Tuesday, November 19, 2019


चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह
8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी
मुंबई, दि. 19 : राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
            ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते.
            प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.
            विविध प्रवर्ग आणि त्यासाठी अध्यक्षपद आरक्षित झालेल्या जिल्हा परिषदा पुढीलप्रमाणे आहेत.
·         अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
·         अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद
·         अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदूरबार, हिंगोली
·         अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
·         नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशिम, अमरावती
·         नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदूर्ग, सांगली, वर्धा, बीड
·         खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
·         खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर
००००


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी
7 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 19 :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांच्या योजनांबाबत इच्छूकांनी अधिक माहितीस्त्व आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानांचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणारे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करुन इंग्रजी, हिंदी भाषेत  भरावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत प्रतिष्ठानकडून निर्देश देण्यात आले आहेत.
 असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा याबाबत www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावरील असमान निधी योजना या खिडकीखाली देण्यात आलेल्या User guide for applying online assistance यावर सविस्त्र माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या अर्जाची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतीत संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबर 2019 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
असमान निधी योजना सन 2019-20 साठी  ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125, 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000



कपाशीच्या गुलाबी बोंड अळीच्या 
नियंत्रणासाठी उपाय योजना
            नांदेड दि. 19 :- कंधार तालुक्यातील अम्बुलगा, गौळ, बीजेवाडी, फुलवळ या गावामधे शेतकऱ्यांच्या  बांधावर उभ्या पिकांची पहानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कापूस सन्शोधन केंद्र नांदेड येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, तालुका कृषी अधिकारी आर. एम. देशमुख, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. बी. पुलकुंडवार, वरिष्ठ संशोधन सहाय्यक सोनुले जी.पी., प्रकल्प सहाय्यक जाधव व्ही.के.  यानी प्रत्यक्ष पहाणी केली असता या प्रक्षेत्रावर 4 ते 5 टक्के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.  
कामगंध सापळ्या मध्ये चार ते  पाच पतंग आढळून आले आहे सध्या पाहिली वेचनी चालू आहे शिल्लक राहिलेल्या 15 ते 20 बोंडामध्ये गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता असल्यामूळे शेतकर्यानी खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात. 1.5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. ट्रायकोग्रामा बक्टरी या परोपजीवी किडीचा एकरी 3 कार्ड याप्रमाणे वापर करावा सादरील परोपजीवी किडिची उपलब्धता उप विभागीय कृषि अधिकारी कार्यालय धनेगाव येथे उपलब्ध आहे. हेक्टरी 5 कामगंध सापळयाचा वापर करुन त्यात नवीन पेक्तीनो लुरचा वापर करावा. आर्थिक नुकसानीची पातळी ओलान्धल्या नंतर स्पिनोसड 4 ईसी, 4 एमएल किंवा सायपर मिथ्रीन 10 ईसी  10 एमएल 10 ली पाण्यात मिसळुंन फवारणी करावी. दुसरी वेचनी नंतर कपाशिचे फरदड़ न ठेवता कापूस काढुन दुसरे पिक घेण्यात यावे जेणे करुन पुढील वर्षात गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता कमी राहिल याची शेतकार्याने खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कंधार यांनी केले आहे.
0000


कौमी एकता सप्ताह निमित्त
राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
            नांदेड दि. 19 :- येथील जिल्हा मुख्यालयात नियोजन भवनाच्या बैठक कक्षात 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित कौमी एकता सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कार्यलयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शेवटी आभार मानले.  
0000


रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करुन
पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन
            नांदेड दि. 19 :- बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यावर्षी बाभळी बंधाऱ्यात प्रत्यक्ष सिंचनासाठी 27 दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून रब्बी हंगाम 2019-20 साठी शेतकरी बांधवांनी पिकांचे नियोजन करुन पाण्याचा योग्य वापर करावा व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी बाभळी पाटबंधारे उपविभाग, उमरी यांनी केले आहे.
00000


हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन
खरेदी नोंदणीस 15 डिसेंबरची मुदतवाढ
 नांदेड दि. 19 :-  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची मुदत 15 डिसेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्री करुन हमी भावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


पाणीदार गाव गुंडेवाडी ग्रामस्थांकडून
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा सहपत्निक नागरी सत्कार संपन्न

             नांदेड दि. 19 :- पाणीदार गाव गुंडेवाडी ग्रामस्थाकडून नुकतेच जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व त्यांच्या पत्नी सौ. अंजली अरुण डोंगरे यांचा सहपत्निक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी प्रभाकर मांजेवाड, उपविभागिय जलसंधारण अधिकारी एस. आर. कुलकर्णी, गट शिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के आदी उपस्थित होते.
लोहा तालुक्यात डोंगरात वसलेले वर्षानुवर्ष दुष्काळाची झळा सोसणारे गुंडेवाडी गाव आज पाणीदार गाव म्हणून ओळखले जात आहे. सत्यमेव जयते वाटर कप 2019 चे प्रथम क्रमांक म्हणून निवड झालेल्या या गावात शासनाचे जलयुक्त कामे करून एकजुटीने श्रमदान केल्याने आज गावात तलाव व विहिरी तुडूंब भरलेल्या आहेत.
   जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गावात भेटी देवून पाण्याचे महत्व व नियोजन सांगितले. त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन गावासाठी मोलाचे ठरले. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची प्रेरणा घेवून गावातील युवकांनी व समस्त गुंडेवाडी ग्रामस्थ एकजुटीने  व संघटन करून जलसंधारणाची कामे यशस्वी पुर्ण केल्यामुळे या गावास वाटर कप 2019 चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
गुंडेवाडीत डीपसिसिटी 15 हजार घनमीटर, नाला खोलीकरण (बॉक्स) 12 हजार घनमीटर,वॅट  3,000 घनमीटर,कंपार्टमेंट बल्डींग 55,000 घनमीटर,शेततळे (खाजगी) 20×25 पाच ,श्रमदानातुन शेततळे (कंपार्टमेंट बल्डींग )15×15 ,श्रमदानातून कंपार्टमेंट बल्डींग 5,000 घनमीटर अशा माध्यमातून आज रोजी 8 कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या सर्व कामासाठी सर्व शासकिय यंत्रणाचे मोलाचे सहकार्य लाभले.
0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...