शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकिय यंत्रणा दूत म्हणून देईल योगदान
- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड येथे 1 जून रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन
प्रातिनिधिक लाभार्थी व प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार सन्मान
नांदेड (जिमाका) दि. 23 :- दुर्गम भागासह खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात आहे. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांच्या लाभातून विकासाचा मार्ग गाठता यावा या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सुमारे 21 हजारांपेक्षा अधिक शासकीय अधिकारी-कर्मचारी आपल्या कर्तव्यासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून योगदान देतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. हा उपक्रम नांदेड जिल्ह्यात व्यापक होण्यासाठी सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊन कटिबद्ध व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
“शासन आपल्या दारी” या अभियानानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 1 जून रोजी प्रस्तावित नांदेड जिल्हा दौरा देण्यात आला आहे. त्यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यासंदर्भात आज येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन योजनेचा लाभ घेता येऊ शकेल असे शक्य होत नाही. असंख्य नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहचवू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना हाती घेतली आहे.
या उपक्रमासाठी सर्वांचा सहभाग हा महत्वाचा असून सर्व विभागामार्फत देण्यात येणारे लाभ एकाच दिवशी विक्रमी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महत्वाकांक्षी संकल्प आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार विभाग यांनी त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
या उपक्रमात जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे प्रदर्शन घडेल अशा बाबींच्या प्रदर्शनाचे स्टॉल उभारण्यात यावेत. आदिवासी भागातील लाभार्थ्यानी बाबुपासून तयार केलेल्या वस्तु, आदिवासीचे नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी वर आधारित सोयाबिन, करडी पिके, मानव विकास अंतर्गत माझी मुलगी या अभियान, होट्टल येथील शिल्पकलेसह जिल्ह्यातील अशा वैशिष्टपूर्ण बाबींची माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून दाखविण्याचे नियोजन तालुका पातळीवरील यंत्रणानी करावे असेही त्यांनी सांगितले.
किनवट, हदगाव, इस्लापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांपर्यंत ही योजना पोहचावी
- खासदार हेमंत पाटील
नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. किनवट, हदगाव, इस्लापूर, मांडवी आदी भागातील नागरिकांना तालुका व जिल्हा पातळीवर असलेल्या शासकीय कार्यालयापर्यंत पोहचणे शक्य होईलच असे नाही. असा नागरिकांनाही विकासाच्या कक्षेत घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक दक्षता घेतली पाहिजे. “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपला सहभाग घेतला. जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा कामात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे लक्षात घेता त्यांची कोणतीही अडचण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी बैठकीत सूचना केल्या.