थंडीत
कुडकुडणाऱ्यांना निराधार… निराश्रीतांना मिळाले
जिल्हाधिकारी
काकाणी यांच्या संवेदनशीलतेचे पांघरूण
नांदेड
शहरात रात्रीच्या फेरफटक्यात अनेकांना
पांघरल्या शाली
नांदेड दि.
30
:- हाडे गोठविणाऱ्या थंडीतही काहींना उघड्यावर आश्रय
घेण्याशिवाय गत्यंतर नसते. अशा काहींसाठी मंगळवार 30 नोव्हेंबर 2016 रात्री उबदार
संवेदनशीलतेची ठरली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी रात्री उशिरा नांदेड शहरातील
काही भागात फेरफटका मारत, अनेकांच्या अंगावर आपल्या संवेदनशीलतेची उबदार माया
पांघरली. त्यामुळे अनेक निराधार, भटके, कष्टकऱ्यांना निद्रेच्या अधीन असतानाच
थंडीपासून बचावासाठी दिलासा मिळाला. जिल्हाधिकारी काकाणी यांच्या या संवेदनशीलतेला
तरुणाईंनेही टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. जिल्हाधिकारी काकाणी यांनी यातून
प्रशासन शिरस्त्यातही मानवी आस्थेचा हा निर्झर जपल्याचा वस्तूपाठ समोर ठेवला.
कडाक्याच्या थंडीच्या दिवसातही अनेक कष्टकरी, निराधार, भटक्यांना दिवस
उजाडण्यासाठी रात्र उघड्यावरच काढावी लागते. त्यांच्यासाठी धरणी अंथरूण आणि आकाश
पांघरूण होते. काहीजण मिळेल, त्या गोष्टी पांघरूण कशीबशी रात्र काढतात. कित्येकदा
रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यालयीन कामकाज संपवून परतताना, जिल्हाधिकारी
काकाणी यांनी ही तगमग टिपली. त्यातूनच या लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा
त्यांनी बोलून दाखविली आणि ती आपल्या मोजक्याच सहकाऱ्यांच्या मदतीने तडीसही नेली.
मंगळवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी काकाणी यांची दिव्याची गाडी घरून निघाली,
तेव्हा बहुधा अनेक निराधार, उघड्यावर झोपलेल्यांना कल्पनाही नसेल, की आपल्या
अंगावर थेट जिल्हा प्रशासनाचा प्रमुखच संवेदनशीलचे उबदार शाल पांघरणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतरच
जिल्हाधिकारी काकाणी यांची नजर अशा निराधार, थंडीपासून बचावासाठी मुटकूळे करून
पडलेल्यांचा शोध घेऊ लागली. मध्यवर्ती बसस्थानकात अशा अनेकांना जिल्हाधिकारी
काकाणी यांनी पांघरूण घातले. कित्येकांची झोप मोड होऊ न, देता. थंडीपासून
बचावासाठी आडोसा घेतलेल्यांना शोधून-शोधून पांघरूण देण्यात आले.
रात्री-अपरात्री प्रवासानंतर परतताना, रेल्वे स्थानकाच्या प्रांगणातही असे
अनेक निराधार झोपलेले दृश्य, मनावर ठसलेले. त्यातूनच जिल्हाधिकारी काकाणी आणि
सहकारी हुजूर साहीब नांदेड रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच्या प्रांगणात
पोहचले. तिथेही झोपलेल्या निराधारांना, ज्येष्ठांच्या अंगावर शाल पांघरण्यात
आल्या. आपल्यासाठी इतक्या रात्री, अशी संवेदनशीलतेची उब घेऊन, कुणी समोर उभे राहील
? अशी कल्पनाही नसलेल्यांसाठी जिल्हाधिकारी काकाणी यांनी
पांघरूण देणे विस्मयकारक ठरले. त्यामुळे विस्फारलेल्या नजरेत कृतज्ञतेचे भाव आणि
जोडलेले हात अशी अनेकांची स्थिती होती. रेल्वेस्थानकातून बाहेर पडतानाही,
थंडीपासून बचावासाठी प्लॅास्टीक-कापडाचा आधार घेतलेल्यालाही आवर्जून बोलावून शाल
देण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या गोकुळनगर
प्रवेशद्वाराच्या आणि तिथल्या तिकीट घराच्या समोरही अनेकजण निद्रेच्या अधीन
झालेले. रात्रीचे साडेअकरा वाजलेले, उशिरांच्या गाड्यांसाठी प्रतिक्षेत
असलेल्यांसाठी जिल्हाधिकारी काकाणी स्वतः निराधारांना पांघरूण घालत असलेल्याचे
पाहून आश्चर्यमिश्रीत चर्चा सुरु झाली. काही तरूणांचे मोबाईलचे कॅमेरे लखलखू
लागले...आणि एका तरुणाने जिल्हाधिकारी यांच्या या कृतीला दाद म्हणून ओरडूनच आवाहन
केले, आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. असा कडकडाट एकदा नाही... तर मग दोनदा झाला.. काही
तरुणांनी धाडसाने पुढे होऊन जिल्हाधिकारी काकाणी यांच्यासोबत सेल्फींही घेतले, आणि
त्यांच्याप्रती कौतुकाचे उद्गारही काढले. त्यांचा विनम्रतापुर्वक स्विकार करत
जिल्हाधिकारी काकाणी पुढे मार्गस्थ झाले...
0000000