Friday, December 16, 2022

सुधारित वृत्त

जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ऑटोरिक्षांची विशेष तपासणी मोहिम सोमवार 19 डिसेंबर ते शनिवार 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ऑटोरिक्षा संबंधित सर्व बाबींची काटेकार तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद ऑटोरिक्षा वाहन चालक/ मालक यांनी  घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना ऑटोरिक्षा, योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेली ऑटोरिक्षा चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारच्या वाहनांची प्रभावीपणे तपासणी व दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागासोबत विशेष ऑटोरिक्षा वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ऑटोरिक्षा चालक/मालकांनी ऑटोरिक्षाचे सर्व विधीग्राह्य कागदपत्रे सोबत बाळगावीत. ऑटो रिक्षा चालकांनी युनिफॉर्म/बॅज घालावे. वाहनांवर मीटर/नो एन्ट्री बार लावून वाहन चालवावे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करु नये. विना परवाना प्रवासी वाहतूक करु नये. धोकादायक पध्दतीने वाहन चालवू नये. वाहनचालकाच्या बाजूला अनधिकृत सीट बसवू नये. नो पार्किंग/नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवू नये असे प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

0000


 आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी

करण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 नांदेड (जिमाका) दि. 16 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरू आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मंगळवार 20 डिसेंबर 2022  पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे. 


 नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे.

00000

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने

जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, टि.डी-1 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. 

जिल्ह्यात  मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियम, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

00000

 राज्‍यस्‍तरीय कृषि महोत्‍सवात शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :-  राज्‍यस्‍तरीय कृषि महोत्‍सव 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत सिल्‍लोड जि. औरंगाबाद येथे आयोजित करण्‍यात आलेला आहे. या कृषि महोत्‍सवात कृषि प्रदर्शन, चारही विद्यापीठाचे स्‍टॉल, विविध कृषि निगडीत साहित्‍याचे प्रदर्शन, सांस्‍कृतिक कार्यक्रम तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 5 जानेवारी 2023 हा दिवस राखीव ठेवण्‍यात आला आहेजिल्ह्यातील शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्‍पादक कंपनी यांनी त्‍यांचे उत्‍पादनाचे स्‍टॉल त्‍या ठिकाणी लावावेत. तसेच शेतकऱ्यांनी या महोत्‍सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त जिल्‍हा कृषि महोत्‍सव जानेवारी 2023 आयोजन करण्यात येणार आहे. या कृषि महोत्‍सवात कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र / कृषि विद्यापीठाचे स्‍टॉल, विविध कृषि निगडीत साहित्‍याचे प्रदर्शन, सांस्‍कृतिक कार्यक्रम व शासकीय विभागाचे स्‍टॉल असे एकूण 200 स्‍टॉल उभारण्‍यात येणार आहेत. आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 म्‍हणून साजरे करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्‍यामध्‍ये ज्‍वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या सारख्‍या पिकांचा समावेश आहे. पिकाचे आहारामध्‍ये महत्‍व समजावे म्‍हणून जिल्‍हा कृषि महोत्‍सवामध्‍ये पौष्टिक तृणधान्‍य कार्यशाळा आयोजित करण्‍यात येणार आहे. शेत तिथे पौष्टिक तृणधान्‍य मोहिमेमध्‍ये पीक प्रात्‍यक्षिके, मिनीकीट वाटप, शेतकरी, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षण वर्षभरात आयोजित करण्‍यात येणार असल्याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक

स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल राहील

-          जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील पुरुष खेळाडू कर्मचारी दरवर्षी जिंकण्यामध्ये अग्रेसर राहतात. यावर्षी महिला खेळाडू कर्मचारी या पुरुष खेळाडू कर्मचाऱ्यांप्रमाणे अव्वल क्रमांक पटकावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

 

नांदेड जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार 15 डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडियम नांदेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे हस्ते झाले. यावेळी सी.आर.पी.एफ. कैंप मुदखेडचे डी. आय. जी ब्रिगे. जी. एस. रेड्डीमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेअपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा डालकरीतहसिलदार किरण अंबेकरनायब तहसिलदार मुगाजी काकडेलक्ष्मण नरमवारगिरीष येवतेनन्हू कानगुलेमधुकर वाठोरेचंद्रमुनी सावंत, सुधाकर डोईवाडउपविभागीय अधिकारीतहसीलदारनायब तहसीलदारमंडळ अधिकारीअव्वल कारकूनमहसूल सहायकतलाठीशिपाई व कोतवाल यांची उपस्थिती होती.

 

सर्वप्रथम श्री पठाण मंडळ अधिकारी व त्यांचा चमू यांनी पोलिस गृह शाखेच्या पथकासह संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविकात मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्हा औरंगाबाद विभागात सर्वसाधारण विजेता राहिलेला असून यावर्षीही निश्चीतपणे सर्वसाधारण विजेता राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी सर्व खेळाडू व अधिकारी/कर्मचारी यांना नियोजनबध्द परिश्रम घेण्याच्या सूचना दिल्या.

 

डी. आय. जी ब्रिगे. प्रा. जी.एस. रेड्डी यांनी व्यक्तीच्या आयुष्यात क्रीडा व कलागुणाचे महत्त्व अधोरेखीत करुन खेळाडूंना स्पर्धा जिंकण्यासाठी उत्साहासोबतच संयम आवश्यक आहे असल्याचे सांगितले. तहसीलदार किरण अंबेकरमंडळ अधिकारी नन्हू कानगुलेमहसूल सहायक लक्ष्मण नरमवारकोतवाल सुधाकर डोईवाड यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेची सुरुवात क्रिकेटच्या सामन्याने झाली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी काकडेकार्यक्रमाच्या आयोजनासाठी माधव डांगेबाळू संबेटवाड यांनी परिश्रम घेतले. तहसिलदार विजय अवधानेयांनी आभार व्यक्त केले.

00000



 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील

कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी  

 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी.

 

राज्य निवडणूक आयोगाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिले. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.

 

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.

 

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासन परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक  15 डिसेंबर 2022 रोजी निर्गमीत केले आहे.  

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...