Friday, September 11, 2020

 

केळी फळपिकाच्या गुणवत्तापूर्ण

उत्पादनासाठी शेतीशाळेचा लाभ घ्यावा

-         तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले

नांदेड (जिमाका) दि. 11 :- केळी फळपिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्धापूर तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी केले. 

फळ पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत केळी या पिकाची शेतीशाळा अर्धापुर तालुक्यातील चैनापूर येथील गणेश राठोड यांच्या शेतात नुकतीच संपन्न झाली.  यावेळी सरपंच  बालाजी जंगीलवाड यांच्या गावातील शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी हॉर्टसॅप अंतर्गत प्रथम फळपिक शेतीशाळा घेण्यात आली.  

सध्या आढळून येणाऱ्या फळपिकावरील कीड व रोगाबाबत चर्चा करुन उत्पादन व गुणवत्ता सुधारण्याची माहिती देण्यात आली. कृषि पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे यांनी शेतीशाळेची मूळ संकल्पना सांगून शेतीशाळेची सुरुवात कृषि परिसंस्थेचा अभ्यास करून केली.  प्रथम पिकवाढीवर  परिसंस्थेचा  जैविक अजैविक, वातावरणीय घटकांचा काय परिणाम होतो या बदलाची निरीक्षणे घेण्यात आली. सोबतच पूर्ण निसवलेल्या घडावर बुरशी, काळे ठिपक्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली. घड व्यवस्थापण करताना घडावर पिकाचा काडीकचरा, अवशेष राहू नयेत. बाग स्वच्छ ठेवावी. काळी ठिपके रसशोषण करणाऱ्या किडीमुळे झाले असून त्यामुळे गुणवत्ता खराब होते. या परिस्थितीत अ‍ॅसिटामिप्रीड 20 एसपी 0.125 ग्राम किवा व्हर्टीसिलीयम लेकॉनि 3 ग्राम किंवा निमाअर्क (15 हजारपीपीएम) 5 मिली + स्टीकर 1 मिलि / लिटर पाण्यात मिसळून ठराविक अंतराने फवारणी करावी. कांदेबाग लागवड करताना 500 ग्रामच्या आतील नवीन कंद लागवडीस वापरावा. लागवडी पूर्वी कंदप्रक्रिया क्लोरोपायरीफॉस अधिक स्ट्रेप्टोसायक्लीनचा वापर करुन लागवड करावी अशी माहिती दिली. या शेतीशाळेस गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शेवटी कृषि सहाय्यक व्ही. एस. केळकर यांनी आभार उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

000000

  

 

मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा 

प्राथमिकतेने कोविड रुग्णालयांना करावा

-         सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करून प्राथमिकतेने त्याचा पुरवठा जिल्हयातील कोविड रूग्णालयांना करावा अशी सूचना पुरवठादारांनी मेडिकल ऑक्सिजचा पुरवठा कोविड रुग्णालयांना निर्धारीत किंमतीतच करावा अशी सुचना सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड यांनी दिल्या. 

कोविड रूग्णालय व इतर आजारावर उपचार करणारे इतर रूग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची मागणी पाहता जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही यासाठी  अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने जिल्हयातील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादक, पुरवठादार, खाजगी कोविड रूग्णालयांचे प्रतिनिधी व इंडियन मेडिकल आसोसिएशनचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक नुकतीच घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

जिल्ह्यात कोविड- 19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ते पाऊल उचलत आहे. रुग्णांसाठी शासकिय जिल्हा रुग्णालय तथा खाजगी कोविड रूग्णालय कार्यरत आहेत. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याअनुषंगाने या बैठकीत जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत व येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा झाली. तसेच कोविड रुग्णालयांच्या प्रतिनिधींना मेडिकल ऑक्सिजनच्या वापरासंबंधी उपकरणांची जुळवणी, ऑक्सिजन फ्लो रेट, दाव व उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनसाठा व रिकामी झालेली नळकांडे तात्काळ पुर्नभरणीसाठी उत्पादकाकडे त्वरीत पाठवणे इत्यादी बाबत दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

इंडियन मेडिकल आसोसिएशनच्या प्रतिनिधींना जिल्हयातील इतर खाजगी रूग्णालयात गरजेपेक्षा जास्त मेडिकल ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा होणार नाही त्याबाबत त्यांच्या सभासदांना सुचित करावे. जिल्हा प्रशासन हे मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करतांना होणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता प्रयत्नशील आहे, असे सहायक आयुक्त (औषधे) रोहित गठोड व  औषध निरिक्षक मा. ज. निमसे यांनी सांगितले.

00000




 

इसापूर धरण 95 टक्के भरल्याने  

पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- येत्या काही दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास जलाशय प्रचालन आराखड्यानुसार पैनगंगा धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात सांडव्याद्वारे सोडण्यात  येईल. त्यावेळी पैनगंगा नदीला पूर येऊ शकतो. संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरीकांना आपली जनावरे, घरघुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावेत, असा सर्तकतेचा इशारा कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिला आहे.   

पैनगंगा नदीवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण 11 सप्टेंबर 2020 रोजी 95.65 टक्के भरले आहे.  धरण पाणी पातळी 440.56 मी आहे. इसापूर धरणाच्या वरच्या भागातील धरणे भरली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान झाल्यास धरण 100 टक्के भरणार आहे. 

इसापूर धरणाचा जलाशय प्रचालन आराखडा मंजुर आहे. या मंजुर आराखड्यानुसार पुढील वेळापत्रकाप्रमाणे जलाशयामध्ये पाणीसाठा साठविणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त पाणी धरणात आल्यास जास्तीचे पाणी सांडव्याद्वारे धरणाच्या खालील बाजुस पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येईल. 

दिनांक 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)- 440.79 एवढी आहे तर टक्के 97.70 असून 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. 440.86 एवढी आहे. तर टक्केवारी 98.61 आहे. दिनांक 16 ते 30 सप्टेंबर कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)- 440.97 असून 99.70 टक्केवारी आहे. 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. असून 440.94 आहे. तर टक्केवारी 99.40 एवढी आहे. दिनांक 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)-441.00 असून 100 टक्केवारी आहे. 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. 441.00 असून तर टक्केवारी 100 आहे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी कळविले आहे.

0000

 

261 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

396 बाधितांची भर तर बारा जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  शुक्रवार 11 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 261 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 396 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 178 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 218 बाधित आले.   

आजच्या एकुण 1 हजार 656 अहवालापैकी  1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 10  हजार 709 एवढी झाली असून यातील  6  हजार 745 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 608 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 55 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात बुधवार 9 सप्टेंबर रोजी हिमायतनगर येथील 37 वर्षाची एक महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, गुरुवार 10 सप्टेंबर रोजी  हदगाव तालुक्यातील कौठा येथील 65 वर्षाच्या एका महिला, नवीपेठ मुखेड येथील 68 वर्षाचा एक पुरुष, आंबेडकरनगर लोहा येथील 80 वर्षाचा एक पुरुष, मुखेड तालुक्यातील पाला येथील 70 वर्षाचा एक पुरुष, देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर येथील 60 वर्षाच्या एका महिलेचाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर किनवट येथील 85 वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोविड रुग्णालयात, नायगाव तालुक्यातील सावरगाव येथील 70 वर्षाची एका महिला, आंबेडकरनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड, शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, फरांदेनगर नांदेड येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 295 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 17, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 13, खाजगी रुग्णालयातून 16, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 8, नायगाव कोविड केंअर सेंटर 2, बिलोली कोविड केंअर सेंटर 8, मुदखेड कोविड केंअर सेंटर 2, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 94, किनवट कोविड केंअर सेंटर 48, हदगाव कोविड केंअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 15, बारड कोविड केंअर सेंटर 1 असे 261 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 114, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर तालुक्यात 2, देगलूर तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 7, लोहा तालुक्यात 1, परभणी 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 8, हदगाव तालुक्यात 8, मुखेड तालुक्यात 12, धर्माबाद 1, कंधार तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 14, हिंगोली 1 असे एकुण 178 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 89, बिलोली तालुक्यात 17,  अर्धापूर तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 13, नायगाव तालुक्यात  2, मुखेड तालुक्यात  17, धर्माबाद तालुक्यात  12, भोकर तालुक्यात 3, नांदेड ग्रामीण 18, मुदखेड तालुक्यात  2, लोहा तालुक्यात 15, कंधार तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 4, उमरी 7 व यवतमाळ 1 असे  एकुण 218 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 608 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 284, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयसोलेशन एकत्रित  1 हजार 669, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 106, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 146, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 119, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 158,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 55, लोहा कोविड केअर सेंटर येथे 88, हदगाव कोविड केअर सेंटर 72, भोकर कोविड केअर सेंटर 8, कंधार कोविड केअर सेंटर येथे 54,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 171, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 28, मुदखेड कोविड केअर सेटर 58,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 29, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 53, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 66, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 354 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 7, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 4 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 63 हजार 62,

निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 308,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 396,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 10 हजार 709,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 19,

एकूण मृत्यू संख्या- 295,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 745,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 608,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 213, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 55,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 64.39 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...