही मोठ्याप्रमाणावर मागणी असून उत्पादनातील गुणवत्ता बचतगटांनी ठेवणे आवश्यक आहे. बचतगटांचा विश्वास वाढावा तुमच्या सोबत आम्ही आहोत ही धारणा महिलांची अधिक दृढ व्हावी या उद्देशाने केसुला मशालाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहतांना मला मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. ही एक छोटी चळवळ असली तरी या चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होईल अशा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करुन जिल्ह्यातील बचतगटांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्यात दिनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत 3 हजार 741 बचतगट असून 40 हजार महिलांच्या स्वयंरोजगाराचे झाळे यातून आकार घेऊ शकते. जिल्हा प्रशासनातर्फे विविध बचतगटांना दरवर्षी विविध बँकांच्या माध्यमातून सुमारे 35 लाखापर्यंतचे कर्ज मिळवून दिले जाते. सुमारे 300 ते 400 रुपयापर्यंतचे दररोज उत्पन्न महिलांनी साध्य करुन आर्थिक प्रगती साधली आहे.

00000




 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात मंगळवार 14 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 14 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 नांदेड जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 712 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 740 एवढी झाली असून यातील 88 हजार 56 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसआर तपासणीद्वारे मुदखेड येथे 1 बाधित आढळला आहे. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 9, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 9 हजार 594

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 6 हजार 605

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 740

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 56

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. महिन्याचा पहिला सोमवार 6 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे. या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. 

दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस आवश्यक

नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त (पूर्व) परीक्षा 2020 ही शनिवारी 4 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोन डोस झाले नाहीत अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोविड-19 ची आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी. कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले असल्यास तसे प्रमाणपत्र सोबत बाळगावे, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षासाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे आरटीपीसीआर तपासणी करण्याची गरज नसल्याचे आयोगाने सूचना दिल्या आहेत. परीक्षेकामी नियुक्त करण्यात आलेल्या विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले असल्यास परीक्षेच्या दिवशी लस घेतलेल्या प्रमाणपत्राची प्रत सोबत बाळगावी. एखाद्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आढळून आल्यास त्यांची बदली पर्यायी कर्मचाऱ्यांची  व्यवस्था संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे कार्यासन प्रमुखांनी करावी व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ कळवावा असेही प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 31 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालयात, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 29 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 10 लाख 8 हजार 285 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 29 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 45 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 65 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 11 लाख 10 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा            

नांदेड (जिमाका) दि. 30 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मंगळवार 31 ऑगस्ट रोजी नांदेड येथून विमानाने सकाळी 10.45 वा.  मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...