वृत्त क्र. 1236
तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला
राष्ट्रीय दुःखवटयामुळे माळेगाव यात्रेतील डॉ.शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन पुढे
नांदेड दि. २७ डिसेंबर : भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाल्यामुळे २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनीच्या नियोजित 29 डिसेंबरच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला असून आता हे प्रदर्शन 2 जानेवारीपासून सुरू होणार आहे.शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
26 डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भारतातील प्रसिद्ध यात्रा माळेगाव येथे सटवाई मंदिराजवळ हे प्रदर्शन दोन ते चार जानेवारी या कालावधीत होणार आहे. माळेगाव यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा व प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पुरस्कार प्राप्त शेतकरी, स्टॉल धारक तसेच शेतातील फळे भाजीपाला व पिके स्पर्धेसाठी आणणाऱ्या स्पर्धकांनी हा बदल तातडीने लक्षात घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
पिके स्पर्धा 2 जानेवारीला
या प्रदर्शनातील सर्वात महत्त्वाची फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा 2 जानेवारीला होईल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा.स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे नमुने 2 जानेवारी गुरुवारी सकाळी बारा वाजेपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनात कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये आणून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सत्कार कार्यक्रम सकाळी 11 वाजता
या कृषी प्रदर्शनात प्रस्तावित करण्यात आलेला कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील दोन जानेवारीला च होणार आहे.कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार ठीक सकाळी अकरा वाजता होईल, सर्व संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सकाळी स्टॉल उभारावे
तसेच प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व स्टाल धारकांनी आपले बियाणे, खते, औषधी, ट्रॅक्टर, शेती उपयोगी अवजारे व इतर सर्व स्टॉल दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी कृषी प्रदर्शनात उभे करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे. त्यासाठी लवकर कार्यक्रम स्थळी पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कृषी प्रदर्शन २ ते ४ जानेवारी
फळे भाजीपाला व मसाले पिके स्पर्धा तसेच कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार हा दोन जानेवारी रोजी होत आहे तथापि हे कृषी प्रदर्शन दोन ते चार जानेवारी असे तीन दिवस सुरू असणार आहे तेव्हा नांदेड महानगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला भेटी द्याव्यात असे आवाहनही कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे.
000000