Wednesday, September 8, 2021

 येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाल्याने वाहतुकीस प्रतिबंध

पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  बिलोली तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाल्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.

येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुलावरील मार्ग प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी पुढील प्रमाणे राहील. बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतुक ही बिलोली-कुंडलवाडी-धर्माबाद ते राज्य सीमेवरून बोधनकडे या मार्गे तर नांदेडहून हैद्राबादकडे जाणारी वाहतूक नांदेड-नरसी-देगलूर-मदनूर हैद्राबाद हा पर्यायी मार्ग राहील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 8 सप्टेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गान सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000 

 लहान-मोठ्या पुराने सतत पाण्याखाली येणाऱ्या

पुलांच्या नव्याने उभारणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण   

नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोदावरीसह इतर लहान-मोठ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना येणारे पूर यात मोठ्या प्रमाणात लहान पुलांचे, ठरावीक ठिकाणी रस्त्यांचे अतोनात नुकसान होते. याचबरोबर जीवत हानीही वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अतिवृष्टी झाली की सातत्याने यात होणारी हानी लक्षात घेता अशा जागेवर नव्याने पाण्याखाली न येणाऱ्या उंचीचे पूल उभारण्याबाबत गंभीरतेने विचार सुरू असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक आज रात्री उशीरा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 

ग्रामीण व राज्य महामार्गावरील सर्वच पुलांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. जे पूल अथवा पुलाचा काही भाग ज्या ठिकाणी वाहून जातो, जे पूल जलमय होतात अशा पुलांची वर्गीकरण करुन त्यांना प्राधान्यक्रमानुसार दुरुस्त करणे व त्याबाबत पर्यायी नियोजनाबाबतच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर पावसाळ्यामध्ये सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी अपघात होऊ नये यासाठी क्रॅशबार अथवा इतर पर्याय आहेत का याची तपासणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले. 

राष्ट्रीय महामार्गाची स्थिती ही अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यात औरंगाबाद ते नांदेड पर्यंत, नांदेड ते अहमदपूर-लातूर, नांदेड ते हदगाव, नांदेड ते देगलूर व पुढील मार्गावर मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची गरज आहे. याचाही सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना देऊन याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

सन 2006 नंतर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. यात बऱ्याच ठिकाणी शेतातील उडीद व इतर पिके हातची आलेली गेलेली आहेत. काही ठिकाणी शेतातील मातीही खरबडून गेली आहे. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी पिक विमा योजना व इतर स्तरावर मदत करण्यासाठी तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषि विभागाला दिले.

जिल्ह्यातील 7 तलावांना हानी पोहचली असून 2 तलाव फुटले आहेत. 5 तलावांची दुरुस्ती आवश्यक आहे. ही दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. जिल्ह्यातील या अतिवृष्टीमुळे झालेल्या एकुण नुकसानीचा अंदाज घेऊन कामाचे प्राधान्यक्रम व यासाठी मदत व पूनर्वसन विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन विकास आराखड्याद्वारे नेमके कोणती कामे होऊ शकतील याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. 

नांदेड महानगरात जवळपास 400 घरांमध्ये पाणी घुसले. यामुळे 580 लोकांना विस्थापीत केले असून त्यांची व्यवस्था मनपातर्फे केली जात आहे. विविध सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त सुनिल लहाने यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे छायाचित्रासह सादरीकरण केले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी सादरीकरण केले.

00000





 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 8 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार 8 सप्टेंबर रोजी मुंबई येथून विमानाने रात्री 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन होईल. गुरुवार 9 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतील.

0000

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून व यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. याचबरोबर आज 8 सप्टेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 36 हजार 640 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 21 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे.  पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातुन पूर्णा नदीत 16 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. सिद्धेश्वर धरणाखाली मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा ब्रिजजवळ 1 लाख 18 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला येऊन मिळते. यामुळे  विष्णुपुरी प्रक्ल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 दरवाजातून 2 लाख 41 हजार 518 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू असल्याने गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढणे स्वाभाविक आहे. हा विसर्ग नियंत्रित रहावा यादृष्टीने विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न केला जात असला तरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह व येवा कमी झालेला नाही. नांदेड येथील जुन्या पुलावर आज 8 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत पाणी पातळी 352.40 मिटर इतकी आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून  सोडलेला विसर्ग व गोदावरी नदीत चालू असलेला विसर्ग यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. 

उर्ध्व मानार प्रकल्प व निम्म मानार प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 94.9 टक्के भरल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास गेटचे पाणी सोडण्यात येईल, अशा इशारा नांदेड पाटबंधारे विभागाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी अधिक सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000




 नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 795 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 271 एवढी झाली असून यातील 87 हजार 586 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 34 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, बिलोली 1, मुदखेड 2, लोहा 1, हिंगोली 1, असे एकूण 8  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात लोहा तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 34 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 17 हजार 731

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 14 हजार 612

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 271

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 586

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-34

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 53.90 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.28 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 53.90  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 168.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे.  

जिल्ह्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.28 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 31.2 (111.50), बिलोली 102 (258.90) मुखेड- 205.10 (497.20) कंधार 91.5 (201.40), लोहा- 104.10 (200),हदगाव 10.5 (157.80),भोकर 16.80 (161.40) देगलूर 87.10 (192.60) किनवट- 12.20 (140.30), मुदखेड 19.40 (89.10) हिमायतनगर 36.90 (187.30) माहूर- 1.70 (76.10 धर्माबाद- 47.90 (137.10), उमरी 20.50 (157) अर्धापूर 39.90 (161.70) नायगाव- 71.90 (194.30) याप्रमाणे आहे.

0000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 9  सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल  या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 7 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 10 लाख 96 हजार 735लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 67 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 88 हजार 160 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 55 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती / संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-240674 व 9921563053 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

या योजनेचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मध्य उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रता अर्जदार साक्षर असावा स्वत:ची  शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्रचालक प्रगतीशिल मधपाळ व्यक्तीची पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्यानावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 

केंद्रचालक संस्था यांची पात्रतेत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची किंवा भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 

0000

 

 "नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 8 :- "नीट" परीक्षा 2021 ही रविवार 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 35 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात 12 सप्टेंबर रोजी 2  वाजेपासून ते सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास व भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

00000

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत  

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 
नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या 1 तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल 7 सप्टेंबर रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणची वाहतुकही विस्कळीत झाली होती. या सर्व परिस्थितीचा एकत्रित आढावा तात्काळ घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

 
जिल्ह्यातील अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे कृती दल स्थापन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पाझर तलावांची सद्यस्थिती व उपलब्ध असलेला पाणीसाठा याचा आढावा घेण्याचे जबाबदारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. काही भागात नाल्याच्या काठावर अथवा इतरत्र जर विविध जनावरे वाहून आल्याचे आढळले असल्यास त्याचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 
जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा विविध नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानीची ज्या शेतकऱ्यांनी माहिती देऊन पंचनामे करुन घेतले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काळजीपूर्वक पंचनामे करणे, पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जर कुठे खरडून गेले असतील तर त्याचेही माहिती घेऊन पंचनामे करणे यावर सर्व शासनाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागेवर थांबून तात्काळ कामाला गती देण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

 

सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे व आताच्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
00000




 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक कैलाश तुकाराम मोरे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020  16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

 अर्धापूर तालुक्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओची बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोहिम कालावधीत बीएलओ यांनी उत्कृष्ठ काम करावे, असे आवाहन अर्धापूर तहसिलदार सुजित नरहरे यांनी केले. तालूक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीत नायब तहसिलदार निवडणूक सुनिल माचेवाड यांनी आढावा घेतला.

 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने अर्धापुर तालूक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  यांची बैठक नुकतीच अर्धापुर तहसिल कार्यालयात संपन्न झाली .

 यावेळी तालूक्यातील  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  एजाज तांबोळी, आर. यु. शिंदे, आर. पी. पावडे, एस. पी. कवळे, शेख म. इरफान म.मुस्तफा, मो.मोहसीन मो. समी, ए. एम. कोंडावार, दमकोंडावार, शेख जावेद नुर महमंद, कैलास गायकवाड, शिवाजी मलदोडे, महेश चिटकूलवार, वैजनाथ हंगरगे, मो. इसाक अ. साजिदवली, मो. सिराजोधीन मो इक्बालोधिन, श्रीमती गजला तबस्तुम गुलाम एजदानी, श्रीमती मोबीन आयेशा नाजनीन, एस. आर बुरगुलवार, आर. व्ही. क्षीरसागर, डी. एम. देशमुख, विनोद भुस्से, एम. एस. मरशिवणे, एस. डी सुतनेपवाड, एस. जी. राजेगोरे, निवडणूक ऑपरेटर गिरिश गलांडे इत्यादी उपस्थित होते.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...