Saturday, June 20, 2020


वृत्त क्र. 559   
कोरोनातून 23 व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी
नवीन चार व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह  
नांदेड (जिमाका) दि. 20 :- डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 15 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथील 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने जिल्ह्यातील एकुण 23 बाधितांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 209  व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. आज सायं 5 वाजेपर्यंत नांदेड शहरातील राजनगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष, रहेमतनगर येथील 48 वर्षाचा एक पुरुष आणि भगतसिंग रोड नांदेड येथील 55 वर्षाची एक महिला आहे. याचबरोबर 62 वर्षाचा पिरबुऱ्हानगर येथील एका पुरुष रुग्णाचा 19 जून रोजी मृत्यू झाला आहे. मृत्यूपश्चात सदर रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 77 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले.आजच्या 4 बाधित व्यक्तींमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 301 एवढी झाली आहे. पुणे येथून 2 कोरोना बाधित रुग्ण वय 12 व 16 वर्षे तसेच मंडई नांदेड येथील रहिवासी असलेली 45 वर्षाची माहिला हैद्राबाद येथून संदर्भीत करण्यात आली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्याची एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 304 एवढी झाली आहे. आतापर्यंत 304 बाधितांपैकी 209 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 81 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.
 नांदेड जिल्ह्यात 81 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 20 जून रोजी 45 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 825,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 639,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 950,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 04,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 304,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 209,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 81,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 45 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000



वृत्त क्र. 558   
नांदेड जिल्हा प्रशासनाचा
अखिल भारतीय पातळीवरील पुरस्काराने गौरव
कर्करोग नियंत्रण जनजागृतीसाठी राबविली होती अभिनव मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कर्करोगासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासंदर्भात राबविलेल्या मोहिमेला अखिल भारतीय पातळीवरील डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला आहे. या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही मोहिम यशस्वी करणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
कर्करोग आजारासंदर्भात लोकांनी निसंकोचपणे आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील बाराशे खेड्यांमध्ये 1 हजार 500 आशा कार्यकर्ती यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. याचबरोबर रॅली व इतर उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास 25 लाख लोकांना स्क्रीनिंगच्या कार्यकक्षेत घेता आले. यात सुमारे 12 हजार लोकांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने त्यांना वेळेवरच योग्य उपचारासाठी पाठविण्यात आले. वेळीच त्यांना उपचार मिळाल्याने पुढील संभाव्य आजाराच्या संकटापासून त्यांना वाचविता आले. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ही मोहिम राबविली गेली.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण जिल्हाभर राबविल्या गेलेल्या या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर गुड गव्हर्नन्ससाठी मान्यता प्राप्त असलेल्या स्कोच अर्वाडसाठी नामांकन दाखल केले होते. यानंतर सदर संस्थेने अखिल भारतीय पातळीवरील नवीन दिल्ली येथे या वर्षाच्या जानेवारी महिन्यात एक मोठी परिषद घेऊन प्रत्येक नामांकन सादर करणाऱ्या जिल्हा प्रमुखांना सादरीकरण करण्यास सांगितले होते.  यात नांदेड जिल्ह्याचे सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी करुन संपूर्ण जिल्ह्याचा सप्रमाण आराखडा ठेवला होता. नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या माहितीने सारे सभागृह भारावून गेले होते. निवड समितीनेही याची चांगली दखल घेत नांदेड जिल्ह्याला अखिल भारतीय पातळीवरील हा डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अशोक काकडे, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, बार्षी येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार पानसे, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व जिल्हा परिषदेतील संबंधीत यंत्रणेने यासाठी पुढाकार घेतला.
0000

वृत्त क्र. 557


21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त
प्रत्येक घरात योगाचे महत्व रुजण्यासाठी विशेष कार्यक्रम   
नांदेड (जिमाका) दि. 20 :- कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने घातलेले थैमान रोखण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तीगत पातळीवरील अंतराचे भान ठेवत मास्कच्या वापरासह अधिकाधिक निरोगी शरीर ठेवण्याशिवाय पर्याय नाही. निरोगी आयुष्याचा मंत्र योगविद्याच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीने अवघ्या जगाला दिला आहे. कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी कोणताही खर्च न लागणारा योगाचा हा उपाय प्रत्येक नागरिकात रुजावा यासाठी आयुष संचालनालयाने आवाहन केले आहे. योगाभ्यासाचे महत्व लक्षात घेता त्याच्या प्रसारासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पाळला जातो. जिल्ह्यात हा संदेश अधिक प्रभावीपणे घराघरात पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेतला असून उद्या रविवार 21 जून रोजी सकाळी 7 वा. जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्या https://www.facebook.com/dionanded/  या वेबपेजवरुन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील हे सुसंवाद साधतील.
00000


फेसबुक लाईव्ह
उद्या रविवार 21 जून सकाळी 7 वा.
विषय :-  
कोविड 19 च्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाचे महत्व.
प्रमुख उपस्थिती :-
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील.
फेसबुक लाईव्हवर सकाळी 7 वाजता क्लिक करा
https://www.facebook.com/dionanded/
 या लिंकवर.
सहभागी व्हा कोरोना पासून सुरक्षिततेच्या या चळवळीत,
योगाभ्यासाचा मंत्र जपत.

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...