Saturday, April 28, 2018


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना
ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत
करण्यास सहाय्य करण्याचे जिल्हाधिऱ्यांचे आवाहन 
नांदेड, दि. 28 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभासाठी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
जिल्ह्यात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 10 कोटी कुंटुंबाना (50 कोटी लाभार्थी ) आरोग्य संरक्षण पुरविण्याचा भारत सरकारच्या नियोजनांतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत परिणामकारकरितीने पोहचणे आणि त्यांना योजनेचा तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबविण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे.  त्याकरीता पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस देशभरात 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित होत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा मोहिम सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेची दोन उद्दीष्टे असून पहिले उद्दीष्टे कार्यक्रमाविषयी त्याच्या लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे, दुसरे उद्दीष्टे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करणे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती घेण्यात येणार आहे. मोबाईल व शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य स्थितीमधील बदल. या ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देऊन 1 ते 8 मे 2018 या कालावधीत संकलीत केली जाणार आहे. ही माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
संकलित केलेली माहिती 8 ते 21 मे 2018 या कालावधीत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्षे 5 लाख रुपये इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे. त्यामुळे जास्तीतजास्त कुटुंबाना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000



राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 28 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्याच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आला आहे. त्यांनी असे खराब झालेले , माती लागलेले जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
000000


जि.प. कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या
समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 28 :- जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार  सार्वत्रिक बदल्या 2018 साठी जिल्हा स्तरावरील बदल्यांचे समुपदेशनाचे वेळापत्रक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार वेळापत्रकाची जिल्हा परिषदे नांदेड अंतर्गत गट क व ड कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या सन 2018 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. शनिवार 5 मे 2018 रोजी सकाळी 9 ते दुपारी 11 वाजेपर्यंत- बांधकाम विभाग. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत- लघुपाटबंधारे विभाग. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत- कृषि विभाग. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत- पशुसंवर्धन विभाग. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत- महिला व बाल कल्याण विभाग. दुपारी 4 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- सामान्य प्रशासन विभाग. रविवार 6 मे 2018 रोजी सकाळी 9 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. बुधवार 9 मे 2018 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत- अर्थ विभाग. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत- शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. दुपारी 2 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- ग्रामपंचायत विभाग. या सर्व समुपदेशनाचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.  या बदलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे कळविण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


हवामान आधारीत फळपिक विमा योजना
मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी
विमा हप्ता बँकेत भरण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 28 :- मृग बहारामधील मोसंबी फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची मुदत गुरुवार 14 जून 2018 अशी असून इच्छूक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा हप्ता बँकेत भरावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
प्राधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुर्नरचीत हवामानावर योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यासाठी शासनाने 25 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील मृग बहारामधील मोसंबी या फळपिकाचा यामध्ये समावेश केला आहे. पुर्नरचीत हवामान आधारीत पिक विमा योजना सन 2018-19 च्या मृग बहाराकरीता मोसंबी या पिकासाठी एकुण विमा संरक्षीत रक्कम प्रती हेक्टर 77 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता प्रती हेक्टर 3 हजार 850 रुपये एवढा आहे. ही योजना जिल्ह्यातील अधिसुचीत केलेल्या महसूल मंडळात इफको टोकीओ विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. मोसंबी फळपिकाखालील पुढील तालुक्यातील महसुल मंडळाचा समावेश आहे. नांदेड तालुक्यात - लिंबगाव व विष्णुपुरी. मुदखेड- मुदखेड व बारड. मुखेड- मुखेड व जाहूर. धर्माबाद- करखेली. हदगाव- हदगाव व पिंपरखेड. कंधार तालुक्यात बारुळ या महसूल मंडळांचा समावेश आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000


 पालकमंत्री रामदास कदम यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 28 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत खरीप हंगाम आढावा बैठक स्थळ : डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, सभागृह नांदेड. दुपारी 3 ते 3.30 वा. नांदेड शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप. स्थळ : डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, सभागृह नांदेड. दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती व जिल्हा कर्करोग नियंत्रण समारंभ कार्यक्रम. स्थळ : डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, सभागृह नांदेड. दुपारी 4.15 ते 4.30 वाजेपर्यंत जिल्हा कर्करोग नियंत्रण कक्षाचे उद्घाटन कार्यक्रम. स्थळ : श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय वजिराबाद नांदेड. सायं 4.45 वा. जिल्हा स्काउट गाईड भवनचे उद्घाटन कार्यक्रम. स्थळ : मल्टीपरपज हास्कुलच्या मागे वजिराबाद नांदेड. रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार 1 मे 2018 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.45 वा. नांदेड येथुन परभणीकडे प्रयाण करतील.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...