Tuesday, January 7, 2020


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या अंतिम
 मतदार यादीत नांदेड जिल्ह्याचे 43 हजार 667 मतदार
पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
            नांदेड, दि. 7 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत जिल्ह्यातीन जास्‍तीत जास्‍त पदवीधारक नागरीकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. ऑफलाईन अर्ज करण्‍यासाठी संबंधित तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र विधान परीषदेच्‍या दिनांक 1 नोव्‍हेबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्‍या नव्‍याने तयार करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2019 रोजी प्रसिध्‍दी  करण्‍यात आली आहे. या अंतिम मतदार यादीनूसार नांदेड जिल्‍हयातील सर्व नऊ विधानसभा मतदार संघातील 16 तालुक्‍यातील मतदारांची एकूण संख्‍या 43 हजार 667 इतकी असून त्‍यात 9 हजार 555 स्‍त्री मतदार व 34 हजार 112 पुरूष मतदार आहेत.
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी निरंतर नाव नोंदणी सुरू आहे. मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी मतदारांना ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करता येतील. पात्र नागरीकांना https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. तर ऑफलाईन अर्ज संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय  तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग येथे सादर करता येतील..
पुढीलप्रमाणे पात्रता असणा-या पदवीधर व्‍यक्‍तींना  मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी विहीत नमून्‍यातील (नमूना -18) अर्ज भरून देणे आवश्‍यक आहे.
Ø  जी व्‍यक्‍ती भारताची नागरीक आहे व मतदार संघातील सर्वसाधारण रहीवासी आहे.
Ø  जी व्‍यक्‍ती किमान 3 वर्ष भारताच्‍या राज्‍य क्षेत्रातील विद्यापीठाची एक तर पदवीधर असेल  किंवा त्‍याच्‍याशी समतुल्‍य असलेली अर्हता धारण करीत असेल
Ø  ज्‍या व्‍यक्‍तीने दिनांक 01 नोव्‍हेंबर 2019 या अर्हता दिनांकास पदवी धारण करून 3 वर्ष पूर्ण केली असतील. म्‍हणजेच ज्‍या व्‍यक्‍तीकडे 01 नोव्‍हेंबर 2016 पूर्वीची पदवी आहे.
नांदेड जिल्‍हयातील जास्‍तील जास्‍त पदवीधारक नागरीकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी करण्‍यासाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तर ऑफलाईन अर्ज सादर  करण्‍यासाठी संबंधित तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
00000



योग विद्या धाम नांदेडने प्रकाशित केलेल्या
दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन
नांदेड, दि. 7 :- योग विद्या धाम नांदेडच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ष 2020 च्या पॉकेट साईज दिनदर्शिकेचे विमोचन  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते  आज करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी सदाशिव पडदुने, लेखाधिकारी नीळकंठ पाचंगे, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, योग विद्याधामचे जिल्हाध्यक्ष एन. डी. पोलादवार, सचिव एम.डी नल्लावर, उपाध्यक्ष रमेश केंद्रे योगशिक्षक रवि पालकृतवार डॉ. सायन्‍ना मठमवार राजेश मठमवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी योग विद्या धामच्या योग कार्याची प्रशंसा करून योग कार्याला शुभेच्छा दिल्या. योग विद्या धाम नांदेडच्यावतीने नांदेड शहरात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त विविध  13 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग साधकांनी योग शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
00000


छायाचित्र  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम
नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी
-        जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 7 :-जिल्‍हयाची मतदार यादी अद्यावत व शुध्‍द करण्‍यासाठी  जिल्‍हयातील जास्‍ती जास्‍त नागरीकांनी मतदार यादीत नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणी करून घेण्‍यासाठी मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रमानूसार मतदार पडताळणी कार्यक्रम गुरुवार 13 फेब्रुवारी  2020 पर्यंत राबविण्‍यात येत आहे.
मतदार यादीचे पुनरिक्षण प्रत्‍यक्षात सुरू करण्‍यापूर्वी मतदार यादी अद्यावत व शुध्‍द करण्‍याच्‍या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. या कार्यक्रमात जास्‍तीत जास्‍त मतदारांना सहभागी करून घेणे व तसेच मतदार यादी शुध्‍द करणे याकडे विशेष लक्ष देण्‍यात येणार आहे.
जास्‍तीतजास्‍त पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट राहण्‍यासाठी,  मयत / स्‍थलांतरीत मतदारांची नावे वगळणी करून  मतदार यादी अचूक होण्‍यासाठी 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची नाव नोंदणी, वगळणीबाबत मतदार यादीद्वारे पडताळणी करणार आहेत.
या कार्यक्रमामध्‍ये नागरीकांनी स्‍वयंस्‍फुर्तीने पुढीलपैकी एका कागदपत्राची प्रत देऊन आपल्‍या मतदार यादीतील तपशिलाचे प्रमाणिकरण करून घ्यावे. भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्‍स,          आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी / निमसरकारी अधिकाऱ्यांचे ओळखपत्र, बॅंक पासबुक, शेतक-याचे ओळखपत्र, पॅनकार्ड, एनजीआर अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्‍मार्ट कार्ड  आणि त्‍याच्‍या पत्त्यासाठी अर्जदाराच्‍या नावे किंवा त्‍याच्‍या जवळच्‍या नातेवाईकाचे जसे पालकांच्‍या नावे असलेल्‍या पाण्‍याचे / टेलिफोन / वीज/ गॅस कनेक्‍शनचे सध्‍याचे बिल. 
या पडताळणीत पुर्वीच्‍या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदणी पासून वंचित राहिलेल्‍या पात्र नागरीकांना नमूना-6 वाटप करणे व त्‍यांच्‍याकडुन परत घेणे / जमा करणे मतदार नोंदणीसाठी पात्र होणा-या  नागरीकांची माहिती जमा करणे. स्‍थलांतरीत व मयत मतदारांच्‍या वगळणीसाठी नमूना-7 वाटप करणे व जमा करणे. मतदार यादीतील तपशिल दुरूस्‍ती साठी नमूना-8 वाटप करणे व जमा करणे. अशी कार्यवाही करण्‍यात येत आहे. 
दुबार, स्‍थलांतरीत मतदारांना, मयत मतदारांच्‍या नातेवाईकांना मतदार यादीतील नाव वगळण्‍यासाठी नमूना-7 मधील अर्ज, मतदार यादीतील चूका दुरूस्‍तीसाठी नमूना-8 मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, तसेच तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍याकडे सादर करता येतील, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


महारेशीम अभियानाचे उद्घाटन
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड, दि. 7 :- ऋतूचक्रात अचानक व  अनपेक्षित होणा-या बदलांमुळे पारंपारिक शेतीतून निश्चित उत्पन्नाची हमी देणे कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल,त्यामुळे शेतक-यांनी पुरक व्यवसाय म्हणुन रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित रेशीम अभियान उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शासनाच्या वस्त्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेती बाबत जागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने सोमवार 7 ते 21 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात महा रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी माहितीने सुसज्ज रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. रेशीम शेती विषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना  माहिती होण्यासाठी रेशीम रथा सोबत रेशीम अधिकारी, तज्ञ कर्मचारी  विविध गावात जावुन मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवार 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेशीम रथास हिरवी झंडी दाखवून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी  रोहयो सदाशिव पडदुने, जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, रेशीम विकास अधिकारी श्रीमती ए.व्ही. वाकूरे, नायब तहसिलदार रोहयो सुनिल माचेवाड, नितेशकुमार बोलेलु, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रसाद डूबूकवाड, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक  पी. बी. नरवाडे, तांत्रिक सहायक इंगळे, शुभांगी साबळे, टि.ए.पठाण, एस.जी.हनवते, पी.यु.भंडारे, तांत्रिक सहायक मनरेगा एन वाय कोरके ए एन कुलकर्णी, एस ए बोडके, के. के. मेहकरकर गणेश नरहिरे, बालाजी पांचाळ, शेषराव पाटील, रावसाहेब पोहरे, बालासाहेब भराडे, रेशिम लागवड केलेले प्रगतिशिल शेतकरी हरिभाउ पगडे, संजय पगडे, अर्जून पगडे, गंगाप्रसाद जाधव, काकडे, बोकारे आदि उपस्थित होते.
       यावेळी पुढे बोलतांना  अभियान काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करुन घेवुन रेशीम शेती तसेच मनरेगा सारख्या अनुषंगिक योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश संबंधिताना दिले.
रेशीम शेतीत कामाची मजुरी देणार शासन
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र लाभर्थ्यांना  तुती लागवड व जोपासना मजूरी व साहित्य खर्चा पोटी तीन वर्षात टप्पेनिहाय  दोन लक्ष रुपये तर किटक संगोपन ग़ृह बांधण्यासाठी पंच्यान्नव हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
येथे मिळेल माहिती
 या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे नोंदणी करावी अथवा ०२४६२-२८४२९१  या दुरध्वनी क्र्मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000












गुरुवारी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
नांदेड, दि. 7 :- ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवार 9 जानेवारी  2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे दुपारी 1.30 वा. राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर राहणार आहेत.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य रविंद्र बिलोलीकर, श्रीमती कविता देशमुख, अशासकीय सदस्य डॉ. बा. दा. जोशी, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम अमिलकंठवार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास निमंत्रीत व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण व तहसिलदार अरुण जऱ्हाड यांनी केले आहे.  
00000


राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
नांदेड, दि. 7 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडतर्फे शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात येणार आहे.  संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे.
जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.  याशिवाय, या लोक अदालतीत विद्युतकंपनी, विविध बॅंका, भारतसंचार निगम यांचे थकीत बाकी येण्याबाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमाकंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन  दिपक अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व न्यायाधीश आर. एस. रोटे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी  केले आहे.
00000


आदिवासी गावांमध्ये तांत्रिक
उद्योजकता प्रशिक्षाचे आयोजन  
नांदेड, दि. 7 :-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड मार्फत आदिवासी गावांमध्ये तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतेच दिले आहेत.
त्यानुसार यामध्ये रेडीमेड गारमेंट्स, खाद्य प्रक्रिया उद्योग, बांबू प्रक्रिया उद्योग
याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम टीएसपी निधी अंतर्गत असून यामध्ये किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी, अंदोरी, अंबाडीतांडा, गौरी, धामदरी, दिगडी, कनकवाडी, वजरा या गावांचा समावेश आहे.
या आठ गावांच्या ग्रामपरिवर्तक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत असलेल्या गावांमधील महिला बचतगट व शेतकरी बचत गटातील सदस्यांची यादी जिल्हा कक्षास सादर करण्याच्या सूचना नोडल अधिकारी सुपेकर यांनी दिले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा वेळ दिनांक स्थळ लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सुपेकर यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड या कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आनंद खडककर यांचे सहकार्य मिळाले आहे.
00000


किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत
तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु
नांदेड, दि. 7 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने (हमीभाव 5 हजार 800 प्रति क्विंटल) तूर खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात  नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी 1 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत सुरु आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी करताना तूर पिकाची नोंद असलेला ऑनलाईन सात/बारा, आधारकार्ड, बॅकपासबूक आदी कागदपत्रे देऊन नोंदणी करावी. हमीभाव खरेदी केंद्रावर तुर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  नांदेड जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
00000


 

उज्ज्वल नांदेड अंतर्गत कंधार येथे
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न
नांदेड, दि. 7 :- जिल्हा प्रशासन नांदेड उज्ज्वल  नांदेड नाविन्यपूर्ण योजना सन 2019-20 अंतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतुन जिल्हास्तरावर होणारा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर पहिल्यांदाच कंधार येथे तालुकास्तरावर नगरपरिषद संचलित डॉ.  बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी सारंग चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे पो.नि. गुप्तवार्ता विभाग अधिकारी बालाजी चंदेल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक व एकलव्य क्लासेसचे संचालक शैलेश झरकर, उपस्थित होते.   
याप्रसंगी  ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी जिल्हा प्रशासन नांदेड "उज्वल  नांदेड नाविन्यपूर्ण योजना सन 2019-20 मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या लाभ घेण्याबाबत आवाहन केले.  विद्यार्थ्यांशी संवाद साधत या योजनेबद्दल माहिती देत  म्हणाले की ही योजना 11 वर्षापासून सुरु आहे. नांदेड जिल्हा ग्रंथालय येथे घेतली जात आहे.  ती पहिल्यांदाच कंधार येथे तालुकास्तरावर होत आहे असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते बालाजी चंदेल यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी बाबत तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायक व  सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. मुख्याधिकारी सारंग चव्हाण यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी संबंधी सखोल योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल तसेच वाचक अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी नेहमी धडपडत असणारे मुख्याधिकारी व स. ग्रंथपाल महंमद रफिक सत्तार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय प्रमुख जितेंद्र ठेवरे यांनी केले तर आभार मिलिंद महाराज यांनी मानले. कार्यक्रमास वाचनालयातील अभ्यासिकेसह  प्रा.मुंडे व त्यांच्या क्लासेसचे विद्यार्थी बहुसंख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद महाराज, लता ढवळे, राधाबाई जवादवाड, किशन भालेराव, माधव कांबळे, संदीप जाधव  यांनी परिश्रम घेतले.
000000










मुल्यवर्धन जिल्हा मेळावा,
पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
नांदेड, दि. 7 :- विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत या उद्देशाने मुल्यवर्धन जिल्हा मेळाव्याचे आयोजन गुरुवार 9 जानेवारी रोजी तर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन  9 ते  11 जानेवारी 2020 कालावधीत ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका नांदेड येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यास उपस्थित राहून या प्रदर्शनाचाही लाभ शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांनी केले आहे.    
राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्रात मूल्यवर्धन हा कार्यक्रम शाळांमध्ये सुरु असून शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक स्तरापासून रुजविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सन 2015 पासून राबविला जात आहे.  
राज्य शासनाच्यावतीने मूल्यवर्धन कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 67 हजार शाळांमध्ये सुरु आहे. कार्यक्रमाची निर्मिती शांतिलाल मुथ्था फाउंडेशनी केली असून सन 2009 ते 2015 या 6 वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या 500 शाळांमध्ये तो यशस्वीरीत्या राबविला गेला आहे. याचे मूल्यमापन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या संस्थांनी केले आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले. इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रम पुस्तिका व शिक्षकांसाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार केल्या. त्यावर SCERT च्या तज्ञ समितीद्वारे योग्य ते परिक्षण करुन या आराखडा व अभ्यासक्रमास मान्यताही देण्यात आली. गेल्या 4  वर्षात राज्य शासनाने हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने वाढवित राज्य शासनाच्या सर्व शाळांपर्यंत, 1 लाख 95 हजार शिक्षकांच्या माध्यमाने, 44 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन राज्य शासनास या कामासाठी सर्वतोपरी विनामूल्य सहकार्य करीत आहे. जिल्हा स्तरावर हा उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जि. प. शिक्षण शिक्षण विभाग यांच्यामार्फत राबविला जात आहे.
याअनुषंगाने शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वेच्छेने, विद्यार्थ्यांमध्ये तसेच शाळांमध्ये मूल्यवर्धन कसे रुजले आहे हे दर्शविणारी 4 हजार 500 पेक्षा जास्त पोस्टर्स तयार केली आहेत. त्यांचे प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन मेळाव्याच्या वेळेस 3 दिवसांसाठी आयोजित करण्यात येत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षक कार्यक्षम, क्रियाशील, उत्साही, संवेदनशील व जबाबदार आहेत याचे दर्शन या प्रदर्शनात राहणार आहे. हे प्रदर्शन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका नांदेड येथे गुरुवार 9 जानेवारी 2020 रोजी जिल्हा मेळावा असून  9 ते  11 जानेवारी 2020 रोजी तीन दिवसीय मूल्यवर्धन पोस्टर प्रदर्शन होणार आहे. या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.   
00000


शासन परिपत्रकानुसार कार्यवाही  
कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे
गैरवर्तणूक समजण्यात येईल
नांदेड, दि. 7 :- शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्‍ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्‍यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्‍या विरुध्‍द शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात येईल. अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्‍यात यावेत व ते सर्व कर्मचारी यांच्या व्‍यक्‍तीशः निदर्शनास आणावेत. तसेच त्‍या आदेशाची प्रत शासनाच्‍या प्रत्‍येक विभाग, कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्‍यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.  
राज्‍य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्‍यासंदर्भात 8 जानेवारी 2020 रोजी पुकारलेल्‍या देशव्‍यापी लाक्षणिक संपाबाबत सामान्‍य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक 6 जानेवारी, 2020 निर्गमीत केले आहे. राज्‍य शासकीय कर्मचाऱ्यांचा बुधवार 8 जानेवारी 2020 रोजीच्‍या संप कालावधीत शासनाचे कामकाज सुरळीतरित्‍या पार पाडण्‍याच्यादृष्‍टीने सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्‍यांच्‍या अधिपत्‍याखालील क्षेत्रिय कार्यालयांना संप कालावधीत उपाययोजना करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. त्यानुसार परित्रकात नमुद केल्‍याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्‍या संपकालावधीत सर्व कार्यासन अधिकारी जि. का. नांदेड, उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांनी कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी यांच्या पत्राची व शासन परिपत्रकाची प्रत कार्यालयाच्‍या सूचना फलकावर लावून अनुपालन अहवाल सादर करावा. शासन परिपत्रकात नमुद बाब अधिनस्‍त सर्व कर्मचारी यांच्‍या व्‍यक्‍तीशः निदर्शनास आणून दयावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...