Tuesday, November 29, 2016

नांदेडचे जवान कदम यांना
वीरमरण, पार्थिव आज पोहचणार
नांदेड, दि. 29 :-  जम्मू-काश्मिरमधील नागरोटा येथील लष्करी तळावरील अतिरेक्यांच्या हल्ल्यातील चकमकीत 5-मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी यशवंत कदम ( वय 33) यांना वीरमरण आले. शहीद कदम हे जानापुरी ता. लोहा येथील वीरपुत्र आहेत. शहीद कदम यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कराचे औरंगाबाद मुख्यालय यांच्याकडून समन्वयाने व्यवस्था करण्यात येत आहे. बुधवार 30 नोव्हेंबर 2016 रोजी पार्थिव नांदेड येथे पोहचणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर सातत्यपुर्ण संपर्कात आहेत.
शहीद कदम यांच्या मागे वडील यशवंत, आई लताबाई, पत्नी शितल आणि मुलगी तेजस्विनी असा परिवार आहे.
जवान कदम यांच्या वीरमरणाबाबत जिल्हा प्रशासन तसेच जानापुरीचे सरपंच बळी पाटील यांना आज लष्करी मुख्यालयाकडून माहिती कळविण्यात आली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी तातडीने लष्करी मुख्यालयाच्या संपर्कात राहून शहीद कदम यांचे पार्थिव नांदेडकडे आणण्यासाठी विविध यंत्रणाशी समन्वय साधला. शहीद कदम यांचे पार्थिव उद्या बुधवार 30 नोव्हेंबर,2016 रोजी नांदेड येथे पोहचणार आहे. त्यानंतर पार्थिवावर जानापुरी येथे लष्करी इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी लष्कराच्या औरंगाबाद मुख्यालयातील पथक नांदेडकडे मार्गस्थ झाले आहे. भारतीय लष्कराच्यावतीने तसेच जिल्हा पोलीस दलाच्यावतीने वीरपुत्र कदम यांना मानवंदना दिली जाणार आहे.
जानापुरी येथील या व्यवस्थेसाठी विविध यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह विविध यंत्रणांना जानापुरी येथे पोहचल्या. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, त्यांचे सहकारी आणि कंधारच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसिलदार शिल्पा श्रृंगारे आदींनीही यंत्रणांशी समन्वय साधत आहेत.
पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून शहीद कदम यांना श्रद्धांजली
पालकमंत्री दिवाकर रावते यांनी शहीद कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, दहशतवाद्यांशी लढताना जम्मू-कश्मिरमधील नागरोटा क्षेत्रात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीर मरण आले. त्यातील एक नांदेड जिल्ह्याचा अर्थात मराठवाड्याचा. निजामाशी दोन हात करुन लढणारा हा मराठवाडा. या मराठवाड्यातील संभाजी कदम या वीरपुत्राने आपल्या जीवातला जीव असेपर्यंत दहशतवाद्यांशी सामना केला. मात्र यात तो धारातिर्थी पडला. त्याच्या शौर्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत. मराठवाडा ही भूमि संघर्षाची, निजामाशी लढणारी, त्यामुळे मराठवाड्यातील हा भूमिपुत्र दहशतवाद्याशी लढताना धारातिर्थी पडला. या वीरपुत्राला भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर देवो.

00000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...