Monday, February 9, 2026

 वृत्त क्र. 187

 

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर  – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 9 फेब्रुवारी : दि. 10 फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होत असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.

शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची इयत्ता बारावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांद्वारे झूम वेबकास्टच्या माध्यमातून थेट निरीक्षण करण्यात येणार असून परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्ह्यात महसूल विभागाचे विभागप्रमुख, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तसेच तालुका स्तरावरून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. शिक्षण विभागाची सहा विशेष पथके देखील परीक्षेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

तसेच स्वतः जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक हे देखील जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व परीक्षार्थी विद्यार्थी तसेच परीक्षा यंत्रणेत कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीक्षा कॉपीमुक्त, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

००००००



 वृत्त क्र. 186

विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विविध पथकांमार्फत व बैठे पथकाद्वारे कडक नजर; दोषींवर कठोर कारवाई

नांदेड, दि. 9 फेब्रुवारी :- जिल्ह्यात उद्या 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा भीती न बाळगता निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान 100 टक्के कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा होणार असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून काही केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.

परीक्षेच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनासाठी झूम सुविधेद्वारे निरीक्षण केले जाणार असून यासाठी दोन नियंत्रण कक्ष, कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्व परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ, कॉपी किंवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

००००



 वृत्त क्र. 185

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महारेशीम अभियान 2026 च्या फिरत्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

नांदेड, दि. 9 फेब्रुवारी :- शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी रेशीम शेतीला प्राधान्य दिल्यास अधिक व निरंतर उत्पन्न मिळू शकते. रेशीम शेतीबाबत आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात करून प्रायोगिक तत्त्वावर शेती करावी. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात महारेशीम अभियान 2026 अंतर्गत फिरत्या जनजागृती वाहनास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी एन. एम. शशीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी श्री. कोळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मनरेगा अमित राठोड, रेशीम अधिकारी पी. बी. नरवाडे, तांत्रिक अधिकारी कांचन जाधव, रेशीम शेती करणारे शेतकरी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील हवामान रेशीम शेतीस अत्यंत अनुकूल आहे. लोहा तालुक्यातही रेशीम शेती यशस्वीपणे सुरू असून सध्या जिल्ह्यात सुमारे 500 ते 600 रेशीम शेतकरी कार्यरत आहेत. पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेती अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जालना व बीड येथे बाजारपेठ उपलब्ध असून वन्यप्राण्यांचा त्रास नाही, रोगराईचे प्रमाण कमी आहे, निरंतर उत्पन्न मिळते तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) अनुदान मिळते. त्यामुळे कमी कालावधीत सातत्यपूर्ण उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धनगरवाडी येथील रेशीम शेतकऱ्यांशी संवाद साधून रेशीम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती घेतली. यामध्ये धनगरवाडी येथील शेतकरी बालाजी काळे यांनी अवघ्या एका महिन्यात 1 लाख 76 हजार रुपयांचे उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महारेशीम अभियान 2026 च्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सन 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी समूहाने मनरेगा, सिल्क समग्र-2 व पोकरा योजनेंतर्गत तसेच वैयक्तिक स्वरूपात नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

नोंदणीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत, दुसरा मजला, एम. एफ. होंडा शोरूमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटरसमोर, हिंगोली रोड, नांदेड येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक : 9561714145, 7798213333, 9763347777, 8625044438, 7219023328 .

00000












  वृत्त क्र. 184

कौटूंबिक न्यायालयाच्या आस्थापनेवर डाटा एन्ट्री ऑपरेटर पद भरतीसाठी निविदा मागणी 

नांदेड, दि. 9 फेब्रुवारी :-कौटूंबिक न्यायालय, नांदेड च्या आस्थापनेवर तीन वर्ष कालावधीसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर एक पद भरण्यासाठी मान्यता प्राप्त कंत्राटदार यांच्याकडून मनुष्यबळ पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा न्यायालय, नांदेड यांचे https://districts.ecourts.gov.in/nanded या संकेतस्थळावर फेरनिविदा सूचना आणि फेर जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असे आवाहन कौटूंबिक न्यायालयाचे न्यायाधीश यांनी केले आहे.

oooo

वृत्त क्र. 183

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि.९ फेब्रुवारी:- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या समान निधी ‘ग्रंथभेट’ योजना अंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करून राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट स्वरूपात वितरित करण्यात येणार आहेत.

या योजनेअंतर्गत खरेदीसाठी निवड करण्यात येणाऱ्या ग्रंथांचा तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरून प्रसिद्ध होणाऱ्या “शासनमान्य ग्रंथ निवड यादी” मध्ये समावेश होण्यासाठी, सन 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेले व प्रथम आवृत्ती असलेले ग्रंथ लेखक/प्रकाशकांनी प्रत्येकी एक विनामूल्य प्रत खालील पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.

ग्रंथ सादर करण्याचा पत्ता : ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

सदर ग्रंथ दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही.

सन 2025 मध्ये प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वीच संचालनालयास पाठविले असतील, तर ते पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

तसेच, मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत पुढील ठिकाणी पाठविणे अनिवार्य आहे.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई

शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे

शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर

सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधित ग्रंथालयांकडून प्राप्त करून, ग्रंथालय संचालनालयास ग्रंथ पाठविताना ती पोच पावती टपालामार्फत किंवा समक्ष सादर करावी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लेखक व प्रकाशकांनी विहित मुदतीत ग्रंथ सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 182

महारेशीम अभियानाअंतर्गत नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 9 फेब्रुवारी :- मग्रारोहयोअंतर्गत रेशीम विकास योजना रेशीम संचालनालयासह, कृषी विभाग व ग्राम विकास विभागामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवड नोंदणीसाठी तालुका कृषी कार्यालय व तालुका पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पी.बी.नरवाडे यांनी केले आहे. 

सन 2025-26 मध्ये समुहाने मनरेगा, सिल्क समग्र-2 व पोकरा योजनेअंतर्गत तसेच वैयक्तीक नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभियान 2026 दिनांक 4 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. 

तरी नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय रामाकृष्णा इमारत, दुसरा मजला, एम एफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर हिंगोली रोड, नांदेड दूरध्वनी-9561714145, 7798213333, 9763347777, 8625044438, 7219023328 येथे संपर्क करावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पी.बी.नरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

00000

  वृत्त क्र.  187   पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर   – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड, दि. 9 फेब्रुवारी : द...