Tuesday, January 7, 2020


मुल्यवर्धन जिल्हा मेळावा,
पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
नांदेड, दि. 7 :- विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत या उद्देशाने मुल्यवर्धन जिल्हा मेळाव्याचे आयोजन गुरुवार 9 जानेवारी रोजी तर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन  9 ते  11 जानेवारी 2020 कालावधीत ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका नांदेड येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यास उपस्थित राहून या प्रदर्शनाचाही लाभ शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांनी केले आहे.    
राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्रात मूल्यवर्धन हा कार्यक्रम शाळांमध्ये सुरु असून शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक स्तरापासून रुजविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सन 2015 पासून राबविला जात आहे.  
राज्य शासनाच्यावतीने मूल्यवर्धन कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 67 हजार शाळांमध्ये सुरु आहे. कार्यक्रमाची निर्मिती शांतिलाल मुथ्था फाउंडेशनी केली असून सन 2009 ते 2015 या 6 वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या 500 शाळांमध्ये तो यशस्वीरीत्या राबविला गेला आहे. याचे मूल्यमापन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या संस्थांनी केले आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले. इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रम पुस्तिका व शिक्षकांसाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार केल्या. त्यावर SCERT च्या तज्ञ समितीद्वारे योग्य ते परिक्षण करुन या आराखडा व अभ्यासक्रमास मान्यताही देण्यात आली. गेल्या 4  वर्षात राज्य शासनाने हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने वाढवित राज्य शासनाच्या सर्व शाळांपर्यंत, 1 लाख 95 हजार शिक्षकांच्या माध्यमाने, 44 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन राज्य शासनास या कामासाठी सर्वतोपरी विनामूल्य सहकार्य करीत आहे. जिल्हा स्तरावर हा उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जि. प. शिक्षण शिक्षण विभाग यांच्यामार्फत राबविला जात आहे.
याअनुषंगाने शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वेच्छेने, विद्यार्थ्यांमध्ये तसेच शाळांमध्ये मूल्यवर्धन कसे रुजले आहे हे दर्शविणारी 4 हजार 500 पेक्षा जास्त पोस्टर्स तयार केली आहेत. त्यांचे प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन मेळाव्याच्या वेळेस 3 दिवसांसाठी आयोजित करण्यात येत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षक कार्यक्षम, क्रियाशील, उत्साही, संवेदनशील व जबाबदार आहेत याचे दर्शन या प्रदर्शनात राहणार आहे. हे प्रदर्शन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका नांदेड येथे गुरुवार 9 जानेवारी 2020 रोजी जिल्हा मेळावा असून  9 ते  11 जानेवारी 2020 रोजी तीन दिवसीय मूल्यवर्धन पोस्टर प्रदर्शन होणार आहे. या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.   
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...