Thursday, March 11, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 250 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

1 हजार 560 अहवालापैकी 1 हजार 253 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 11 :- गुरुवार 11 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 250 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 118 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 132 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 83  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 560 अहवालापैकी 1 हजार 253 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 440 एवढी झाली असून यातील 23 हजार 204 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 413 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 38 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

गुरुवार 11 मार्च रोजी पिरबुऱ्हानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 608 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 43, किनवट कोविड रुग्णालय 7, खाजगी रुग्णालय 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, देगलूर कोविड रुग्णालय 1, लोहा तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 83 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.21 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 88, अर्धापूर तालुक्यात 2, हदगाव 2, कंधार 1, मुदखेड 1, उमरी 2, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 4, धर्माबाद 2, हिमायतनगर 2, लोहा 8, मुखेड 3, हिंगोली 1  असे एकूण 118 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 101, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 3, बिलोली 1, मुखेड 6, नांदेड ग्रामीण 2, भोकर 16, धर्माबाद 1, लोहा 1 असे एकूण 132 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 413 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 73, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 65, किनवट कोविड रुग्णालयात 36, मुखेड कोविड रुग्णालय 25, हदगाव कोविड रुग्णालय 9, महसूल कोविड केअर सेंटर 99, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 654, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 236, खाजगी रुग्णालय 121 आहेत. 

गुरुवार 11 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 120, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 45 हजार 10

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 15 हजार 21

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 25 हजार 440

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 204

एकुण मृत्यू संख्या-608

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 91.21 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-07

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-265

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 493

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-38.

0000

 

 कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यात हे असतील निर्बंध

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश निर्गमीत 

नांदेड (जिमाका), 11 :- जिल्ह्यात कोविड-19 रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला व वाढत्या बाधित रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध दिनांक 12 मार्चच्या मध्यरात्री 12.00 वाजेपासून ते 21 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत लागू राहतील. 

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवार दि. 10 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविड-19 चे मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त झाले. ही बाब विचारात घेऊन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काही निर्बंध घातले आहेत. या निर्बंधात नांदेड जिल्ह्यामध्ये पुढीलप्रमाणे आदेश अधिनियमानुसार पारीत केले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कोचिंग क्लासेस 12 ते 21 मार्च 2021 या कालावधीत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन, शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करुन चालू राहतील. हे निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 12 ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद करण्यात येत आहेत. लग्न समारंभ व इतर समारंभ 15 मार्च 2021 पर्यंतचे पूर्वनियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत तहसिलदार तथा इन्सीडेंट कमांडर यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड-19 चे बाबतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉल्सचे धारक यांनी याबाबतीत तहसिलदार यांचेकडे प्रतिज्ञापत्र सादर करणेच्या अटीवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 50 लोकांच्या मर्यादेत घेण्यास परवानगी राहील. दिनांक 16 ते 21 मार्च 2021 या कालावधीत लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात येत आहे. 

खाद्यगृहे, परमिट रुम / बार फक्त सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन/वितरण कक्ष रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.

जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदान, स्विमिंग पूल हे वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील. तथापि सामुहिक स्पर्धा, कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम / उत्सव समारंभ पूर्णपणे बंद राहतील. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते सायं. 7 यावेळेत सुरु राहतील. धार्मिक स्थळी एकावेळी 50 व्यक्तींपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहील आणि एका आड एक याप्रमाणे ओटे राहतील याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने घ्यावी. 

सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 बाबतचे मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. तसेच कोविड-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हॅन्ड सॅनीटायझरचा वापर इत्यादी बंधनकारक राहील. 

वरीलप्रमाणे नमूद आदेश हे 12 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 21 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. सर्व संबंधित विभागांनी या आदेशाप्रमाणे तंतोतंत पालन व अंमलबजावणी करावी. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि यासंदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी 10 मार्च 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.

                                                                       000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...