Tuesday, June 13, 2017

नांदेडसह मराठवाड्यात आज
मध्यरात्रीपासून अतिवृष्टीचा इशारा
नांदेड दि. 13 :- मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यात बुधवार 14 जून रोजी मध्यरात्रीपासून पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा मुंबई कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थाप कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.  
भारतीय हवामान खात्याच्या या इशाऱ्यात 15 जून पासून पुढे 48 तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 70 ते 110 मिमीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. पशुधनासह विविध बाबींबाबत काळजी घ्यावी. जीवत व वित्तहानी होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनाही सतर्क रहावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

00000
माहिती अधिकारी तोडकर यांना भावपूर्ण निरोप
नांदेड दि. 13 :- जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथील माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची मुंबई मुख्यालयात बदली झाल्याने आज जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने कौटुंबिक सोहळ्यात श्री. तोडकर यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 
याप्रसंगी श्री. तोडकर यांचा जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. गवळी म्हणाले की, शासकीय सेवेत बदली होत असते. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बदलीमुळे त्याभागातील चांगल्या गोष्टी शिकण्याबरोबर नवनवीन अनुभव मिळतात. त्यामुळे आपल्यामध्ये अधिक प्रगल्भता येते. कार्यालयीन कामकाजात श्री. तोडकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगुन त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. 
माहिती अधिकारी श्री. तोडकर म्हणाले की, सर्वांचे सहकार्यातून नांदेड येथे चांगले काम करता आले. याकाळात नांदेड जिल्ह्यातील विविध घडामोडींशी समरस होऊन काम करता आले. येथील अनेकविध घटकांकडून खूप काही शिकता आले, ही खूप मोठी शिदोरी आहे. 
यावेळी लिपीक सौ. अलका पाटील, के. आर. आरेवार, वाहन चालक म. युसूफ मौलाना, अंधार कोठडी सहाय्यक अंगली बालनरसय्या यांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

00000
वडेपुरीत आरोग्य शिबीर संपन्न
नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आज लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील माता अन्नपर्णादेवी मंदिरच्या द्वितीय  वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 50 नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून त्यात 4 पुरुष व 6 स्त्रियांना  उच्च रक्तदाब तसेच 4 पुरुष व 4 स्त्रियांना मधुमेह आढळून आला. या रुग्णांना  जिल्हा कार्यक्रम अधिकारी (एनसीडी) डॉ. दीपक हजारी यांनी जिल्हा रुग्णालयातील मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेण्याचा सल्ला दिला.

000000
वीज अंगावर पडू नये यासाठी काळजी घ्या  
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या काळात वीज कोसळुन जीवतहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. विशेषत: खरीपाच्या तयारीसाठी शेतशिवारात कामात मग्न असलेल्या शेतकरी, शेतमजुरांनी कोसळणाऱ्या वीजपासून बचावाच्या उपायांची माहिती घ्यावी व जीवतहानी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊसाच्या काळात होणाऱ्या वीज कोसळण्याच्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या आधी अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतकरी, मजूर आणि पशूधनांना इजा होण्याची शक्यता वाढते. अशा परीस्थितीत उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये. 
अवकाळी पाऊस आणि गडगडाच्या कालावधीत  कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळु ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी. एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.
विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर रहावे. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना वाहनातून  बाहेर येवू नये.
विजा चमकत असताना धातुंच्‍या वस्‍तू घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे.
इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनला टेकून बसा. उंच झाडांचा कदापिही आश्रय घेऊ नका, ते वीजपाताला आकर्षित करतात.

0000000
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता
धनजंय मुंडे यांचा दौरा
           नांदेड, दि. 13 -  राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 14 जुन 2017 रोजी हिंगोली येथून मोटारीने रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
            गुरुवार 15 जुन 2017 रोजी नांदेड येथे राखीव व सायंकाळी सोयीनुसार नांदेड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

0000000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 15.07 मि.मी. पाऊस
           नांदेड, दि. 13 - जिल्ह्यात मंगळवार 13 जून 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 15.07  मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  दिवसभरात एक241.07 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 13 जून 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे : नांदेड- 12.63, मुदखेड- 2.07, अर्धापूर- 12.33, भोकर- 25.00, उमरी- 10.00, कंधार-24.00, लोहा-5.67, किनवट-17.14, माहूर-42.50, हदगाव-14.57 , हिमायतनगर-11.00, देगलूर- 8.83, बिलोली- 23.60, धर्माबाद- 2.67, नायगाव-18.06 , मुखेड-11.00.  

00000000
महात्मा फुले विकास महामंडळाचे
योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या). नांदेड यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या महामंडळाच्या नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
महामंडळाच्यावतीने 50 टक्के अनुदान योजनेची प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये असून प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. बीज-भांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 5 लाखापर्यंत आहे. प्रकल्प मर्यादा 20 टक्के बीज भांडवल योजनेसाठी 4 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येते. यामध्ये महामंडळाचे 10 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड समान हप्त्यात तीन ते पाच वर्षात करावी लागते, यात अर्जदाराचा सहभाग 5 टक्के आहे. 
या योजनांसाठी अर्ज करताना पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे राहतील. अर्जदार अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला दाखला, उत्पन्न शहरी भागात 50 हजार 500 तर ग्रामीणसाठी 40 हजार 500 रुपयापेक्षा जास्त नसावे. पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायनुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले जसे वाहनाकरीता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी, अधारकार्ड व पॅनकार्ड जोडावेत.
लाभार्थीने यापूर्वी महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच तो कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्तता करुनच अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सोमवार 31 जुलै 2017 पूर्वी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. एका व्यक्तीने एकाच योजनेमध्ये अर्ज करावा. अर्जदाराने स्वत: मूळ प्रमाणपत्रासह कार्यालयात अर्ज दाखल करुन रितसर पोच पावती घ्यावी. गैर अर्जदाराकडून अर्ज स्विकारले जाणार नाही, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकानी कळविले आहे. अधिक माहिती व तपशीलासाठी इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक, पूर्व बायपास रोड, ग्यानमाता इंग्लीश स्कूल समोर, नांदेड येथे संपर्क साधावा.

000000
सैन्य, पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी
अनुसूचित जाती, नवबौध्द युवकांना संधी
19 जून रोजी नांदेड येथे निवड शिबीर
नांदेड दि. 13 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवकांसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी सोमवार 19 जून 2017 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्य आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना सैन्य व पोलीस भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. एकूण प्रशिक्षणार्थी 30 टक्के महिला व 70 टक्के पुरुष प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
            उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारिरीक व मानसिकदृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी सोमवार 19 जून 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नमस्कार चौक, नांदेड येथे मुळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी कळविले आहे.

                                                                  00000
बालकामगार विरोधी दिन
विविध उपक्रमांनी साजरा
नांदेड, दि. 13 :-  जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जनजागृती रॅलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले. या रॅलीस उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प सचिव अनुराधा ढालकरी यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.  
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 9 विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जातात. त्यामध्ये एकूण 443 बालकामगारांना शिक्षण दिले जाते. नांदेड शहरांतर्गत एकूण 6 विशेष प्रशिक्षण केंद्र असून त्यामध्ये 300 बालकामगारांना शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांपैकी 120 जणांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला आहे.
यावेळी नायब तहसिलदार तथा प्रभारी प्रकल्प संचालक डी. एन. पोटे, सहाय्यक कामगार आयुक्त श्री. मोरुडे, कामगार अधिकारी अविनाश पेरके, कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती रुक्मीणी पवळे, तसेच शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. रॅलीचा समारोप बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झाला. तसेच अर्धापूर, भोकर, मुदखेड याठिकाणी बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...