Friday, May 19, 2017

शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात  
अडचण येणार नाही यांची खबरदारी घ्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नांदेड, दि. 19 :-  शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
खरीप हंगाम-2017 जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यावी. कृषिनिविष्ठा संबंधी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक झाल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल. जे विक्रेते नियमानुसार चांगल्या प्रकारे कृषिनिविष्ठा वाटप करतील त्यांच्या पाठिशी प्रशासन खंबीरपणे उभे राही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कृषिनिविष्ठा केंद्रधारकांनी ई-पॉस  (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करुन घ्यावे. रासायनिक खताची विक्री ई-पॉस  (e-Pos) मशिनद्वारे योग्य दरात करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.     
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारयांनी कृषि विभागामार्फत डीबीटी प्रकल्प राबविण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही कौतकास्पद असून खत विक्रेत्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन डीबीटी प्रकल्प यशस्वी करावा. शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे, योग्य किंमतीत योग्यवेळी कृषिनिविष्ठा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. तसेच निविष्ठा वाटपा दरम्यान कुठल्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी जिल्हयाची सर्वसाधारण माहिती तसेच खरीप हंगाम 2017 मध्ये प्रस्तावीत निहाय पेरणी ज्यामध्ये ज्वारी- 70 हजार हेक्टर, तुर- 78 हजार हेक्टर, सोयाबीन- 2 लाख 83 हजार हेक्टर कापूस- 2 लाख 65 हजार हेक्टर इतर पिके 76 हजार 575 हेक्टर असे एकूण  7 लाख 72 हजार 575 हेक्टर प्रस्तावीत पेरणी अपेक्षीत असून त्यासाठी लागणारे बियाणे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. खरीप हंगाम 2017 करीता आवश्यक असणाऱ्या रासायन खताची मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार असून रासायनिक खताबाबत टंचाई भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी जिल्हा तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना तसेच निविष्ठा उपलब्धतेबाबत नियंत्रण कक्ष, विक्री केंद्रावर शासनाचे टोल फ्री क्रमांक, भरारी पथक क्रमांकाचे फ्लेक्स लावण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उपलब्धता, दर्जा तसेच अडचणीबाबत याचा उपयोग होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरुवार 1 जून 2017 पासून रासायनिक खताची विक्री e-Pos मशिन द्वारे होणार असून त्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकास्तरीय खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती दिली. e-Pos मशिनचे सविस्तर प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 19 20 मे 2017 रोजी दोन सत्रामध्ये प्रतिसत्र चार तालुक्याप्रमाणे आज नांदेड, मुदखेड, अर्धापूर, नायगाव, कंधार, लोहा, धर्माबाद उमरी तसेच 20 मे रोजी भोकर, देगलूर, मुखेड, बिलोली,  किनवट, माहूर , हिमायतनगर, हदगाव असे अयोजीत करण्यात आले आहे. याचा खत विक्रेत्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी मोरे  यांनी  केले.
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे संदीप गुरमे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे मझरोद्यीन, सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, महाबीजचे व्यवस्थापक पी. टी. देशमुख, कृषि उद्योग विकास महामंडळाचे श्री. राचलवाड, संघटनेचे प्रतिनिधी दिवाकर वैद्य, जुगल किशोर अग्रवाल, खत कंपनीचे प्रतिनिधी, खत विक्रेते आदी उपस्थित होते. मोहीम अधिकारी ए.जी. हांडे यांनी आभार मानले.

000000
माध्यमिक शिक्षकांच्या सेवांतर्गत
प्रशिक्षण कार्यक्रमात बदल
नांदेड, दि. 19 :- प्रशासकीय कारणास्तव माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजनात काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षण सदर दिनांकास होणार नाहीत. माध्यमिक वरिष्ठश्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षणाचा सुधारीत नियोजनाचा कार्यक्रम यथासमय जाहीर करण्यात येणार आहे. मात्र उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण ठरल्याप्रमाणे नियोजित कालावधीत होतील. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणासाठी ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा 12 वर्षे पूर्ण व 24 वर्षे पूर्ण झालेली आहे तसेच जे वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणास पात्र आहेत. अशा सर्व अर्हता प्राप्त शिक्षकांसाठी 1 जून ते 10 जून 2017 या कालावधीत वरिष्ठश्रेणी प्रशिक्षण तर 1 जून ते 6 जून 2017 या कालावधीत निवडश्रेणी प्रशिक्षण विभागीय मंडळामार्फत आयोजित केलेले होते. या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचे विभागस्तराचे प्रशिक्षण रविवार 28 ते  मंगळवार 30 मे 2017 या कालावधीत विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आले आहे. तर विभागस्तराच्या तज्ज्ञांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख मार्गदर्शन तज्ज्ञांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण राज्य मंडळामार्फत दिनांक 19 ते 21 मे 2017 या कालावधीत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, कुसगाव बु, लोणावळा ता. मावळ जि. पुणे येथे आयोजित केलेले आहे. यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजनात काही तांत्रिक बदल करण्यात  येत आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

000000
अर्धापूर येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन   

नांदेड, दि. 19 :- जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद व नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "पाण्याची उत्पादकता वाढवून पाण्याचा प्रभावी वापर" या विषयावर बुधवार 24 मे व गुरुवार 25 मे 2017 रोजी पाटबंधारे वसाहत अर्धापूर येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.   
000000
तत्कालीन जिल्हाधिकारी काकाणी यांना भावपूर्ण निरोप ;
नूतन जिल्हाधिकारी डोंगरे यांचे उत्स्फुर्त स्वागत
नियोजन भवन येथे संयुक्त समारंभ संपन्न  
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी व विविध महसूल संघटनेच्यावतीने नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. हा संयुक्त समारंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात काल संपन्न झाला.  
या समारंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सौ. ज्योती काकाणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध महसूल संघटनाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देवून मावळते जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निरोप तर नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध महसूल संघटनाच्यावतीनेही पुष्पगुच्छे देवून सत्कार करण्यात आला. तसेच श्री. काकाणी यांच्या संकल्पनेवर आधारीत नांदेड जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने "इसापूर ते बाभळी" या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर "प्रवास जलसमृद्धीचा" हा माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला.
प्रशासकीय सेवेच्या संधीचा उपयोग सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्याचे ध्येय समोर ठेवून काम केल्याने व त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याने गेल्या दोन वर्षाच्या काळात अडचणी न येता जिल्ह्यात विविध विकासात्मक व अभिनव उपक्रम राबवू शकलो, असे भावपूर्ण उद् गार  श्री. काकाणी यांनी काढले.
जिल्ह्यात सांघीक प्रयत्नातून जलयुक्त शिवार अभियान, अन्न सुरक्षा योजना, वंचितांना न्याय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, टंचाई परिस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींमध्ये चांगले काम करता आले. जनतेच्या प्रश्नातूनच कामाला दिशा मिळते. आपली भुमिका स्पष्ट ठेवून निष्ठेने, गतीमानतेने पारदर्शकरित्या काम केले तर यश मिळते असे सांगून श्री. काकाणी यांनी नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही सर्वाचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाज सेवेचे व्रत घेवून श्री. काकाणी यांनी केलेले काम निश्चित प्रेरणादायी आहे , अशा शब्दात त्यांचे कामाचा गौरव करुन श्री. डोंगरे म्हणाले की , आदिवासी बहुल किनवट परिसरावर विकासाचे लक्ष केंद्रीत केले जाईल. सर्वांच्या सहकार्यातून नांदेड विकासाचे मॉडेल तयार केले जाईल, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही श्री. काकाणी व डोंगरे यांच्या जुन्या व नव्या आठवणींना उजाळा देवून गौरवपर भाषणे केली.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी दिपाली मोतीयेळे , तहसिलदार व्यंकटेश मुंढे, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे, महसुल विभागाचे शालिनी धुळे, कुणाल जगताप, लक्ष्मण नरमवार, हयून पठाण यांनी आपल्या भाषणात श्री. काकाणी यांच्या नेतृत्व गुण व कामासंबंधी खास शब्दात उल्लेख केला.  
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी प्रास्ताविकात संयमी स्वभाव, दृढनिश्चय व करारी वृत्तीचे श्री. काकाणी होते, असे सांगून त्यांचे स्वभावाच्या अनेक पैलुंचा उलगाडा केला. समारंभाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी व सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी केले तर तहसिलदार डॉ. अरविंद नरसीकर यांनी आभार मानले.
या समारंभास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000
जलयुक्त शिवार अभियानातील विविध कामे
पावसाळ्यापूर्वी नियोजनपूर्वक पूर्ण करावेत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :- राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या महत्वकांक्षी योजना आहेत. या योजनेची कामे संबंधीत यंत्रणांनी येत्या पावसाळ्यापूर्वी नियोजनपूर्वक पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयो कामांची आढावा बैठक श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू तसेच वने, सामाजिक वनीकरण, कृषि आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांच्या प्रगतीचा आढावा घेवून श्री. डोंगरे म्हणाले की, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे व गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना आहेत. या योजनांच्या कामांना अधिक गती देवून येत्या 15 जून पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दयावे. शेतकऱ्यांच्या हिताची गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेत स्थानिकांचा सहभागासाठी त्यांना प्रोत्साहित करावेत. संबंधीत यंत्रणांनी कामांचा नियमित आढावा घेऊन या कामांना अधिकाधिक गती देवून ही कामे पूर्ण करावीत , असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 व सन 2016-17 मधील यंत्रणानिहाय कामांच्या आढावा बरोबर, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी अभिनव योजना आहे. जिल्ह्यात लोकसहभाग व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे सांगितले.  
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी जलयुक्त शिवार अभियान व उपजिल्हाधिकारी (रोहयो)  बी. एम. कांबळे यांनी मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील विविध कामांची माहिती दिली.
0000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...