Saturday, November 5, 2016

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
नांदेड, दि. 5 :- संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी सीडीएसची परीक्षा 5 फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2016 अशी आहे. परीक्षेची जाहिरात 9 नोव्हेंबर 2016 रोजी रोजगार समाचारमध्ये आणि संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचे www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
सीडीएस परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 18 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालवधीत सीडीएस कोर्स क्र. 53 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मंगळवार 15 नोव्हेंबर 2016 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावरील recruitment tab ला क्लीक करुन त्यामध्ये सीडीएस-53 कोर्ससाठी उपलब्ध महत्वाच्या तारखा व चेक लिस्ट सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करुन त्यांना डाऊनलोड करुन त्याची दोन प्रतीतमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी केले आहे.

000000
नेव्ही माजी सैनिकांची 25 नोव्हेंबर रोजी बैठक
नांदेड, दि. 5 :-  नेव्ही कॅप्टन पी. प्रशांत हे शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे भेट देत आहेत. जिल्ह्यातील नेव्हीमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाबरोबर ते चर्चा करणार आहेत. नेव्हीमधून निवृत्त झालेले माजी सैनिक व माजी सैनिक संघटना अध्यक्ष व प्रतिनिधी यांनी शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद तुंगार यांनी केले आहे.

000000
आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांसाठी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड, दि. 5 :-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात गुरुवार 1 डिसेंबर 2016 पासून सुरु होणाऱ्या 92 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धापरीक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016  तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रवेशाच्या अटी- उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परिक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परिक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदविधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2016 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.  प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँकेमध्ये चालू खाते आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा या प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनाची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 25 नोव्हेंबर 2016 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या व जातीच्या प्रमाणापत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट जि. नांदेड यांनी कळविले आहे. अधिक माहिती व तपशीलासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुलेनगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड दूरध्वनी 02469-221801 येथे संपर्क साधावा. 

000000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवारी आयोजन
नांदेड, दि. 5 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणतर्फे नांदेड जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातीत सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवार 12 नोव्हेंबर 2016 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी, संपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, विविध बॅंकांची तसेच विविध मोबाईल कंपन्यांची दाखल पूर्व प्रकरणे, चेक अनादरित झाल्याबाबतचे खटले आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मनपा अधिकारी, र्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, विविध मोबाईल कंपन्याचे अधिकारी, पक्षकारांनी राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढ पैसा, वेळ वाचवून राष्ट्रीय लोकन्यायालय  यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            गतमहालोकन्यायालयामध्ये मिळालेले यश पाहता यावर्षी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. . आर. कुरेशी यांनी व्यक्त केला. पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधी न्यायालयात दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधीसेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपले आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रूपाने सुवर्ण संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असेही आवाहन न्या. कुरेशी यांनी केले आहे.

000000
विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी
निर्भय, मुक्तपणे मतदान करावे - डॉ. पाटील
उमेदवारी यादी निश्चित , 19 नोव्हेंबरला मतदान
नांदेड, दि. 5 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, तर निवडणुकीत गुप्त आणि अत्यंत पारदर्शी प्रक्रियेद्वारे मतदान होणार असल्याने मतदारांनी निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी आज येथे केले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज अंतिम मुदतीनंतर उमेदवारी यादी निश्चित झाली. त्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत डॅा. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील तसेच उमेदवार अमरनाथ राजूरकर, श्यामसुंदर शिंदे तसेच पक्ष प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी निवडणुकीबाबत तपशीलवार माहिती दिली.  निवडणुकीसाठी शनिवारी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत मतदान होईल. जाहीर प्रचाराचा कालावधी गुरुवार 17 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत राहील. निवडणुकीसाठी शुक्रवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान साहित्य रवाना करण्यात येईल. मतदानासाठी पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या 14 पैकी कोणताही एक छायाचित्र असलेल्या पुरावा सोबत ठेवावा लागेल. मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल तसेच अन्य कोणतेही इलेक्ट्रॅानिक उपकरण ज्याद्वारे छायाचित्र, चित्रीकरण करता येईल, असे नेता येणार नाही. मतदानासाठी पंसती क्रमाची मतदान पद्धती असल्याने, मतदारांना उमेदवाराच्या छायाचित्रासह असलेल्या मतपत्रिकेवर पसंती क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडूनच जांभळ्या शाईचा पेन पुरविण्यात येणार आहे. मतपत्रिका आणि मतदान याबाबतची सर्व प्रक्रिया गुप्त मतदान प्रक्रियेनुसार काटेकोरपणे अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान करता येणार आहे.
निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होईल. मतदान आणि मतमोजणीसाठी विहीत पद्धतीने उमेदवारांना आपले प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहेत. मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 472 मतदार पात्र आहेत. त्यामध्ये 227 मतदार पुरूष तर 245 मतदार स्त्रिया आहेत. या मतदारांची 18 भाग असलेली यादी छायाचित्रांसहीत यापुर्वीच जाहीर करण्यात आली आहे.
बैठकीत आचारसंहिता तसेच विविध प्रकारच्या परवानग्या, स्थळांचा वापर याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे याबाबत निर्देश देण्यात आले.

0000000
अनामिका झाली…दुर्गा..प्रशासनाच्या
संवेदनशीलतेचा चेहरा...अनाथ चिमुकलीचे पुनर्वसन

नांदेड, दि. 5 :- तिला नाव नव्हते. ती सापडली माहूरगड परिसरात तेही नवरात्रोत्सवातच. त्यामुळे तिला नाव मिळालं, दुर्गा....आणि जिल्हाधिकारी सुरेश काकाणी आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेमुळे तिचं पुनर्वसनही झालं. पितृछाया बालकाश्रमाच्या ललिता कुंभार सांगत होत्या. एका मूक आणि चिमुकल्या जीवाच्या पुनर्वसनाचा प्रवास.
नवरात्रोत्सवाच्या काळातच माहूरगड परिसरात एका मूक आणि मतीमंद अशी मुलगी आढळून आली. माहूरगड संस्थानातील विविध घटकांनी आपल्यापरीने या मुलीच्या पालकांचा शोध घेतला. प्रयत्न थकले, तेव्हा माहूरच्या पोलिसांकडे या मुलीला सोपविण्यात आले. पण साधारणत: सात वर्षांची आणि मूक-मतीमंद असल्याने, तिच्या पुनर्वसनासाठी शोध सुरु झाला. जिल्हा बालकल्याण समितीद्वारे हा शोध पोहचला नांदेड येथील पांडुरंगनगर मधील पितृछाया बालकाश्रमाच्या ललिता कुंभार यांच्यापर्यंत. पण मतीमंद आणि मूक मुलींचा सांभाळ करण्याची व्यवस्था बालकाश्रमाकडे नसल्याने, श्रीमती कुंभार यांनी या दुर्गेच्या पुनर्वसनासाठी योग्य संस्थेची शोध सुरु केला. श्रीमती कुंभार यांनीच नाव, गाव कोणताही मागमूस नसलेल्या या चिमकुलीला दुर्गा हे नाव दिले. या दुर्गेच्या वैद्यकीय तपासणीसाठीही त्यांनी प्रयत्न केले.
सुमारे पंधरा दिवसांच्या काळात रात्रं-दिवस त्यांनी दुर्गाची काळजी घेतली. तिला घेऊनच श्रीमती कुंभार थेट जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडे पोहचल्या. दुर्गाची माहिती आणि प्रवास सांगितल्यानंतर, जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध यंत्रणांना कार्यान्वीत केले... आणि दुर्गाच्या चांगल्या पुनर्वसनासाठी पर्याय शोधणे सुरु झाले. यासाठी महिला व बालविकास यंत्रणेसह विविध यंत्रणांची चक्रे फिरली...अखेरीस सोलापुरच्या सोलापूर जिल्हा मतिमंद मुलींचे बालगृह हा पर्याय दृष्टीपथात आला. त्यानुसार जिल्हा बालकल्याण समितीच्या शिफारशीनुसार श्रीमती कुंभार यांनी दुर्गाला सोलापुरातील या मुलींच्या बालगृहात पोहचते केले. दुर्गेच्या चिंतेने गेली कित्येक दिवस सुरु असलेली श्रीमती कुंभार यांची तगमग, पुनर्वसनासाठी योग्य संस्था मिळाल्याने, शांत झाली.
अशारितीने माहूरगड येथून सुरु झालेल्या एका अनामिकाचा प्रवास, श्रीमती कुंभार आणि जिल्हाधिकारी काकाणी तसेच या दरम्यानच्या विविध प्रशासकीय पातळीवरील संवेदनशीलतेमुळे सोलापुरच्या बालगृहापर्यंत जाऊन संपला. यामध्ये तिला नावही मिळाले, दुर्गा. जिल्हाधिकारी काकाणी यांनी दुर्गासाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करणाऱ्या विविध घटकांसह आणि श्रीमती कुंभार यांच्या धडपडीला दाद दिली आहे. त्यांचे कौतूक केले आहे.

0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...