वंचिताना
अन्नसुरक्षा देणाऱ्या नांदेडच्या
उपक्रमास
राष्ट्रपती भवनात कौतुकाची दाद
नांदेड
दि. 6 :- वंचितांना जगण्याची उमेद
देणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या अन्न सुरक्षा प्रयत्नाची राष्ट्रीय स्तरावर दखल
घेण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागातर्फे समाजातील वंचित घटकांना स्वस्त धान्य
योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये या
घटकांना दोन रास्त भाव धान्य दुकानासह शिधापत्रिकांचेही वाटप करण्यात आले होते. या
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या संवेदनशील
उपक्रमाबाबत सादरीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निमंत्रीत करण्यात आले होते.
त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पुरवठा अधिकारी
संतोष वेणीकर , सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी आज राष्ट्रपती भवन येथे
सादरीकरण केले. त्याला उपस्थित मान्यवरांनी कौतुकभरली दाद दिली.
जिल्हा पुरवठा विभागाने पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांच्या कल्पकतेतून
वंचितांना अन्न धान्य पुरवठ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार
समाजातील अपंग, विधवा, निराधार, कचरा वेचणारे आदींसह अनेक असे घटक ज्यांच्याकडे
शिधापत्रिका व शासकीय लाभ घेण्यासाठीची आवश्यक कागदपत्रेही नाहीत त्यांना विशेष
बाब म्हणून या योजनेत समाविष्ट करण्यात आले. यामुळे सुमारे 10 हजाराहून अधिक
वंचितांना आता स्वस्त धान्याचा नियमित पुरवठा सुरु झाला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये या
उपक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाची प्रधानमंत्री कार्यालयाने नोंद
घेतली होती व त्याबाबत आवश्यक तपशीलही मागविले होते. देशभरातून मागविण्यात आलेल्या
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नांदेडच्या वंचितांसाठीच्या या संवेदनशील
उपक्रमाने स्थान पटकाविले. या साठहून अधिक प्रकल्प-उपक्रमांचे आज नवी दिल्ली येथे
राष्ट्रपती भवनात विविध मान्यवर-तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी
प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह श्री. वेणीकर
व श्री. काकडे यांनी प्रभावी सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या हा
संवेदनशील उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद ठरला. राष्ट्रीयस्तरावर शासकीय
यंत्रणेतील मानवी आस्थेचा चेहरा असणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्रातून निवडण्यात
आलेल्याया एकमेव उपक्रमास सादरीकरणातही दाद मिळाली. सादरीकरणासाठी उपस्थित
शास्त्रज्ज्ञांनी ज्यामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो)चे अध्यक्ष ए.
एस. किरणकूमार, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॅा.
रघुनाथ माशेलकर यांच्यासह इंडोनेशिया, आस्ट्रेलिया देशातील
शास्त्रज्ज्ञांचा आदींचा समावेश होता. या सर्वांनीच नांदेडच्या या उपक्रमाचा मानवी
आस्थेशी निगडीत महत्त्वपुर्ण उपक्रम असल्याचे नमूद केले. या सादरीकरणात महामहिम
राष्ट्रपतीं समवेत रात्रीभोजसाठीही सन्मानपुर्वक निमंत्रीत करण्यात आले. त्यावेळी
सादरीकरणासाठी उपस्थित मान्यवरांनी नांदेडच्या संवेदनशील उपक्रमाबाबत गौरवोद्गार
काढले. शासकीय यंत्रणेकडून लोकाभिमुखतेचा आणि प्रशासकीय कार्यवाहीत मानवी आस्था
जपण्याचा हा उपक्रम स्त्युत्य असल्याचा आणि त्यामध्ये पुढेही अशीच वाटचाल करता
येईल, असे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्याची माहिती, प्रभारी जिल्हाधिकारी श्री.
पाटील यांनी दिली.
0000000