Wednesday, November 15, 2023

 वृत्त 

विकसीत भारतासाठी दुर्गम भागातील

आदिवासींच्या विकासावर शासनाचा प्रामुख्याने भर

- पालकमंत्री गिरीश महाजन 

· विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिमेचा किनवट येथे शुभारंभ 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर आपण भर देत आहोत. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार ज्या योजना त्यांना योग्य असतील अशा योजना साकारलेल्या आहेत. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, स्वयंरोजगारापासून कृषी पर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी आहे. शासकीय योजनाप्रती सकारात्मकता ठेऊन त्या-त्या योजनांचा लाभ घेतल्यास भारताला विकसीत देशाच्या क्रमवारीत येण्याला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. 

विकसीत भारत संकल्प यात्रेच्या किनवट येथील शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गोकुंदा येथील सरपंच अनुसया सिडाम, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सुधाकर भोयर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

आदिवासी समाज हा राना-वनात राहणारा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजानेही मोठे योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, तंट्ट्या भिल्ल, तेलंगा ख‍डीया, वीर नारायण सिंह, जत्रा भगत, अल्लूरी राजू, बुधू भगत या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले आहे. जल, जमीन, जंगल यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. आदिवासींच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या आदिवासींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याच्या कामास निश्चित गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून विकसीत भारत संकल्प यात्रा होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी कटिबद्ध होऊन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपण देवू शकलो, असे ते म्हणाले. प्रत्येक वाड्या-पाड्यांवर आदिवासी वस्तींवर शुद्ध नळाचे पाणी पोहोचले पाहिजे यासाठी हर घर नल से जल ही योजना त्यांच्याच दूरदृष्टीतून साकारली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 50 लाखांपेक्षा अधिक आदिवासींना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुमारे 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक कुटुंबियांना शासन शौचालय देवू शकले. शासकीय योजनांद्वारे झालेले हे मोठे परिवर्तन आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

0000

छाया :- सदानंद वडजे, नांदेड.







 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...