अनामिका झाली…‘दुर्गा’..प्रशासनाच्या
संवेदनशीलतेचा चेहरा...अनाथ चिमुकलीचे पुनर्वसन
नांदेड,
दि. 5 :- तिला नाव नव्हते. ती सापडली माहूरगड परिसरात तेही नवरात्रोत्सवातच. त्यामुळे
तिला नाव मिळालं, दुर्गा....आणि जिल्हाधिकारी सुरेश काकाणी आणि प्रशासनाच्या
संवेदनशीलतेमुळे तिचं पुनर्वसनही झालं. पितृछाया बालकाश्रमाच्या ललिता कुंभार
सांगत होत्या. एका मूक आणि चिमुकल्या जीवाच्या पुनर्वसनाचा प्रवास.
नवरात्रोत्सवाच्या
काळातच माहूरगड परिसरात एका मूक आणि मतीमंद अशी मुलगी आढळून आली. माहूरगड
संस्थानातील विविध घटकांनी आपल्यापरीने या मुलीच्या पालकांचा शोध घेतला. प्रयत्न
थकले, तेव्हा माहूरच्या पोलिसांकडे या मुलीला सोपविण्यात आले. पण साधारणत: सात
वर्षांची आणि मूक-मतीमंद असल्याने, तिच्या पुनर्वसनासाठी शोध सुरु झाला. जिल्हा
बालकल्याण समितीद्वारे हा शोध पोहचला नांदेड येथील पांडुरंगनगर मधील पितृछाया
बालकाश्रमाच्या ललिता कुंभार यांच्यापर्यंत. पण मतीमंद आणि मूक मुलींचा सांभाळ
करण्याची व्यवस्था बालकाश्रमाकडे नसल्याने, श्रीमती कुंभार यांनी या दुर्गेच्या
पुनर्वसनासाठी योग्य संस्थेची शोध सुरु केला. श्रीमती कुंभार यांनीच नाव, गाव कोणताही
मागमूस नसलेल्या या चिमकुलीला दुर्गा हे नाव दिले. या दुर्गेच्या वैद्यकीय
तपासणीसाठीही त्यांनी प्रयत्न केले.
सुमारे
पंधरा दिवसांच्या काळात रात्रं-दिवस त्यांनी दुर्गाची काळजी घेतली. तिला घेऊनच
श्रीमती कुंभार थेट जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडे पोहचल्या. दुर्गाची माहिती आणि
प्रवास सांगितल्यानंतर, जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध यंत्रणांना
कार्यान्वीत केले... आणि दुर्गाच्या चांगल्या पुनर्वसनासाठी पर्याय शोधणे सुरु
झाले. यासाठी महिला व बालविकास यंत्रणेसह विविध यंत्रणांची चक्रे फिरली...अखेरीस
सोलापुरच्या सोलापूर जिल्हा मतिमंद मुलींचे बालगृह हा पर्याय दृष्टीपथात आला.
त्यानुसार जिल्हा बालकल्याण समितीच्या शिफारशीनुसार श्रीमती कुंभार यांनी दुर्गाला
सोलापुरातील या मुलींच्या बालगृहात पोहचते केले. दुर्गेच्या चिंतेने गेली कित्येक
दिवस सुरु असलेली श्रीमती कुंभार यांची तगमग, पुनर्वसनासाठी योग्य संस्था
मिळाल्याने, शांत झाली.
अशारितीने
माहूरगड येथून सुरु झालेल्या एका अनामिकाचा प्रवास, श्रीमती कुंभार आणि जिल्हाधिकारी
काकाणी तसेच या दरम्यानच्या विविध प्रशासकीय पातळीवरील संवेदनशीलतेमुळे
सोलापुरच्या बालगृहापर्यंत जाऊन संपला. यामध्ये तिला नावही मिळाले, दुर्गा.
जिल्हाधिकारी काकाणी यांनी दुर्गासाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करणाऱ्या विविध घटकांसह
आणि श्रीमती कुंभार यांच्या धडपडीला दाद दिली आहे. त्यांचे कौतूक केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment