13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन
शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह
प्रत्येक नागरिकांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घ्यावा
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम गतवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशाने साजरा केला. यावर्षी त्याच उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊन या अमृत वाटचालीत देशाने साध्य केलेल्या प्रगतीचा आनंद 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस तिरंगा फडकावून साजरा करू यात. संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी यात आपला सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची अंमलबजावणी मागील वर्षी अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकविला होता. सहा कोटी लोकांनी आपली कटिबद्धता ‘सेल्फी विथ तिरंगा’ घेवून त्याची माहिती दिलेल्या वेबसाइटवर अपलोड केली होती.
आपल्या स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे या उद्देशाने हा उपक्रम देशभर राबविला जात असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यक्तीचा सहभाग यात होण्यासाठी शासकीय यंत्रणांसह विविध सेवाभावी संस्थाही पुढाकार घेत आहेत. शिक्षण विभाग, महाविद्यालये, सर्व संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक यांनी देशभक्तीच्या या उपक्रमात हिरिरीने सहभाग घेवून योगदान द्यावे, असे शासनाने आवाहन केले आहे.
भारतीय ध्वज संहितेच्या अधिन राहून
राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकवावा
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर
घर तिरंगा” हे अभियान उत्साहात राबविण्यासमवेत राष्ट्रध्वज
यथोचितरित्या सन्मानाने फडकविण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. राष्ट्रध्वज
फडकवितांना राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी, तसेच
राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शासनातर्फे
करण्यात आले आहे. हे अभियान प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्यपणे राबविण्याचे
आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक अंगणवाडी, शाळा,
महाविद्यालये, शासकीय आणि निमशासकीय संस्था, खाजगी संस्था, सर्व महामंडळे, शासकीय
व खाजगी इस्पितळे, सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापनांची कार्यालय, कारखाने व
दुकाने इत्यादी ठिकाणी “हर घर तिरंगा”
हे अभियान राष्ट्रध्वज फडकवून राबविले जाईल. दि. 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस
प्रत्येक ठिकाणी वर दिलेल्या निर्देशाप्रमाणे तिरंगा फडकविण्याचे सर्व यंत्रणांना
कळविले आहे.
0000
00000