Tuesday, November 22, 2022

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त

जिल्ह्यात 23 नोव्हेंबर रोजी 75 विहीरींचे जलपुजन

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नविन  75 विहिरींचे जलपुजन होणार आहे.

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषि विकास योजना (अनु.जाती/जमाती) या तीनही योजनांच्या सन 2020-21 व 21-22 या वर्षातील एकूण 860 विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. नांदेड तालुक्यातील एका प्रातिनिधीक विहिरीचे जलपुजन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते होणार आहे. या जलपुजनास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे उपस्थित राहणार आहेत. उर्वरित सर्व विहिरींचे जलपुजन जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख तसेच सर्व गट विकास अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

0000

 जिल्ह्यातील 4276 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 24 हजार 403 पशुधनाचे लसीकरण 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 216 बाधित गावात 4 हजार 276 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 229 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 2 हजार 744 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 1303 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 24 हजार 403 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 74 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी

२३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

 

औरंगाबाद दि.२२: औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तसेच महसुल मंडळाच्या ठिकाणी नमुना 5 मध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे.

 

प्रसिद्ध करण्यात आलेली यादी  विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालय या ठिकाणी अवलोकनासाठी उपलब्ध असणार आहे.  औरंगाबाद विभागाची एकत्रित प्रारूप मतदार यादी www.ceo.maharashtra.gov.in  व www.aurangabad.gov.in  या संकेतस्थळावरदेखील पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

 

23 नोव्हेंबर रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यानंतर दावे व हरकती 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 पर्यंत पदनिर्देशित ठिकाणी संबंधित तहसिल कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी स्वीकारण्यात येथील प्रारूप यादीच्या अनुषंगाने सुधारणा, वगळणे समावेशना बाबत विहित नमूना पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

 

औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या मतदार प्रारूप यादी मध्ये आपल्या नावाच्या समावेशनाची खात्री करावी व प्रसिध्दीनंतर नमुद कालावधीत यांचे दावे व हरकती दाखल करावेत असे आवाहन  विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ यांनी  केले आहे.

 

*****

 बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. हे अर्ज विलंब शुल्कासह  सरल डेटाबेस वरून www.mahassscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने बुधवार 30 नोव्हेंबर 2022  पर्यंत भरता येणार आहे.    

 

नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्रकला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने विलंब शुल्कासह बुधवार 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरता येणार आहे. तर उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत शुक्रवार 2 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

 

व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचीआयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांचा हा तपशील देण्यात आलेला आहे.

 

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएस द्वारे भरणा केल्याचा व आरटीजीएस / एनईएफटी पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.

 

इयत्ता 12 वी परीक्षेची अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.  उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यायशंनी परीक्षा शुल्क खाली नमूद केलेल्या बँकेमध्ये आरटीएस किंवा एनईएफटी व्दारे भरणा करून चलनाची प्रत तसेच विद्यार्थ्यांच्या  याद्या व प्रिलिस्ट दिलेलया मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात

पुणे , औरंगाबाद व कोल्हापूर  -  बँक ऑफ इंडिया  Virtual Account ,मुंबई , नागपूर व लातूर – एचडीएफसी बँक  Virtual Account, अमरावती, नाशिक , व कोकण – अॅक्सिस बँक Virtual Account मध्ये एनईएफटी आरटीजीएस व्दारे भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी आरटीजीएसव्दारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यतून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच अकाऊंड नंबर व आयएफसी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य यांची राहील.

 

उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाही.याची नोंद सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रमुखांनी घ्यावी. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा करून विभागीय मंडळ स्तरावर करून याबातचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमून्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्याची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून सेव्ह होत नसल्सास त्यांनी उपरोक्त दिलेल्या मुदतीत ऑल ॲप्लीकेश्न च्या लिंगवरून आवेदनपत्रे भरायची आहेत. नियमित तसेच विलंब शुल्क स्वतंत्र आरटीजीएस  एनईएफटी व्दारे भरण्यात यावे.  नियमित शुल्काने तसेच विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही  मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्याावी. अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यशावकाश कळविण्याात येईल असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) अंतर्गत

रब्बी हंगाम पाणी-पाळीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- यावर्षी इसापूर धरणात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असुन त्यानुसार रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याचे अपेक्षित आहे. त्यानुसार रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी असेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2022 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.  

 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच मागणी लक्षात घेता प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. तथापि इतर पाणीपाळ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील होण्याच्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2022-23 मधील पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम. अवर्तन क्रमांक 1 चा  कालावधी 22 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत असे एकुण 22 दिवस पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम आहे.

 

पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होऊ शकतो. नमुना नं.7, 7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास पुढील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. रब्बी हंगामी , दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा/ मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदि/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प अत्यल्प भुधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल.

 

सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही.

 

शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या/ अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत वितरण व्यवस्था व कालवे हे फार जुने असल्यामुळे सदर कालवे केवळ 50 ते 70 टक्के क्षमतेनेच वाहतात. त्या कारणास्तव लाभक्षेत्रातील अतिपुच्छ भागातील लाभधारकांना तुर्त पाणी मिळेल याची हमी देता येणार नाही. या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घ्यावी. वरील सर्व अटी व नियमांचे पालन करून विभागास सहकार्य करावे, असेही आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. 

00000

 आगरतळा येथील अखिल भारतीय स्पर्धेत

मिना सोलापुरे द्वितीय पुरस्काराने सन्मानित

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- केंद्र शासन व त्रिपुरा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आगरतळा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा, संगीत व नृत्य स्पर्धेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन मिना अंबादासराव सोलापुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल नांदेड जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य संघाकडून त्यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या शासकिय संघात त्यांची निवड झाली होती. समूह गायन स्पर्धेत मिना सोलापुरे यांच्यासमवेत सुधीर पलांडे, जितेंद्र धनु, अजिम शेख, दिलीप मोहरी, योगेंद्र केजळे व उषा धनु हे सहभागी झाले होते. त्यांनी गायलेल्या समूह गिताला भरत लब्दे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. अरुण साळुंके व विशार्म कुलकर्णी यांनी तबल्यासाठी साथ दिली. या स्पर्धेचे व्यवस्थापक श्रीमती मंगल नाखवा व प्रविण राणे यांनी नियोजन केले.

00000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...