अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका
पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या 1 तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात
कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी
मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल 7 सप्टेंबर
रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणची
वाहतुकही विस्कळीत झाली होती. या सर्व परिस्थितीचा एकत्रित आढावा तात्काळ
घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक विभाग
प्रमुखांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे
कृती दल स्थापन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पाझर तलावांची सद्यस्थिती व उपलब्ध
असलेला पाणीसाठा याचा आढावा घेण्याचे जबाबदारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. काही भागात नाल्याच्या
काठावर अथवा इतरत्र जर विविध जनावरे वाहून आल्याचे आढळले असल्यास त्याचा तात्काळ
पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा विविध नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना
सामोरे जावे लागले आहे. यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानीची
ज्या शेतकऱ्यांनी माहिती देऊन पंचनामे करुन घेतले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काळजीपूर्वक
पंचनामे करणे, पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या
शेतजमीनी जर कुठे खरडून गेले असतील तर त्याचेही माहिती घेऊन पंचनामे करणे यावर
सर्व शासनाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागेवर थांबून तात्काळ कामाला गती
देण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे व आताच्या पावसात
ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी करण्याचेही आदेश
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
00000
No comments:
Post a Comment