Wednesday, January 17, 2018

लोकशाही बळकट करणे हे आपल्‍या सर्वांचे कर्तव्‍य
-    कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर
नांदेड दि. 17 - लोकशाहीमध्‍ये लोकसहभाग हा सकारात्‍मक असावा. लोकशाही समाजातील उच्‍च स्‍तरातील अधिकारापासून तळा-गाळातील दूर्बल घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. ही लोकशाही समाजातील सर्व स्‍तरापर्यंत पोहचविण्‍यासाठी लोकशाही बळकट करणे हे आपले सर्वांचे कर्तव्‍य आहे, असे मत स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्‍यक्‍त केले. ते आज दि. 17 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर विभागीय परिषदेच्‍या उद्घाटनप्रसंगी अध्‍यक्षीय मार्गदर्शनात बोलत होते.
नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालय, स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जिल्‍हा परिषद आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित कार्यक्रमप्रसंगी अनेक प्रकारचे स्‍टॉलचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फित कापून त्‍यांचे उद्घाटन करण्‍यात आले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार, महापौर शीलाताई भवरे, जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे उपायुक्‍त पारस बोथरा, उपायुक्‍त वर्षा ठाकूर, निवडणूक विभागाचे अवर सचिव रीना फणसेकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशेाक शिनगारे, परभणीचे मनपा आयुक्‍त राहुल रेखावार, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्‍त गणेश देशमुख, उपजिल्‍हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींची व्‍यासपीठावर यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
73 व 74 व्‍या घटना दुरुस्‍तीस 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. या घटनेमुळे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना घटनात्‍मक स्‍थान प्राप्‍त झाले आहे. राज्‍य निवडणूक आयोगाला या घटनेमध्‍ये अजूनही चांगले बदल करण्‍यासाठी समाजातून सर्व स्‍तरातील नागरिकांकडून सूचना अपेक्षित आहेत. त्‍या मिळविण्‍यासाठी विभागीय स्‍तरावर या परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. जास्‍तीतजास्‍त महिला व युवकांचा सहभाग घेवून लोकशाहीचे बळकटीकरण करण्‍याचा आयोगाचा प्रयत्‍न आहे, अशी प्रस्‍तावना नांदेडचे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मांडली आणि उपस्थितांना खुल्‍या मनाने चर्चा करुन चांगले बदल घडवून आणण्‍यासाठी सूचना कराव्‍यात, असे आवाहन त्‍यांनी याप्रसंगी केले.
दिवसभर करण्‍यात येणाऱ्या व्‍याख्‍यानाचे संग्रह करुन त्‍याचे पुस्‍तकात रुपांतर करण्‍यात आले. यावेळी निवडक लेख संग्रहाचे प्रकाशन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी राज्‍य निवडणूक आयुक्‍तालयाचे अवर सचिव रीना फणसेकर, उपाआयुक्‍त वर्षा ठाकूर, उपाआयुक्‍त पारस बोथरा, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार यांचेही मार्गदर्शन झाले.
ही परिषद तीन सत्रामध्ये चालणार असून या परिषदेत तीन सत्रामध्ये पुढील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, परभणी मनपा आयुक्त राहुल रेखावार,  पिपल्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ए. एन. सिद्धेवाड, परभणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य कांतराव झरीकर, नांदेडचे माजी महापौर शैलाजा स्वामी, लातूर जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शोभा वाघमारे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त गणेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील शेळगावकर, औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी नगरसचिव एम. ए. पठाण, देगलूर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बालाजी कत्तुरवार.
सन 1957 पासून राज्‍य निवडणूक आयुक्‍त निवडणूक कार्यक्रम घेत आहेत. त्‍यावर तयार केलेली चित्रफीत यावेळी दाखविण्‍यात आली. या परिषदेचे थेटप्रक्षेपण यूट्यूब आणि फेसबुकद्वारे जगभर पाहता येईल, अशी व्‍यवस्‍थाही जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आली आहे.
दिवसभर तीन सत्र आणि त्‍यावर मुक्‍त चर्चा आणि त्‍यामधून लोकशाहीचे बळकटीकरण करण्‍यासाठी चांगल्‍या सूचना येणे अपेक्षीत आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामधील पदाधिकारी, वरिष्‍ठ अधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍थेचे प्रतिनिधी, विद्यापीठातील तज्‍ज्ञ, महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.        
                                                                        00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...