Friday, November 3, 2017

वाचनाशी एकरुपता देते वेगळीच अनुभूती
--- नयन बाराहाते
नांदेड, दि. 3:- वाचन करतांना तल्लीन होऊन वाचना-यास आणि जे आपण वाचतो त्यात तेवढया कमालीची ताकद असल्यास त्यातील वातावरणाचा आपल्या सभोवती प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. एकदंरीत वाचनाशी एकरुपता ठेवल्यास वेगळीच अनुभूती होत असल्याचे प्रतिपादन चित्रकार नयन बाराहाते यांनी केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेडच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.
जेष्ठ साहित्यिक डॉ.भगवान अंजनीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कथाकार मधुकर धर्मापुरीकर,जेष्ठ साहित्यिक डॉ.केशव देशमुख,प्रकाशक दत्ता डांगे,संपादक राम शेवडीकर,गजलकार बापू दासरी,निवेदक देवदत्त्साने,जेष्ठ कवी महेश मोरे,साहित्यिक दिलीप पाध्ये,कवी अमृत तेलंग यांची उपस्थिती होती.
दत्ता डांगे यांनी दिवाळी अंक मराठी साहित्याचे वैभव असून प्रत्येक वाचकांनी दिवाळी अंक आवर्जून वाचावयास हवे असे सांगितले. देवदत्त साने यांनी काही ठराविक दिवाळी अंकामधील कोणत्या विषयावरील लिखाण वाचकांनी वेळात वेळ काढून वाचावे या बाबत त्यांनी सागितले.बापू दासरी व महेश मोरे यांनी मनोगता सोबत आपल्या कवितेतून उपस्थितीतांशी संवाद साधला.कथाकार मधुकर धर्मापुरीकर यांनी आपल्या मनोगतातून दिवाळी अंकांमध्ये  आपल्या जिल्हयातील साहित्यिकांचा सहभाग लक्षणीय असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतातून डॉ.भगवान अंजनीकर यांनी दिवाळी अंकाच्या समृध्दशाली परंपरेचा उल्लेख  करुन विविध विषयाला  वाहिलेले दिवाळी अंक वाचकांसाठी दिवाळी पूरतीच नव्हे तर वर्षभर पुरणारी बौध्दीक मेजवानी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी तर सुत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक प्रताप सुर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमास ग्रंथपाल आरती कोकूलवार,यशवंत राजगोरे,रामगढिया,ॲड श्रीनिवास शेजूळे,गजानन कळके, संजय पाटिल,भानूदास पवळे,मुक्तीराम शेळके,बालाजी कदम,नवनाथ कदम  .सह विदयार्थी व वाचक उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय कर्वे,अजय वटटमवार,कोडिंबा गाडेवाड यांनी सहकार्य केले.             
****  


संस्थेच्या विश्वस्तांना सुचना
नांदेड, दि. 3:- सर्व संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, संस्था स्थापन केल्यापासून ज्या संस्थांची हिशोब पत्रके (ऑडिट रिपोर्ट) दाखल करण्यात आलेली नाहीत. त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी कार्यालयातर्फे यादी तयार करण्यात आलेली असून सदरची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. तरी सर्व संबंधित संस्थेच्या विश्वस्तांना सुचित करण्यात येते की, त्यांनी कार्यालयातील प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीचे निरीक्षण करुन घ्यावे. तसेच आपल्या संस्थेची नोंदणी का रद्द करण्यात येवू नये. या बाबतचा खुलासा खालील नेमून दिलेल्या तालुक्याच्या दिवशी व कार्यालयातील न्याय कक्षात प्रत्यक्ष हजर राहून अथवा वकीलामार्फत सकाळी ठिक 11-00 वाजता सादर करावा.
कार्यालयात वरील ठिकाणी सुनावणीच्या वेळी आपल्या सबळ पुराव्यासह आपले म्हणने मांडण्यासठी सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, अन्यथा आपण गैरहजर राहिल्यास आपले कांहीही म्हणने नाही, असे गृहीत धरुन आपली संस्था नोंदणी रद्द करण्यासंबंधिची नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे नांदेड विभागाचे सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी कळविले आहे.

****
 कंधार येथे शैक्षणिक परिसरात तंबाखू जप्त करून केली होळी
             
        
नांदेड, दि. 3:-  तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे हा गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय, कंधार येथे अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये सदरील परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या निदर्शनास आलेतेंव्हा सदरील विक्रेते हे प्राप्त तक्रारीनुसार कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. करिता कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकामार्फत सदरील तंबाखू विक्रेते यांच्याकडून प्रत्येकी २०० प्रमाणे एकूण १४०० रुपये इतका दंड आकारण्यात आला तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. उपस्थित जनसमुदाय यांच्यासमक्ष जनजागृती करून सदर जप्त केलेला साठ्याची होळी करण्यात आलीसदरील पथकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप  बोरसे, डॉ. राहुल अन्नापुरे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक  प्रकाश आहेर व स्थानिक पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक  एस. एस. भारती व सहकारी होते. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास १८००११०४५६ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा शल्य चकित्सक डॉ. बी.पी.कदम यांनी केले आहे.

****  
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा
विवारी डॉ. आशालता गुट्टे यांचे व्याख्यान
नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार 5 नोव्हेंबर 2017 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सायं. 4.30 वा. हे शिबीर होणार आहे. यावेळी प्रा. डॉ. आशालता गुट्टे या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात "मराठी व्याकरणाची तयारी" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले आहे.

00000
अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना
90 टक्के अनुदानावर मिन ट्रॅक्टरची योजना
नांदेड दि. 3 :- अनुसुचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरची योजना कार्यान्वित आहे. अटी शर्ती शासन निर्णयातील तरतुदींची पर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचतगटांनी परिपूर्ण अर्ज संपर्ण कागदपत्रांसह सोमवार 20 नोव्हेंबर 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर, नांदेड  येथे अर्ज सादर कराव, असे अवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. तसेच शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. बचत गटांतील  सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असावेत, तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. सक्षम अधिकाऱ्यानी दिलेले सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र असावेत. बचत गटाची नोंदणी सक्षम अधिकाऱ्याकडून केलेली असावी. बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे व त्या गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे त्या खात्यास सलग्न केलेले असावेत. सर्व सदस्यांची बँकेने प्रमाणित केलेली यादी असावी. या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांची निवड झाल्यानंतर बचतगटाने Ministry of Agriculture and Farmers  Welfare Deparment of Agriculture, Co- operation and Farmers Welfare. यांनी निर्धारित केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व  त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इंस्टीटयूट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावीत. तसेच निवड झालेल्या लाभार्थी बचत गटाने परिमाणानुसार मान्यता प्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर, व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपर्यंत खरेदी करणे आवशक आहे. मीनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा  3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. स्वयंसाह्यता बचतगटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतींच्या 90 टक्के ( कमाल 3 लाख 15 हजार रुपये ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. एकूण किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरण्याचे हमीपत्र व गटातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे हमी पत्र अर्जासोबत जोडावे. आरटीओ कार्यालयातील नोंदणी बचत गटाने स्वतः करून घेण्याचे हमीपत्र शंभर रुपये बॉंडवर असावे. इतर अटीं व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयाच्या सचना फलकावर डकविण्यात आलेला आहे.
यापूर्वी निवड न झालेल्या बचत गटानीसुद्धा नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. यापुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही अवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

00000
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 3 :- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती , शिक्षण फी, निर्वाह भत्ता , विद्यावेतने विषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी पोर्टलमार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सुचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल.
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात आणि शिक्षण फी-इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. परंतू आता देय होणारी वित्तीय लाभाची सर्व रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पुढील योजना ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क परीक्षा प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ( इयत्ता अकरावी , बारावी ), राज्य शासनाची मॅट्रिकपुर्व शिक्षण फी परिक्षा फी प्रतीपुर्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी , माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने कोअर बँकीग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, दहावी , बारावी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण रहिवास दाखल , उत्पन्न दाखला , प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स , आधार कार्ड , दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधा पत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी : - आपण कोणत्याही ब्राऊझरचा वापर करुन ( उदा. internet Explorer (I.E) Google Chrome / Mozilla Firefox etc.) , https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जावून नवीन नोंदणी बटनावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांने ( ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी e-scholarship पार्टलवर नोंदणी केली होती त्यांनी सुध्दा) mahadbt पार्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. तयासाठी आधार कार्ड आहे ? असेल तर होय वर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी हा पर्याय निवडा , वैध आधार क्रमांका टाकल्यानंतर ओटीपी पाठवा बटन क्लिक करा, मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी ( वन टाईम पासवर्ड) टाकून पडताळणी करा हे बटन क्लिक करावे. उपलब्ध विंडोमध्ये नाव, जन्म दिनांक , फोन नंबर , पत्ता आपोआप दिसेल, आधार क्रमांक नसल्यास आधार कार्ड नाही हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व  कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणी अर्जाच्या विंडोमधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा :- महाडीबीटी पार्टलवर लॉगइन करण्यासाठी सिलेक्ट युजरनेममध्ये जावून विद्यार्थी हा पर्याय निवडा, युजर नेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा, लॉगइन झाल्यावर विंडोमधील योजना तपशील यावर क्लिक करा. त्यानंतर विभागवार योजना अपाण पाहू व निवडू शकाल  आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर पहा क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना ( मॅट्रीकपूर्ण / मॅट्रीकात्तर ) साठी आपण पात्र आहात त्यांची खात्री करा व पर्याय क्लिक करा. ( उदा. शालेय विद्यार्थ्यांनी मॅट्रीकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर हा पर्याय निवडावा ). आवश्यक ती सर्व माहिती शाळा, महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. ( रहिवास दाखला, उत्पन्न दाखला, एसएससी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक , आधार क्रमांक इ. ) . अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेजमधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी / पालकाना काही अडचणी असल्यास त्यानी 18001025311 या टोल फ्री वर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.
महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबइटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम घेवू नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे , कोअर बँकिग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यलयाचे नाव , महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पार्टलवर मॅप करण्यासाठी आपआपल्या आयुक्तालयास / संचालनालयास / विद्यापीठास / परिषदेस सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्याची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कालावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल. त्यासाठी त्यामध्ये ज्या प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

****
आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड दि. 3:-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवार 1 डिसेंबर 2017 पासून सुरु होणाऱ्या 95 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परिक्षेची तयारीकरीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे मंगळवार 28 नोव्हेंबर, 2017 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवरांचे वय 31 नोव्हेंबर, 2017 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. तरी पात्र अशा इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 28 नोव्हेंबर, 2017 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.  

**** 
पिकावरील कीड संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 3:-  नांदेड उपविभागातील नांदेड , मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच तालुक्यामध्ये तुर व कापूस पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण प्रकल्पातंर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिकावरील किड संरक्षणासाठी कृषी संदेश देण्यात आला आहे.
कापशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेन प्रोपॅथ्रीन 10 इसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच लाल्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के फवारणी करावी. तुरी या पिकासाठी शेंगा पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मिटर अंतरावर लावावेत, असे आवाहन नांदेडचे विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
समाज कल्याणच्या विविध शिष्यवृत्त्यांसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड,दि.3 :- समाज कल्याणच्या विविध शिष्यवृत्त्यांचा लाभ मिळण्यासाठी https://mahadbt.gov.in संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांकांशी व मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी व मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याविषयी सुचित करावे.
समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद , नांदेडमार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्या अधिक चांगल्या पारदर्शक पध्दतीने आणि पात्र विद्यार्थ्यांना अचुक लाभ देण्यासाठी 1 ऑगस्ट, 2017 पासून https://mahadbt.gov.in   हे पार्टल विकसित करण्यात आले आहे. या पार्टलअंतर्गत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते दहावी, मॅट्रिकपुर्व भारत सरकार शिष्यवृत्ती इयत्ता नववी ते दहावी , अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते दहावी , गुणवत्ता शिष्यवृत्ती इत्यादी ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

00000
महारेशीम अभियान 2018 ची
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
नांदेड दि. 2:- राज्यात दि 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत महा रेशीम अभियान राबवले जाणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची सुरवात करण्यात आली .  

रेशीम संचनालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करून उत्पन्नात वाढ करने या उद्देश्याने महा रेशीम अभियान - 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नांदेड ,अर्धापूर, मुदखेड ,लोहा ,कंधार ,देगलूर ,मुखेड या तालुक्यात हे अभियान राबवले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात या अभियानाची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.या प्रसंगी जिल्हा रेशीम अधिकारी पी जे पाटील ,केंद्रीय वैद्यानिक ए जे करंडे, वरिष्ठ तांत्रिक सहायक पी. बी. नरवाडे , सुजाता पोहरे बार्टि समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी, टि ए पठाण,एस यू मानकर , एस डब्लु लाठकर क्षेत्र सहायक, श्री. डोईफोडे प्रगतशील शेतकरी , यांच्यासह जिल्हातील सर्व समतादूत उपस्थि होते .   
पीओएस मशिनद्वारे खत विक्रीस सुरुवात 
नांदेड दि. 2:- दिनांक 01 नोव्हेंबर 2017 पासून खत खरेदी ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात जिल्हयातील 617 खत विक्रेत्यांना पॉईट ऑफ सेल (पीओएस) मशीन देण्यात आल्या असून खत खरेदी करताना शेतकऱ्याच्या बोटाचा ठसा घेऊन आधारकार्ड नंबर नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्याने बिलाची रक्कम अदा करुन खत खरेदी करायचे आहे. त्यानंतर ही नोंद पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे. त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार असून राज्यात 01 नोव्हेंबर 2017 पासून या पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे.
जिल्हयात 609 e-Pos मशिन कार्यान्वीत झालेली असून त्यापैकी 567 मशिन द्वारे आरंभिचा खत साठा नोंद करण्यात आलेली आहे. नोंद करण्यात आलेल्या मशिनवर एकूण 13264 मे.टन खत साठा शिल्लक दर्शविण्यात आलेला आहे. एकूण 76 टक्के e-Pos मशिन द्वारे खत विक्री चालू आहे.
रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा दुरुपयोग टाळावा तसेच शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. किरकोळ खत विक्रेत्यांना तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पध्दतीने खताची विक्री करताना किंवा शेतकऱ्याने खत खरेदी करताना शेतकऱ्याला आधारकार्ड असणे आवश्यक आहे. कारण पीओएस मशिनवर संबंधीत शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड नंबर नोंद करायचा आहे. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याला खताची विक्री होणार आहे.नंतर त्या शेतकऱ्याने खताच्या खरेदीची रक्कम अदा करायची आहे. रासायनिक खत विक्री करीता थेट लाभ हस्तांतरण (DBT) दि.01 नोव्हेंबर 2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी नांदेड, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे अध्यक्षतेखाली  रासायनिक खत उत्पादक प्रतिनिधी, खत विक्रेते यांच्या वेळोवेळी  बैठका घेऊन आढावा घेण्यात आला.   
            नांदेड जिल्हयात दिनांक 31 ऑक्टोबर, 2017 अखेर एकूण 617 e-Pos मशिन मशिनचे वाटप विक्रेत्यांना करण्यात आले असून त्यापैकी 567 e-Pos मशिन कार्यरत झाले रासायनिक खताचा साठा नोंदविण्यात आला आहे. e-Pos मशिन मशिनवर दि.31 ऑक्टोबर, 2017 रोजी सायंकाळ पर्यंत एकूण 13264 मे.टन रासायनिक खताचा साठा नोंदविण्यात आला. अतिरिक्त 428 e-Pos मशिनची मागणी नोंदविण्यात आली होती त्यापैकी 200 e-Pos मशिनचा पुरवठा लवकरच जिल्हयास होणार आहे.  या प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे तसेच तालुका पंचायत समितीचे सर्व कृषि अधिकारी यांच्या मार्फत मागील 3 दिवासापासून खत विक्रेत्याकडील साठा e-Pos मशिन मध्ये नोंदविण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात आले होते.
तरी शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड दर्शवून रासायनिक खताची खरेदी करावी तसेच हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या राबविला जाईल या बाबत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

**** 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...