Saturday, October 31, 2026

वृत्त  

१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद,

 नांदेड येथून प्रारंभ

उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत आढावा, 

१२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मुंबई, दि. ३१: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येत आहे. १ नोव्हेंबरला नांदेड येथून आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणारी ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्यसेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे.

जनतेच्या सूचनांवरून आरोग्य सेवेत सुधारणा

आरोग्य संवाद यात्रा ही केवळ आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम राहणार नसून, नागरिकांच्या अनुभवातून आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय वाढवून आरोग्य सेवांबाबत उत्तरदायित्व मजबूत करण्यावर भर राहणार आहे.

आरोग्य संवाद यात्रेची ठळक वैशिष्ट्ये

या आरोग्य संवाद यात्रेत १२५ नवीन संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, ग्राम आरोग्य, पोषण स्वच्छता समिती यापैकी एका समितीसोबत बैठक व चर्चा करण्यात येईल. शासकीय आरोग्य संस्थांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यात येईल.

राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा व अंगणवाडी यांना भेट देऊन या योजनेचा आढावा घेतील. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत अंगिकृत रुग्णालयांना भेट देऊन खासगी डॉक्टर व रुग्णांशी संवाद साधला जाणार आहे.

गृहभेट व संवाद

पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग, कुष्ठरोग, जननी सुरक्षा योजना लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण यांच्याशी संवाद साधण्यात येईल.

रुग्णांना मिळणाऱ्या सेवांचा आढावा

आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याचा आढावा यात्रेत घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हा, महानगरपालिका, स्त्री मनोरुग्ण आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.

नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे सुधारणा घडवून आणणे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी आरोग्य संवाद यात्रा राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.


मनीषा सावळे  

विसंअ

००००

वृत्त क्रमांक

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सुधारित नांदेड जिल्हा दौरा

नांदेड, दि. 31 (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे  दि. 1 व   2 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित दौरा पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर यांचे नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आगमन व मुक्काम होईल. सकाळी 7.30 वाजता ते मोटारीने उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर येथे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता रुग्णालयाची पाहणी व रुग्णकल्याण समितीची बैठक होईल. सकाळी 9.30 वाजता हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी व दरेगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

सकाळी 10 वाजता ते हिमायतनगर येथून हदगाव येथील खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. 10.40 वाजता खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या निवासस्थानी आगमन करुन सदिच्छा भेट व आरोग्यविषयक विविध विषयावर चर्चा करतील. सकाळी 11 वाजता हदगाव येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी आशियाई विकास बँक प्रगती प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात नव्याने मंजूर 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12 ते 1 पर्यंत राखीव. 

दुपारी 1 ते 5 या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडी बुद्रुक (पावडेवाडी) येथे आयोजित ग्रामीण रुग्णालय व इतर विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देतील. त्यानंतर नांदेड शहरातील विविध आरोग्य संस्था तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकडे प्रयाण. 8.05 वाजता जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे आगमन व पाहणी. 8.30 वाजता जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधतील. 

9.30 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर हे नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यातील वसमतकडे प्रयाण करतील. 

***

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर

• रुग्णालयांची पाहणी, आरोग्य समित्यांची बैठक व दुष्काळग्रस्त भागाचा घेणार आढावा

नांदेड, दि. 31 (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे  दि. 1 व   2 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध आरोग्य संस्थांची पाहणी, रुग्णकल्याण समित्यांच्या बैठका, दुष्काळग्रस्त भागाची पाहणी तसेच शेतकरी व आरोग्य विभागातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर यांचे नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आगमन व मुक्काम होईल. सकाळी 7.30 वाजता ते मोटारीने उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर येथे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता रुग्णालयाची पाहणी व रुग्णकल्याण समितीची बैठक होईल. सकाळी 9.30 वाजता हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी व दरेगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

सकाळी 10 वाजता ते नांदेड येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता रुग्णालयात आगमनानंतर पाहणी, आढावा व रुग्णकल्याण समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधतील. 

दुपारी 1 ते 5 या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडी बुद्रुक (पावडेवाडी) येथे आयोजित ग्रामीण रुग्णालय व इतर विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देतील. त्यानंतर नांदेड शहरातील विविध आरोग्य संस्था तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर हे नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यातील वसमतकडे प्रयाण करतील. 

****

वृत्त क्रमांक

दुष्काळमुक्त नांदेडसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभारणार!

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

• ‘वॉटर कप’ स्पर्धेत गावागावांचा सहभाग वाढवा

नांदेड, दि. 31 : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. श्रमदानातून जलसंधारणाची कामे हाती घेऊन ही चळवळ गावागावांत रुजवावी. दुष्काळमुक्त नांदेडचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकसहभागातून व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2026-27 च्या अनुषंगाने जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आणि विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, विभागीय वन अधिकारी मनीषा पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या गावांना प्राधान्य द्या

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तालुक्याने दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या गावांची यादी तयार करावी. या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक गावातील पाच ते सहा व्यक्तींची निवड करून त्यांची नावे प्राधान्याने सादर करावीत. वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक गावातील जलसंधारणाच्या कामात पुढाकार घेऊ शकणाऱ्या व्यक्तींची निवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी गावागावांत शिवार फेरीचे आयोजन करावे. ग्रामस्थांना श्रमदानाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना या चळवळीत सहभागी करून घ्यावे. ही केवळ जलसंधारणाची मोहीम नसून लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी चळवळ आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या संधीचे सकारात्मक कामात रूपांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसहभागातून जलसंधारणाला बळ

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येणारी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा ही जलसंधारण व पाणलोट व्यवस्थापनावर आधारित महत्त्वपूर्ण मोहीम आहे. या माध्यमातून गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे.

पाणी फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून पाणी व शेती या विषयांवर ग्रामीण भागात प्रशिक्षण, जनजागृती आणि लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित आहे. या कार्याला शासनाचेही सहकार्य मिळत आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातही जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे स्वरूप, अंमलबजावणीची पद्धत, विविध शासकीय विभागांची भूमिका आणि विभागनिहाय सहकार्य याबाबत पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

जलसंधारणाची कामे केवळ शासकीय यंत्रणेपुरती मर्यादित न ठेवता ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, गावपातळीवरील नेतृत्व आणि विविध विभागांचा समन्वय यांतून व्यापक लोकचळवळ उभारण्यावर बैठकीत भर देण्यात आला. गावांनी एकत्रित प्रयत्न केल्यास पाणीटंचाईवर मात करून जलसुरक्षित आणि दुष्काळमुक्त गावांची निर्मिती करणे शक्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

***












वृत्त   १ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद,  नांदेड येथून प्रारंभ उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालया...