Tuesday, October 11, 2022

 बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक

-        जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर

 

नांदेड (जिमाका) दि. 11  :- बालकांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण व रक्तक्षयाची समस्या निर्माण होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णपणे होत नाही. त्यासाठी   प्रत्येक पालकांनी आपल्या घरातील 1 ते 19 या वयोगटातील  बालकांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगावे. निरोगी जीवन जगण्याचा कानमंत्र द्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ  भोसीकर यांनी केले.   

 

जिल्हा रूग्णालय येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे  उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.एच के साखरे , डॉ. मनुरकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. विजय पवार, मेट्रन श्रीमती जाधव,  नरवाडे  जयश्री वाघ, तसेच कार्यालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेचे  जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त  हे ब्रीद वाक्य आहे. ही मोहिम  जिल्ह्याअंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्थामध्ये राबविण्यात येत आहे.  1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व बालके व किशोरवयीन मुला-मुलीस जिल्ह्यांतर्गत संपूर्ण शासकीय आरोग्य संस्थेच्या  माध्ययमातून जंतनाशक गोळ्या देण्यात येत  असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.

 

चांगल्या आरोग्यासाठी सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, जेवणापूर्वी व शौचानंतर  नियमित साबनाणे हात धुणे, नखे कापणे, नेहमी स्वच्छ पाणी पिणे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ज्या बालकांनी जंतनाशकाचा गोळा घेतल्या नाहीत त्यांनी 15 ऑक्टोबर पर्यत मॉप अप दिनी गोळ्या घेऊन जंतमुक्त व सशक्त  जीवन जगण्याचा प्रयत्न करावा,  असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर यांनी केले. याप्रसंगी धनश्री गुंडाळे यांनी जंतनाशक गोळ्या विषयी समुपदेशन केले.

00000



 जिल्ह्यातील 697 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यातील 697 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली असून लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला 4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 

 

आज पर्यंत 29 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या 9 पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. इतर प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 83 गावे लम्पी बाधित आहेत. या 83 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 36 हजार 150 एवढे आहे. यातील 697 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 433 एवढी आहे. एकुण गावे 516 झाली आहेत. या बाधित 83 गावांच्या किमी परिघातील 516 गावातील (बाधित 83 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही लाख 38 हजार 974 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 29 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

 शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात

134 प्रशिक्षणार्थ्यांची निवड

नांदेड (जिमाका) दि. 11 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बीटी आरआय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध आस्थापनेतील विविध व्यवसायाच्या 708 जागा उपलब्ध होत्या. उपस्थित 262 प्रशिक्षणार्थ्यां पैकी 134 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्यात ऋचा इंजिनिअरिंग, बडवे इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड, इंडुरन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, एन.आर.बी बेरिंग्स, क्लाड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, धनंजय मेटल क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद इ. नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसशिप विषयक सविस्तर माहिती देवून कंपनी पॉलीसी, स्टायपेंड इत्यादी बाबी सविस्तरपणे सांगण्यात आल्या.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उप प्राचार्य एस.एस.परघणे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के अन्नपुर्णे, प्रबंधक श्रीमती राठोड, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार एन.एन.सामाले, गटनिदेशक श्री. खानजोडे, श्री. भोसीकर तथा कंपनीचे प्रतिनिधी सचिन केदारे, अक्षय कुबेर, रितेश शुक्ला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन एस.एम.राका यांनी केले. संस्थेतील एनएसएस प्रमुख       श्री. कलंबरकर, श्री. उदबुके, श्री. केदारे, श्री. चुनपवार, श्री. बनाटे, श्री. गिरी, श्री. हक्कानी , श्री. पुंडगे आणि श्री. हिंगोले यांनी सहकार्य केले.

0000 

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...