Thursday, December 14, 2017

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीचा ठेवा

मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात 14 व्या दिवशी भरते.  यावेळी ही यात्रा शनिवार 16 ते बुधवार 20 डिसेंबर 2017 या कालावधीत भरणार आहे. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेविषयी माहिती..
महाराष्ट्र राज्याची वैभव संपन्न सांस्कृतिक परंपरा व मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते. याठिकाणी महामार्गा शेजारी खंडोबा मंदिराची मोठी कमान नजरेला पडते. त्याठिकाणाहून उजव्या बाजुला आत गेल्यानंतर भव्य मंदिर, परिसर यात्रेकरुनी दुमदुमलेला दिसतो. माळेगाव येथे पूर्व-पश्चिम असे एक मोठे आवार बांधले आहे. या आवाराच्या पूर्वाभिमूख महाद्वार आहे. या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर खंडोबाचे मंदिर दिसते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णुची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. आठराव्या शतकातील हा शिलालेख मराठी भाषेत आहे. मल्हारी, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबादेवाची महाराष्ट्रासोबत कर्नाटक राज्यातही बारा देवस्थान आहेत.       
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक, यात्रेकरु, व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन जागृत दैवत खंडोबारायांच्या समोर भरवली जाते. यात्रेचे व्यवस्थापन नांदेड जिल्हा परिषद नियोजनबद्ध करते. देवघरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. या मुर्तीच्या देवघरासमोर एक सभागृह बांधले आहे. सभागृहाच्या मुख्यद्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. 18 व्या शतकातील हा शिलालेख मराठीत भाषेत आहे. माळेगाव यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते.
सांस्कृतिक परंपरा
           
श्रीक्षेत्र माळेगावच्या नागरिकांचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा आहे. अनेकजण खंडोबास मनापासून आपले कुलदैवत मानतात. स्थानिक परंपरेनुसार दोन अख्यायिका येथील नागरिकांमध्ये अधिक रुजलेल्या आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असल्याने श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबारायाच्या मंदिरासोबत यात्रेची देखभाल व व्यवस्था चांगली ठेवली जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचा आदर्श ठेऊन लोककला आणि मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाशा कला महोत्सव, लावणी महोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येत असतात. त्यासाठी प्रोत्साहनाच्या बक्षिसांची लयलूट होते. कुस्तीच्या आखाड्यातील फड जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविल्या जाते. कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन केले जाते. पशुसंवर्धन विभागातर्फे पशु, अश्व, कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन महत्वपूर्ण आकर्षण असते. विविध विभागाची, माहिती प्रदर्शने, वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळी, उद्योग दालने, संमेलन, मेळावे इत्यादी पाहून यात्रेकरु आपले मन आनंदाने हरवून बसावे असे सर्व काही प्रेक्षणीय म्हणजे ही यात्रा आहे. यात्रेच्या निमित्ताने देशातील विविध भागातून सर्व जातीचे-धर्माचे नागरिक एकत्र येतांना येथे दिसतात. याठिकाणी सांस्कृतिक ऐक्याचे, एकात्मतेने नटलेल्या‍ विविधतेचे दर्शन जवळून घडते. आनंद मिळवून देणाऱ्या, विविध अंगाने सजलेल्या या यात्रेत भाविकांबरोबर कलावंतांनी सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा महोत्सवाच्या रुपाने जवळून पहावा.  

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000000
आदिवासींना अनुदानावर विविध योजना ;
1 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड दि. 14 :- केंद्रवर्ती अर्थसंकल्प 2017-18 न्युक्लिअस बजेट योजनेतर्गत आदिवासी शेतकरी, युवक, युवती, महिला, सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी 85 ते 100 टक्के अनुदानावर विविध योजनेचा पुरवठा करावयाचा आहे. त्यासाठी व्यवसाय प्राप्त होण्याच्यादृष्टीने  विविध प्रशिक्षण नामांकित पात्रताधारक संस्थेमार्फत द्यावयाचे आहे. आदिवासी लाभार्थ्यानी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे माहिती सुविधा केंद्रापरिपुर्ण अर्ज 1 जानेवारी 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.  
विहित नमुन्यातील कोरे अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट  येथे माहिती सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. वैयक्तीक योजनेत 85 टक्के अनुदारावर आदिवासी शेतकऱ्यांना तुषार संच, ठिंबक संच, काटेरी तार, आदिवासी महिलांना / युवतीना शिलाई युनिट, शेतकऱ्यांना ताडपत्री, आदिम आदिवासी लाभार्थ्याना 100 टक्के अनुदानावर मंडप साहित्य, आदिवासी लाभार्थ्याचे घरांचे विद्युतीकरण ( 2.5 ईलेक्ट्रीक फिंटीग ), आदिवासी युवतीना शाळा, कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी सायकल पुरवठा, युवक-युवतीना MSCIT संगणक, टंकलेखन, प्लेक्स प्रिंटींग मशिन ऑपरेटर प्रशिक्षण, शासकिय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कला जोपासण्यासाठी गायन, हॉर्मोनिअयम शास्त्रीय गायन, नृत्य सुगम संगीत, आदिवासी महिलांना ब्युटी पार्लर अनिवासी प्रशिक्षण देणे, Neet परिक्षा पुर्व प्रशिक्षण, रुग्सहायक अभ्यासक्रम निवासी प्रशिक्षण, ॲल्युमिनियम कामाचे प्रशिक्षण,  बच गटाना आचारी साहित्य संच  85 टक्के अनुदानावर, सन 2016-17 आदिवासी भजनी मंडळास 85 टक्के अनुदानावर भजनी साहित्य, आदिवासी महिलाना, युवतीना ब्युटीपार्लर किट पुरवठा 85 टक्के अनुदानावर आदी वैयक्तीक, सामुहिक योजनेचा यात समावेश आहे. यासाठी जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच), आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट छायाचित्रे आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. अधीक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट येथे संपर्क साधावा.

000000
अखिल भारतीय परीक्षेच्या
दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन नोंदणी  
नांदेड दि. 14 :- शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत 106 वी अखिल भारतीय परीक्षेच्या (बीटीआरआय) दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 15 डिसेंबर पर्यंत आहे. अनुत्तीर्ण व नव्याने परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांनी http://dgt.cbtexam.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड आयटीआयचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
डी.जी.टी. नवी दिल्ली यांच्याद्वारे हे पोर्टल 12 ते 15 डिसेंबर दरम्यान उपलब्ध आहे. थिअरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स ॲन्ड एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान झाल्या, त्यावेळी काही तांत्रिक किंवा अन्य अडचणीमुळे या पोर्टलवर नोंदणी राहून गेलेल्या उमेदवारांनी नव्याने नोंदणी करावी. या परीक्षेची दुसरी फेरी जानेवारी 2018 मध्ये घेण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

0000000
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत फळे,
भाजीपाला, मसाला पिकाचे प्रदर्शन व स्पर्धा
नांदेड, दि. 14 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शनिवार 16 डिसेंबर ते बुधवार 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सहभाग वाढविण्यासाठी संबंधीत पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांकडे शुक्रवार 15 डिसेंबर 2017 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी या प्रदर्शन व स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर भाग घेण्यासाठी स्वत:च्या शेतातील फळे, मसाला पिके व भाजीपाल्याचे नमुने माळेगाव यात्रेत कृषि विभागाच्या स्टॉलवर शनिवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत घेवूत यावेत. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील फळे, भाजीपाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. विजेत्या शेतकऱ्यांना प्रथम बक्षीस रुपये 4 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 3 हजार रुपये, तृतिय बक्षीस 2 हजार रुपये असे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला स्पर्धेत फळे, भाजीपाला, मसाला, पिके यापैकी एकाच नमुन्यासाठी बक्षीस मिळेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेला चांगल्या प्रतीचा एकच नमुना आवश्यक त्या कागदपत्रासोबत आणावा. फळे, भाजीपाला, मसाला पिकाच्या नमुन्यांसोबत शेतकऱ्याचा अर्ज अनिवार्य आहे. सात/बारावर सदर पिकाची नोंद असावी. सात/बारावर नोंद नसल्यास संबंधीत तालुक्यातील कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यापैकी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमाणपत्र स्वाक्षरी व शिक्यासह असावे. शेतकरी नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असावा. प्रत्येक नमुना देतेवेळी बोरे, गाजर, पेरु, आवळा, चिंच, टोमॅटो, वांगी, वाटाणा, पानकोबी, कांदा, मिरची, मुळा, फुलकोबी, काकडी, भेंडी, कारले, दोडका, शिमला मिरची, पालक, शेवगा, हळद, अदरक इत्यादी नमुन्याचे वजन हे किमान एक किलो असावे. पपई नमुने किमान तीन नग, काशीफळ व भोपळा नमुना किमान एक नग असावा. सिताफळ, रामफळ, मोसंबी, संत्रा, पेरु, लिंबु, डाळींब इत्यादी नमुना असल्यास किमान 5 नग असावेत. प्रत्येक वाणात किमान 5 स्पर्धक असणे बंधनकारक आहे. तेवढे स्पर्धक नसल्यास त्या पिकासाठी स्पर्धा रद्द करण्यात येणार आहे. बक्षीसाची रक्कम डीडीद्वारे संबंधीत पंचायत समितीमार्फत देण्यात येईल. बक्षीस वितरणापुर्वी संबंधीत पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेमार्फत लागवड असलेल्या प्लॉटची तपासणी करण्यात येईल व त्यानंतरच बक्षीस वितरण होईल.

000000
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाप्रारंभ
गतवर्षीचा निधी संकलनात नांदेडचा गौरव
नांदेड दि. 14 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2017-18 च्या संकलनाचा प्रारंभ बुधवार 13 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचे गतवर्षीचे निधी संकलनाचे उद्दीष्ट 125 टक्क्यांनी पुर्ण करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना विशेष सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. त्यासाठी निधी संकलनात योगदान देणाऱ्या विविध कार्यालय प्रमुखांनाही यावेळी प्रशस्तीपत्र बक्षीस देवून गौरवण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सह. जिल्हा निबंधक सहकारी संस्था प्रविण फडणीस, लोहा तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार, मुखेडचे गटविकास अधिकारी व्ही. एन. घोडके, मेजर बी.जे. थापा, प्रा. देवदत्त तुंगार यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, सैनिकांचे नातेवाईक, नागरीक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले.
श्री. पाटील यांनी यावर्षी जिल्ह्याला 35 कोटी 30 लाख 512 रुपयाचे लक्ष दिले असून ते आपण 200 टक्के पुर्ण रु असे सांगितले. वीरनारी, विधवा माजी सैनिकांची आस्थेवाईक चौकशी केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविकात सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी ध्वजदिन निधीचे महत्व सांगितले. संकलीत झालेल्या निधीचा विनियोग   माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती  दिली. 
शहीद जवान संभाजी कदम या जवानाचे बलिदान बघुन चि. राघवेंद्र पाटोदेकर या विद्यार्थ्याने खाऊसाठी जमा केलेले पैसे सशस्त्र सेनादल निधीस दिले. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी चि. राघवेंद्र यांना सायकल दिली. वीरपत्नी श्रीमती कलावतीबाई बोडखे यांना घरकुलासाठी  1 लाख 50 हजार रुपये तर श्रीमती कमलाबाई केरबा गवले यांचा मुलगा दिवंगत झाल्याने त्यांना 75 हजार रुपये व  चि. मिराज, विधवा पत्नी श्रीमती अनिता राठोड यांना सिंगापुर येथे पॉवर लिफटींग स्पर्धेत तृतीय स्थान प्राप्त केल्याबद्दल 10 हजार रुपयाची आर्थिक मदत सैनिक कल्याण विभागाकडून प्र. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. सुत्रसंचलन माजी सैनिक श्री. झगडे यांनी केले तर आभार कमलाकर शेटे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन सतेंद्र चवरे, संजय देशपांडे,  तुकाराम मसीदवार यांनी केले.

000000
ग्रामीण आरोग्य महाशिबीराचे  
24 डिसेंबरला किनवटला आयोजन   
नांदेड दि. 14 :- राज्य शासनामार्फत ग्रामीण आरोग्य महाशिबिराचे आयोजन रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी किनवट येथील गोकुंदा येथे विनामुल्य करण्यात आले आहे. या शिबीरात माहुर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या 5 तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासणी, चाचणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर, लठ्ठपणा, स्तन कर्करोग, अवयवदान फार्म भरणे आदी सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी पुर्व तपासणी अभियान 15 ते 23 डिसेंबर 2017 या कालावधीत पाचही तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व नागरी रुग्णालये या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ समाजातील सर्व स्तरातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन बाबा अमरजितसिंहजी व वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने रामेश्वरजी नाईक यांनी केले आहे.
या शिबिरात निदान झालेल्या मेंदुविकार, ह्दविकार, मुकबधीरपणा, कर्करोग यासारख्या अनेक दुर्धर आजारग्रस्त रुग्णांवर सुसज्ज व उच्च श्रेणीच्या रुग्णालयात सल्ला व उपचार सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत. या शिबीरासाठी किनवट येथे प्रथमचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. गरजू गोरगरीब रुग्णांची पुर्व तपासणी करुन छानणी केलेल्या रुग्णांना 24 डिसेंबरला शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने चिकित्सा निश्चित करण्यात येईल. शिबिरानंतर अशा रुग्णांना यथायोग्य उच्च श्रेणीच्या रुग्णालयात योग्य तो औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी मोफत पुरविण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी भव्य मंडपाची उभारणी किनवट येथील भव्‍य मैदान, गोकुंदा रोड येथे लंगर साहिबचे बाबा अमरजितसिंहजी यांचे हस्ते भुमिपुजनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक, संदिप जाधव यांचेसह आरोग्य महाशिबिर समन्वयक डॉ. यशवंत पाटील, संजय रुईकर, श्री. चारी, डॉ. भास्कर पेरके, डॉ मंगेश नळकांडे, संजय डोंगरे, प्रकाश टारपे, रामदासजी निकम, अनिरुद्ध केंद्रे, रघुनंदन मगर, अशोक ओदीवार, संतोष तिरमनवार यांची उपस्थिती होती, अशी माहिती मुख्य शिबिर समन्वयक डॉ. यशवंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

000000
ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी मंगळवार 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी बुधवार 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी प्रतिबंधीत आदेश लागू केला आहे.  
 या ग्रामपंचायतीच्या मतदान व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मतदान केंद्रावर 26 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

00000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात सोमवार 25 डिसेंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 ते 25 डिसेंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000
सोमवारी अल्पसंख्यांक हक्क दिन   
नांदेड, दि. 14 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून सोमवार 18 डिसेंबर 2017 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणवी, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद आदींचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...